Sun, Jul 21, 2019 09:50होमपेज › Satara › प्रकल्पग्रस्तांकडून शासनाचा दहावा

प्रकल्पग्रस्तांकडून शासनाचा दहावा

Published On: Jan 28 2018 1:32AM | Last Updated: Jan 27 2018 9:58PMकराड : प्रतिनिधी 

चाळीस वर्षांपासून दुर्लक्ष केल्याने प्रांताधिकार्‍यांची विनंती धुडकावत मसूर परिसरातील पाच गावच्या प्रकल्पग्रस्तांनी प्रजासत्ताकदिनी कराडमध्ये सामुहिक मुंडण आंदोलन केले. तसेच रस्त्यावरच शासनाचा दहावा घालत भूमिअभिलेखसह पाटबंधारे खात्यांचे काम ठप्प पाडण्याचा इशाराही प्रकल्पग्रस्तांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली दिला आहे.

वाघेश्‍वर, चिचंणी, पिंपरी, केंजळ, कवठे या पाच गावचे प्रकल्पग्रस्त, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, कामगार नेते अनिल घराळ, शिवसंग्राम संघटनेचे शिवाजी चव्हाण हेही या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलकांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत प्रांताधिकार्‍यांची आंदोलन स्थगित करण्याची विनंती धुडकावून लावली होती. 

शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सचिन नलवडे यांच्या नेतृत्वाखाली रामचंद्र जाधव, तानाजी शिंदे, वसंत जाधव, बाबुराव चौधरी, आनंदा शिंदे यांनी मुंडण केले.  यावेळी प्रकल्पग्रस्तांकडून ‘शेतीला पाणी मिळालेच पाहिजे, शेतीला रस्ता मिळालाच पाहिजे, सातबारा उतारे मिळालेच पाहिजे’ यासह विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. या आंदोलनास काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, युवक काँग्रेसचे शैलेश चव्हाण यांच्यासह शिवसंग्रामचे शिवाजी चव्हाण, मनसेचे मनोज माळी यांनीही पाठिंबा दिला. तसेच प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहू, अशी ग्वाहीही यावेळी त्या सर्वांनी दिली.

दरम्यान, या आंदोलनानंतर प्रशासनासोबत आंदोलकांची बैठकही झाली. मंगळवार, 23 फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पाटबंधारे विभाग आणि भूमिअभिलेख विभागाने कार्यवाही करावी. असे न झाल्यास आम्ही प्रकल्पग्रस्त आमचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत संबंधित विभागांच्या कार्यालयात ठिय्या मारणार आहेत. आम्ही संबंधित अधिकार्‍यांना दुसरे कामच करू देणार नाही, असा सज्जड इशाराही यावेळी प्रकल्पग्रस्तांसह सचिन नलवडेंसह त्यांच्या सहकार्‍यांनी दिला आहे.

यापूर्वीच्या खोट्या आश्‍वासनामुळेच आंदोलन ...

प्रांताधिकार्‍यांनी बैठक घेत आश्‍वासने दिली आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल आदरच आहे. मात्र आजवर आमच्या पदरी केवळ निराशाच पडली आहे. 40 वर्षात खूप आश्‍वासने मिळाली, पण त्यांची पूर्तता झालीच नाही. त्यामुळे आता आश्‍वासनांवर अवलंबून रहात आम्ही गप्प बसणार नाही, असेही प्रकल्पग्रस्तांनी यावेळी स्पष्ट केले आहे.