होमपेज › Satara › शिवसेनेने अर्धनारी नटेश्‍वराची भूमिका सोडावी : अजित पवार

शिवसेनेने अर्धनारी नटेश्‍वराची भूमिका सोडावी : अजित पवार

Published On: Apr 09 2018 1:30AM | Last Updated: Apr 09 2018 1:30AMसातारा : प्रतिनिधी

राज्यातील भाजप आणि शिवसेनेच्या युती सरकारमध्ये समाजातील एकही घटक सुखी नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने  हल्‍लाबोल  यात्रा सुरू केली. मात्र, सरकारकडून राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणारी औलाद कुणाची आहे? जेम्स लेन प्रकरणात यांची दातखिळी का बसली? भीमा कोरेगावचा मास्टरमाईंड कोण? सरकारचे पितळ उघडे पडले आहे. सत्तेत राहूनही जनतेचे कारण सांगून विरोध करणार्‍या शिवसेनेने अर्धनारी नटेश्‍वराची भूमिका सोडावी, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांनी भाजपबरोबर शिवसेनेवरही हल्लाबोल चढवला. सातारकरांनी दिलेल्या आसुडाने मुख्यमंत्र्यांसह सरकारला फोकाळून काढू, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनादरम्यान सातार्‍यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर झालेल्या जाहीर सभेत आ. अजित पवार बोलत होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, आ. जयंत पाटील, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा श्रीमती चित्रा वाघ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्रामसिंह कोते-पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आ. अजित पवार म्हणाले, छप्पन इंचाची छाती बोलणार्‍याने देशामध्ये किती जवान शहीद होत आहेत याचा विचार करावा. खोटे बोल, पण रेटून बोल ही भाजपची नीती सर्वत्र दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भ्रष्टाचारी मंत्र्यांचे समर्थन करत आहेत. कधी नव्हे ते देशात व राज्यात अराजकतेचे वातावरण आहे.     

बेरोजगारी वाढली आहे. ज्या संस्था आमच्या ताब्यात आहेत तिथे नोकर भरती केली तर त्याला स्थगिती आणली जात आहे. अशा सरकारला  घरी बसवले पाहिजे. सातारा जिल्ह्याने नेहमीच क्रांतीकारक विचार दिला आहे. भाऊसाहेब महाराजांनी आम्हाला नेहमीच प्रेरणा दिली आहे. सातार्‍याने भविष्यकाळातही राष्ट्रवादीसोबत रहावे. शिवेंद्रराजेंनी ज्या भावना व्यक्‍त केल्या  आहे त्याचा विचार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार निश्‍चितपणे करतील. तुम्ही सर्वजण एकत्र राहिला तर तुम्हाला जे अपेक्षित आहे ते घडेल, असेही आ. अजित पवार म्हणाले. 

आ. धनंजय मुंडे म्हणाले, पाहुण्यांना राजे काय भेट देतील याची उत्सुकता होती. आम्हाला तलवार भेट मिळेल असे वाटले पण आसूड मिळाला. त्याची आज गरज आहे. लोकशाहीत लढताना तलवार, गदा, आसूड दिला तरी विरोधकांवर वार करता येत नाही. सरकार उलथवून टाकायचे आहे. सरकारला फोकळण्याची मला जर परवानगी मिळाली तर सुरुवात कोणापासून करू असा प्रश्‍न मला आहे. सोळा मंत्र्यांपासून भाजपला व  मुख्यमंत्र्यांनाही फोकाळून काढू.   आ. शिवेंद्रराजे, तुमच्यात बदल झाला आहे. तो कायम ठेवला पाहिजे. आता बदल्याशिवाय राज्य बदलणार नाही. गुजरात मॉडेल समोर ठेवले आणि मोदींना पंतप्रधान म्हणून समोर आणले. आता अच्छे दिनचे चेष्टा लोक करू लागले आहेत. पंधरा पैसेही कोणाच्या खात्यावर जमा झाले नाहीत. मात्र आता मोदींच्या कृपेने आपल्या खात्यावर पंधरा लाख रुपयांच्या कर्जाची नोंद होते की काय अशी भीती वाटू लागली आहे. भाजपची बांडगुळ महागाई वाढली आहे असे म्हणत होते. मात्र आता ते तोंड बंद करून आहेत. भ्रष्टाचार्‍यांना मुख्यमंत्र्यांची साथ आहे. प्रत्येकाला ते क्‍लिनचिट देत आहेत. त्यामुळे हे फसवे सरकार हद्दपार करा.

