Tue, Mar 26, 2019 08:30होमपेज › Satara › पट्टेरी वाघ नसल्याची पवारांना सल

पट्टेरी वाघ नसल्याची पवारांना सल

Published On: May 19 2018 1:36AM | Last Updated: May 18 2018 11:17PMमहाबळेश्‍वर : वार्ताहर  

थंड महाबळेश्‍वरात विश्रांतीसाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना शुक्रवारी आकस्मिक पट्टेरी वाघांची आठवण आली. 1996 साली या जंगलात पट्टेरी वाघ आढळायचे. आता बिबटे दिसतात; पण वाघ दिसत नाहीत, अशी सल पवारांनी बोलून दाखवली. दरम्यान, आ. मकरंद पाटील यांनी महाबळेश्‍वर परिसराच्या पर्यटन विकासवाढीचा प्रस्ताव खा. शरद पवार यांच्यासमोर ठेवल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत बैठक लावण्याची ग्वाही पवारांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार सहकुटुंब तीन चार दिवसांच्या विश्रांतीसाठी महाबळेश्‍वर येथे आले असून ते सध्या विल्सन पॉईंटजवळील ‘दिवाण व्हिला’ बंगल्यात वास्तव्यास आहेत. त्यांचे स्वागत करण्यासाठी तसेच महाबळेश्‍वरच्या काही समस्यांवर चर्चा करण्यासाठी आ. मकरंद पाटील यांच्या समवेत तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी खा. शरद पवार यांनी दिल्ली येथे खास बैठक लावून सर्व प्रश्‍न मार्गी लावू, असे आश्‍वासन दिले. यावेळी बाळासाहेब भिलारे, सभापती रूपाली राजपुरे, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, माजी नगराध्यक्ष किसनराव शिंदे, जिल्हा बँकेचे राजेंद्र राजपुरे, ‘मधुसागर’चे अध्यक्ष संजयबाबा गायकवाड आदी उपस्थित होते. 

आ. मकरंद पाटील म्हणाले, महाबळेश्‍वर ते पोलादपूर हा राष्ट्ीय महामार्ग म्हणून घोषित झाला आहे. हा रस्ता सिमेंट काँक्रीटमध्ये बांधण्यात येणार आहे. परंतु, गेले अनेक महिने या कामाच्या निविदा निघाल्या नाहीत. त्यामुळे या मार्गाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. वाहतुकीची कोंडी, नवीन पॉईंटची निर्मिती यावरही त्यांनी मार्गदर्शन केले. किल्ले प्रतापगड, तापोळा, पार, लामज आदी भागात पर्यटन वाढीला चांगला वाव आहे. या भागातील रस्ते रूंद व मजबूत झाले तर पर्यटन वाढीला नक्‍कीच फायदा होईल. याभागात अनेक ठिकाणी रस्ते मंजूर आहेत.

परंतु, वन्यजीव संरक्षण विभागाच्या परवानगीअभावी रस्त्यांची कामे रखडली आहेत. महाबळेश्‍वर आणि पाचगणीला वेण्णा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. परंतु, धरण तयार झाले तेव्हापासून या धरणाला गळती लागली आहे. अनेक उपाय करूनही धरणाची गळती थांबत नाही,  जंगल राईड वन विभागाने बंद केल्या आहेत, त्या पुन्हा सुरू करून जंगल सफारीचा अनुभव पर्यटकांना उपलब्ध करून द्यावा, गवे आणि रानडुकरांचा उपद्रव आदी विविध समस्या आ. मकरंद पाटील यांनी खा. शरद पवार यांच्यासमोर मांडल्या. 

महाबळेश्‍वर परिसराच्या विकासात तेथील रस्त्यांचे जाळे ही महत्त्वाची भूमिका बजावते. या भागात रस्ते आहेत, परंतु त्याचे रूंदीकरण झाले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. या भागातील रस्त्यांचे प्रश्‍न व वन विभागाच्या अडचणी सोडवण्यासाठी शिष्टमंडळ घेऊन दिल्ली येथेे ना. नितीन गडकरी यांच्याबरोबर बैठक लावून आपण हे सर्व प्रश्‍न एकाचवेळी मार्गी लावू, असे आश्‍वासन खा. शरद पवार यांनी यावेळी दिले.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख बाबुराव सपकाळ, पंचायत समितीच्या उपसभापती अंजनाताई कदम, माजी नगराध्यक्ष बबनराव ढेबे, नगरसेविका विमलताई पार्टे, उज्वला तोष्णीवाल, संजय मोरे आदी उपस्थित होते. 

प्रतापगडावर उदरनिर्वाह कसा चालतो?

महाबळेश्‍वरच्या काही जुन्या आठवणींना खा. शरद पवार यांनी उजाळा दिला. ते म्हणाले की, 1966 साली काँग्रेसच्या अधिवेशनासाठी येथे वाहनाने येत असताना रात्री पट्टेरी वाघ पाहिला. आता असे वाघ येथे दिसत नाहीत, बिबटे दिसतात; पण वाघ नाहीत. यावेळी किल्ले प्रतापगडावरील लोकांचा उदरनिर्वाह कसा चालतो? याची चौकशी खा. शरद पवार यांनी केली. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या काही आठवणींनाही पवार यांनी उजाळा दिला.