Thu, Jul 18, 2019 00:57होमपेज › Satara › लोकांचा आग्रह झाल्यास पुन्हा मते मागेन : ना. रामराजे

लोकांचा आग्रह झाल्यास पुन्हा मते मागेन : ना. रामराजे

Published On: Mar 20 2018 1:50AM | Last Updated: Mar 19 2018 11:28PMलोणंद : प्रतिनिधी

खंडाळा तालुक्याने माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. भविष्यात वेळ पडल्यास खंडाळा तालुक्याची आपल्याला गरज लागेल. मतदारसंघ पुनर्रचनेमुळे मत मागायची गरज पडली नव्हती. आता तुम्ही म्हणालात तर पुन्हा मत मागायला येईन; पण योग्य वेळी त्यासंदर्भात बोलू, अशा शब्दांत ना. रामराजे ना. निंबाळकर यांनी निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे अप्रत्यक्षपणे संकेत दिले. मात्र, सातारा लोकसभा की अन्य निवडणूक याबाबत आता लोकांमधून चर्चा सुरू झाली आहे. 

लोणंद येथे वाढदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बालत होते. आ. दीपक चव्हाण, आ. प्रकाश गजभिये, जि. प. सदस्या सौ. दीपाली साळुंखे, पं. स. सभापती मकरंद मोटे, रमेश धायगुडे, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके, डॉ. नितीन सावंत आदी उपस्थित होते. 

ना. रामराजे पुढे म्हणाले, खंडाळा तालुक्यात पाणी आणले, उद्योग आणले. उद्योग पुढे नेण्यासाठी औद्योगिक शांतता आवश्यक आहे, ती पोलिसी बळाने येत नाही. जनतेला त्याबाबत विश्‍वास द्यावा लागतो. सातारा तालुक्यात पहिल्यांदा एमआयडीसी  आली होती. त्यातील 80 टक्के कारखाने निघून गेले. मी उद्योगपतींच्या बाजूने नाही. पण औद्योगिक अशांतता नेत्यांचे पोट भरण्यासाठी होते, हे पटत नाही. कामगारांचे पगार वाढावेत, सवलती मिळाल्या पाहिजेत, असे माझे मत आहे. मी करून ठेवले आहे ते तुमच्यासाठी, दुसर्‍यांना येथे येऊ देणार नाही. मी राजकारणात अपघाताने आलो, ठरवून नाही. माझ्या आमदारकीवेळी एकच काँग्रेस होती. पण खंडाळ्यात नेते दोन होते. त्यांनी भरभरून मदत केली. शंकरराव गाढवे सरांवर आघात झाला आहे, त्यांना एकटे सोडू नका. ते संवेदनशील आहेत असेही ना. रामराजे म्हणाले.  

आ. प्रकाश गजभिये, आ. दिपक चव्हाण, दिपाली साळुंखे, मकरंद मोटे, रमेश धायगुडे, लक्षणराव शेळके, दतात्रय बिचुकले, एन. डी. क्षीरसागर, विश्‍वास शिरतोडे, नंदाताई गायकवाड, हणमंत शेळके आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक सागर शेळके यांनी केले. गजेंद्र मुसळे यांनी सूत्रसंचालन केले. योगेश क्षीरसागर यांनी मानले.

माझा जन्म अमावस्येचा, नाद करू नका...

माझा जन्म पाडव्याच्या अमावस्येचा आहे. त्यामुळे कोणीही नादाला लागू नये. तुम्ही म्हणताय मी 100 वर्ष जगावे. पण जितकी वर्ष जगेन ते काही आमदार, खासदारांना पटणार नाही. माझा त्रास त्यांना शंभर टक्के होणार. माझं काही जमणार नाही अन् मी सुट्टी देणार नाही, अशा शब्दात राजकीय संघर्ष सुरूच राहणार असल्याचे ना. रामराजे यांनी स्पष्ट केले. 

 

Tags ; satara, lonand news, Ramaraje Nimbalkar, birthday,