Thu, Jun 27, 2019 02:15होमपेज › Satara › जिल्ह्यात दिव्यांगांची फरफट सुरूच

जिल्ह्यात दिव्यांगांची फरफट सुरूच

Published On: Dec 03 2017 1:03AM | Last Updated: Dec 02 2017 10:39PM

बुकमार्क करा

सातारा : प्रवीण शिंगटे

ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  एकूण अर्थसंकल्पाच्या 3 टक्के निधी दिव्यांगांसाठी राखीव  ठेवण्याची  तरतूद आहे. या निधीचा दिव्यांगांसाठी वापर करावा, अशा सूचना असताना तो निधी खर्च होत नाही. त्यामुळे शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेल्या नागरिकांची आजही फरफट सुरूच आहेे. आपल्या हक्काचा पैसा मिळावा यासाठी आता दिव्यांगांना आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नाही.

सन्मानाने जगता यावे, यासाठी शासनाने अर्थसंकल्पातील काही निधीची  तरतूद  केली आहे.  त्याचबरोबर अपंग कल्याण आयुक्त कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. अपंग वित्त व विकास महामंडळही कार्यरत आहे. मात्र, एवढे असूनही राज्यातील दिव्यांग विकासाच्या योजनांपासून  वंचित राहत आहेत. गावपातळीवरील  ग्रामपंचायतीमधील राजकारणात आजही दिव्यांगांची फारफट होताना दिसत आहे. आंतरजातीय विवाह करणार्‍या  जोडप्यांप्रमाणेच विवाह करणार्‍या दिव्यांग जोडप्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी योजना सुरू करण्यात आली. मात्र यासाठी फक्त 7 अर्ज आले असून त्यातही त्रुटी असल्याने ते धूळखात पडले आहेत.

जिल्हा परिषदेच्या ग्रामंपचायत विभागामार्फत 2017 - 18 मध्ये 3 टक्के निधीतून सुमारे 34 योजनांसाठी दिव्यांगांसाठी 2 कोटी 26 लाख 23 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र ऑक्टोबरअखेर  सातारा 10 लाख 61 हजार, कोरेगाव 4 लाख 18 हजार , खटाव 4 लाख 52 हजार, माण 4 लाख 20 हजार, फलटण 5 लाख 69 हजार, खंडाळा 5 लाख 51 हजार, वाई 2 लाख 76 हजार, जावली 1 लाख 54 हजार, महाबळेश्‍वर 86 हजार, पाटण 5 लाख 46 हजार रूपये असे मिळून 45 लाख 33 हजार रुपयांचा निधी खर्च झाला आहे. तर कराड तालुक्यात अद्यापही अंपगाचा निधी खर्च झाला नसल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात एकूण निधीच्या 20 टक्के निधीच दिव्यांगांसाठी खर्च झाला असून अद्यापही 80 टक्के निधी शिल्लक आहे. त्यामुळे हा निधी दिव्यांगांना कधी मिळणार? हा प्रश्‍नही अनुत्तरीच आहे. त्यांच्या उत्कर्षासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या मात्र त्याची पुरेशा प्रमाणात अंमलबजावणी होताना दिसत नाही.