Sat, Sep 22, 2018 09:11होमपेज › Satara › मोफत दूध वाटून सरकारच्या धोरणांचा निषेध 

मोफत दूध वाटून सरकारच्या धोरणांचा निषेध 

Published On: May 04 2018 1:49AM | Last Updated: May 03 2018 10:54PMकराड : प्रतिनिधी 

भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ गुरूवारी  अ.भा.किसान सभेच्या वतीने कराडमध्ये दूध वाटप सत्याग्रह करण्यात आला. येथील तहसील कार्यालयात अधिकारी, कर्मचार्‍यांना मोफत दुधाचे वाटप करून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्या मार्गदर्शनाखाली व कॉ. माणिक अवघडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात कॉ.उदयसिंह थोरात, कॉ. हणमंत हुलवान, कॉ. अशोक यादव, कॉ.जे.एस. पाटील, कॉ. कुमार चिंचकर, सुनील कणसे, प्रकाश शिंदे, अरूण देशमुख, बाबासो पवार, आनंदा मुळगावकर यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. 

माणिक अवघडे म्हणाले, शेतकर्‍यांकडून सोळा, सतरा रूपये प्रतिलिटर दराने गायीचे दूध खरेदी केले जाते. ते दूध चाळीस पंचेचाळीस रूपये दराने विकले जाते. शिवाय ते विकताना एका कॅनचे पाणी मिसळून तीन कॅन तयार केले जातात. यामध्ये दूध उत्पादक शेतकर्‍यांची मोठी फसवणूक केली जात आहे. यामधील दलालांना सरकारचा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे. यावेळी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना मोफत दुधाचे वाटप करण्यात आले. शिवाय तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांनाही दुधाचे वाटप करण्यात आले. 

दूध दर मिळवणारच

गायीच्या दुधाला आधारभूत किंमतीनुसार  प्रतिलिटर 27  रूपये दर मिळणे अपेक्षित आहे. मात्र कोणताच दूध संघ अथवा खासगी व्यापारी हा दर शेतकर्‍यांना देत नाहीत. शेतकर्‍यांकडून  16 ते 17  रूपये प्रति लिटर प्रमाणे दुधाची खरेदी केली जाते. ही शेतकर्‍यांची घोर  फसवणूक आहे. दुधाला 27 रूपये प्रतिलिटर दर पदरात पाडून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार माणिक अवघडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

 Tags : Satara, Prohibition, government, policies, regarding, free, milk, sharing