Thu, Apr 25, 2019 17:34होमपेज › Satara › प्रकल्पग्रस्त महिलांचा शासनाला बांगड्यांचा आहेर

प्रकल्पग्रस्त महिलांचा शासनाला बांगड्यांचा आहेर

Published On: Mar 08 2018 6:52PM | Last Updated: Mar 08 2018 6:52PMपाटण : प्रतिनिधी 

कोयना धरणाच्या निर्मितीसाठी ज्या भूमिपुत्रांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला, त्याच भूमिपुत्रांना 60 वर्षांनंतरही न्याय न मिळाल्याच्या निषेधार्थ कोयनानगर (ता. पाटण, सातारा) येथे सुरू असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाच्या ११ व्या दिवशी महिला दिनाच्या निमित्ताने प्रकल्पग्रस्त आंदोलक महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. मोर्चा काढत संबंधित महिलांनी शासनाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. तसेच गेली 60 वर्ष अन्याय करत मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने शासनाला बांगड्यांचा आहेर केला. 

कोयना प्रकल्पग्रस्तांचे आपल्या न्याय व हक्कासाठी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील कोयनानगर येथे 26 फेब्रुवारीपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. गुरूवारी आंदोलनाच्या अकराव्या दिवशी येथे प्रकल्पग्रस्त महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरून थेट महसूल कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी त्यांनी आपल्या मागण्या व शासनाचा नाकर्तेपणा याबाबत घोषणाबाजी केली. तर महसूल कार्यालयात जाऊन तेथे उपस्थित असणारे तहसीलदार रामहरी भोसले यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यात त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे अद्यापही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, पुनर्वसन, महसुली गावे, गावठाण, शासकीय नोकर्‍या, नागरी सुविधांचे प्रश्न यासह कोयना धरण निर्मिती वेळी जे जमीन संपादन रजिस्टर तयार करण्यात आले, त्यावेळी बहुतांशी प्रकल्पग्रस्तांच्या खातेदारांमध्ये संकंलनात त्यांच्या मुलींच्या नावांची नोंद करण्यात आली नाही. त्यामुळे आता त्यांचे पुन्हा संकलन करून या अवार्ड रजिस्टरमध्ये संबंधित मुलींच्या नावांचाही समावेश करण्यात यावा व भावाबरोबरच बहिणींनाही हक्क मिळावा या मागण्यांचे निवेदन त्यांनी शासनाला दिले. याशिवाय निवेदनासोबत एका पाकिटातून शासनाला बांगड्याचा आहेरही केला.