Sat, Apr 20, 2019 08:42होमपेज › Satara › तलवारीच्या जागी स्वच्छतेचे फलक

तलवारीच्या जागी स्वच्छतेचे फलक

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 29 2018 10:38PMकराड : प्रतिभा राजे

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कराड शहरामध्ये स्वच्छतेची नागरिकांमध्ये प्रचंड जागरूकता निर्माण झाली आहे. दरवर्षी साजर्‍या होणार्‍या येथील उत्तरालक्ष्मी उत्सवामध्ये मिरवणूकीमध्ये पारंपारिक पध्दतीने महिला व तरूणांनी वेशभूषा करत हातात तलवारी ऐवजी स्वच्छतेचे फलक घेवून जनजागृती केली. यासाठी नगरपालिकेने जिर्णोध्दार समितीस सहकार्य करत स्वच्छतेचा संदेश जागवला. 

स्वच्छ सर्वेक्षण  मध्ये अव्वल येण्यासाठी कराड पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी घेत असलेल्या परिश्रमामुळे नागरिकांमध्येही  जनजागृती होत आहे.   पालिकेने स्वच्छतेत सुरूवात केली होती तेच सातत्य पालिकेने ठेवले आहे. त्यामुळेच स्वच्छ सर्वेक्षणाचे पथक येऊन गेल्यानंतरही आजही पालिकेकडून स्वच्छतेचा जागर अखंडपणे सुरूच ठेवलेला दिसत आहे. त्यामुळेच नागरिकही आता स्वच्छतेसाठी सरसावले असून येथील उत्तरालक्ष्मी देवीच्या उत्सवासाठी उत्तरालक्ष्मी जिर्णोध्दार समितीचे पदाधिकारी, शशिकांत हापसे यांनी नगरसेवक विजय वाटेगावकर व पालिकेच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला व यंदा पालखी सोहळ्यातून स्वच्छतेची जनजागृती करावयाची आहे असा मानस व्यक्‍त केला.  

उत्तरालक्ष्मी ही कराडची ग्रामदैवत आहे. दरवर्षी माघ द्वादशीला हा उत्सव सुरू होतो व नव्याच्या पौर्णिमेपर्यंत उत्सव सुरू असतो.  स्त्री ही देवीचे एक रूप असते त्यामुळे पालखी सोहळ्यात दरवर्षी घोड्यावर महिलांना बसवण्यात येवून त्यांच्या हातात तलवारी देवून सहभागी केले जाते. मात्र यावेळी  पालिकेकडून सहकार्य घेत महिलांच्या हातात तलवारी ऐवजी स्वच्छतेचे फलक घेण्यात आले. स्वच्छतेमध्ये महिलांचे काम मोलाचे असते. त्यांच्याकडूनच हा संदेश व्यवस्थितरित्या समाजात पोहोचेल त्यामुळेच ही कल्पना आखण्यात आल्याचे शशिकांत हापसे यांनी सांगितले.

यावेळी ‘स्वच्छतेला पर्याय नाही’, ‘ओला व सुका कचरा विलगीकरण करा’, ‘पाण्याचा अपव्यय टाळा’ आदी फलक महिलांनी हाती घेतले होते. यावेळी नगरसेवक विजय वाटेगावकर, आरोग्य सभापती सौ. प्रियंका यादव, नगरसेविका अंजली कुंभार, ए. आर. पवार, जिर्णोध्दार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब उंब्राणी, एन्व्हायरो नेचर क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशिद, सातारा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष राजेंद्र माने, उपाध्यक्ष रामभाऊ रैनाक, प्रदीप जाधव, अशोकराव पाटील उपस्थित होते. 

मुख्याधिकारी यशवंत डांगे, पालिकेचे अधिकारी व पदाधिकारी यांनी स्वच्छतेत आघाडी राखण्यासाठी  परिश्रम घेत आहेत. उत्तरालक्ष्मी जिर्णोध्दार समितीची हा उपक्रम स्तुत्य ठरला आहे.