आ. सुनील तटकरे म्हणाले, मोदी लाट असताना राष्ट्रवादी पक्षाने काही ठिकाणी खातेही खोलले नाही. मात्र, त्यावेळीही सातारा जिल्ह्यात सर्वाधिक आमदार निवडून दिले. त्यामुळे कोणतीही लाट असली तरी सातार्‍यात मात्र पवारसाहेबांच्या विचाराची लाट असल्याचे सिध्द झाले आहे. खोट्या सरकारला खाली खेचण्यासाठी हल्‍लाबोल मोर्चा काढण्यात येत आहे. पवारसाहेबांबद्दल मुख्यमंत्र्यांनी जे शब्द काढले त्याचा मी जाहीर निषेध करतो. खोट बोल पण रेटून बोल अशी भूमिका सरकारने घेतली आहे. इथे जमलेल्या जनसमुदायाने तुमची ताकद दाखवली आहे. आ. शिवेंद्रराजे आक्रमक झाले म्हणजेच राज्यातील सगळे युवा कार्यकर्ते त्यांच्या  नेतृत्वाखाली  सरकारवर आसूड उगवण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसते, असे उद‍्गार आ. तटकरे यांनी काढले. 

आ. जयंत पाटील म्हणाले, भाजप सरकारने जी काही खोटी आश्‍वासने दिली त्याविरोधात हल्‍लाबोल आंदोलन उभारले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, 4 वर्ष झाले तरी त्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही. त्यामुळे धनगर समाजाची मुख्यमंत्र्यांबद्दल फसवणुकीची भावना निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:ला देशाचे चौकीदार म्हणवतात. मात्र, चौकीदार असताना विजय मल्ल्या, नीरव मोदी, ललित मोदी यांनी देशाच्या तिजोरीवर दरोडा टाकला आहे. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात असताना त्यांनी आमच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून बदनाम केले. मात्र, सत्तेवर  आल्यानंतरही त्यांना ते आरोप सिध्द करता आलेले नाहीत. याउलट आ. धनंजय मुंडे यांनी सरकारचे 16 मंत्री कसे भ्रष्ट आहेत हे कागदोपत्री दाखवले आहे. हे सरकार कशात पैसे खाईल  याचा काही नेम नाही. त्यामुळेच उंदरे मारण्यातही भ्रष्टाचार झाल्याचे त्यांच्याच पक्षाचे आमदार असलेल्या एकनाथ खडसे यांनी दाखवून दिले, अशी टीका आ. पाटील यांनी केली. 

पक्षाने विश्‍वासू कार्यकर्त्यांना साथ दिली पाहिजे.  दादा, आपण उपमुख्यमंत्री असताना कास धरणासाठी 42 कोटींचा निधी दिला. त्यानंतर आता हे काम सुरू झाले आहे. माझा पाठपुरावा आणि आपण घेतलेल्या या निर्णयामुळेच सातार्‍याला जास्त पाणी मिळणार आहे. याचे सर्व श्रेय हे तुमचे आहे. भविष्यातही तुमचे लक्ष सातार्‍यावर राहू द्या.  आगामी निवडणुकीत तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू. पक्ष अडचणीत असताना जिल्ह्याने पवारसाहेबांचा विचार उचलून धरला. राज्यात काही झाले तरी सातारा जिल्हयात याचा फरक पडत नाही. जिल्ह्यात काही समस्या आल्यास सर्व आमदार एकत्र येऊन ती सोडवतो. दादा, तुम्ही कोणतीही जबाबदारी द्या ती पार पाडण्यास कोठेही कमी पडणार नसल्याचे आ. शिवेंद्रराजेंनी स्पष्ट केले. 

ते पुढे म्हणाले, गेल्या 4 वर्षात भाजप सरकारने जे निर्णय घेतले, धोरण राबवले त्यामध्ये त्यांना अपयश आले आहे. शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचे काम या सरकारने केले आहे. कर्जमाफी देऊन जी क्रूर चेष्टा सरकारने शेतकर्‍यांची केली आहे. जर आता छत्रपती शिवाजी महाराज असते तर आता या सरकारचा कडेलोट केला असता. सरकारला घरी पाठवायचं काम केल पाहिजे, अशी टीका आ. शिवेंद्रराजे यांनी केली.यावेळी महिला आघाडीच्या प्रमुख सौ. चित्रा वाघ व आ. जयराज गायकवाड यांनी मनोगत व्यक्‍त केले.  सूत्रसंचलन राजू भोसले यांनी केले. 

 

Tags : satara, satara news, ncp, Public meeting,