होमपेज › Satara › संत परंपरेमुळेच मराठी भाषा समृद्ध : डॉ. सदानंद मोरे

संत परंपरेमुळेच मराठी भाषा समृद्ध : डॉ. सदानंद मोरे

Published On: Feb 19 2018 1:20AM | Last Updated: Feb 18 2018 11:04PMकराड : प्रतिनिधी

संत परंपरेमुळेच मराठी भाषा समृद्ध झाली असून, सर्वदूर पसरली आहे. संत हे आपले भाषिक पूर्वज असून, त्यांच्याशी आपले असणारे नाते हे भाषिक व सांस्कृतिक अंगाने जडलेले आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे थोर अभ्यासक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले. 

सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते, विठ्ठल - रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, मारूतीबुवा कराडकर मठाचे मठाधिपती ह. भ. प. बाजीरावमामा कराडकर, वडगावच्या जयरामस्वामी मठाचे मठाधिपती ह. भ. प. विठ्ठलस्वामी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. 

संत आणि आपण या विषयावर विवेचन करताना डॉ. मोरे म्हणाले, मराठी भाषेला संतांनी घडवले आहे. जे स्वत:ला मराठी भाषिक समजतात, त्यांचे संतांशी नाते आपोआप जुळले जाते. संतांचा व आपला पारमार्थिक व आध्यात्मिक संबंध आहे. संतांनी चाललेल्या वाटेवरून चाललात, तर आपली वाट सुकर आहे. आजच्या पिढीला प्रबोधनाची गरज असून, त्यांना संतांची शिकवण देणे आवश्यक आहे. आज आपण भाषिक व सांस्कृतिक संकटात आहोत. यातून मार्ग काढण्यासाठी संतांनी निर्माण केलेली भाषिक संपत्ती जोपासणे व त्यात वाढ करण्याची जबाबदारी आपण स्वीकारायला हवी, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. आपली आहे.

डॉ. अतुल भोसले यांनी आभार मानले. कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, जिल्हा परिषद सदस्या प्रियांका ठावरे, कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका उत्तरा भोसले, विनायक भोसले यांच्यासह कराड व वाळवा तालुक्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

म्हणून स्व. जयवंतराव भोसले प्रतिष्ठानची स्थापना...

सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी स्व. जयवंतराव भोसले सामाजिक - सांस्कृतिक प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून कराडमध्ये सातत्याने वैचारिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे डॉ. सुरेश भोसले यांनी यावेळी सांगितले.