Fri, Jun 05, 2020 20:16होमपेज › Satara › वळवाच्या पहिल्याच पावसाने निकृष्ट कामाचा झाला पंचनामा

वीज मंडळाच्या अब्रूचे धिंडवडे

Published On: May 19 2018 1:36AM | Last Updated: May 18 2018 8:37PMसातारा : प्रतिनिधी

वळीव पावसाच्या गुरुवारी रात्री झालेल्या पहिल्याच पावसाने वीज मंडळाच्या अब्रूचे अक्षरश: धिंडवडे काढले. पावसाला सुरुवात होताच गायब झालेल्या विजेचा शुक्रवारी दुपारपर्यंत थांगपताच नव्हता. तोपर्यंत रात्रीच्या काळोखात अवघा जिल्हा होरपळून निघाला. जिल्ह्यात ठिकठिकाणी विजेचा खेळखंडोबा झाला. विजेवर चालणारे पंखे, एसी, कुलर  आदी उपकरणे बंद पडली. त्यामुळे जनतेचे अतोनात हाल झाले. घामाळलेल्या नागरिकांनी अवघी रात्र जागून काढली.

विशेषत: लहान मुले, वृद्ध होरपळून निघाले. प्रचंड उलघाल व कोंडमारा होत असताना ‘आत्ता लाईट येईल मग लाईट येईल’अशा वैतागलेल्या प्रतीक्षेतच अनेकांनी  अख्खी रात्र घराबाहेर, गॅलरीत व टेरेसवर घालवली. या नागरिकांनी वीज वितरणच्या अधिकार्‍यांना शिव्यांची लाखोली वाहिली. दरम्यान, वळवाच्या तडाख्यात ठिकठिकाणी विजेच्या खांबांनी अक्षरश: लोटांगण घातले. विद्युत मंडळाच्या निकृष्ट कारभाराचा या पावसाने पंचनामा केला असताना अधीक्षक अभियंत्यांसह वीज मंडळाचे अनेक अधिकारी मात्र डाराडूर झोपल्याचे चित्र पहावयास मिळाले. 

अधिकार्‍यांनाच द्या ‘शॉक’

लोंबकळत्या तारा मरणाला निमंत्रण देत आहेत. याकडे वीज मंडळाचे अजिबात लक्ष नाही. केवळ अनधिकृत वीज मागच्या दाराने जोडण्यासाठी खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून मलिदा कमावण्याच्या पाठीमागे सध्या वीज मंडळ लागल्याने  आता अधिकार्‍यांसह या यंत्रणेलाच विजेचा शॉक देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याशिवाय वीज मंडळाचा कारभार ताळ्यावर येणार नाही, अशीच सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्यांची भावना निर्माण झाली आहे.

संजय साळीसायब, तुमाला कशी हो लागली साखर झोप?

पहिल्याच वळीवाच्या पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी जनतेची रात्रभर अंधारात उलघाल अन् घालमेल झाली. लहान बाळांचे तर नको इतके हाल झाले. वृद्धांना उकाडा असह्य झाला. ठिकठिकाणी घामाळलेली जनता काळोखात  तडफडत राहिली. त्यावेळी या सातारा जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता संजय साळी कुठे होते बरं? त्यांना जनतेची ही अवस्था दिसली नाही  का? की कुणी त्यांना सांगितलीही नाही? अशा अचानक उद्भवलेल्या कठीण प्रसंगी तातडीने सूत्रे हातात घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांना कामाला लावत सर्वत्र वीज पुरवठा सुरळीत करुन जनतेला दिलासा  द्यावा, असे संजय साळीसाहेब तुम्हाला का बरे वाटले नाही? जनतेची तगमग होत  असताना तुम्ही मात्र एसीमध्ये डाराडूर झोपला होता. संजय साळीसाहेब तुम्हीच सांगा जनतेची अशी अवस्था असताना तुम्हाला कशी बरं साखर झोप लागली? बघा आता जरा विचार कराच. नाही तर सातारी हिसका सोसायचा न्हाय बरं.

रात्रभर घालमेल अन् कोंडमारा

गुरुवारी सायंकाळी सातारा शहरात  वळवाने हजेरी लावली. त्यानंतरही  पावसाची भुरभूर सुरुच राहिली. अवकाशात विजांचा कडकडाट सुरुच होता. या वातावरणाने वीज मंडळ भेदरुन गेले की काय कुणास ठाऊक. काही क्षणात लाईट गायब झाली. शहरात ठिकठिकाणी तसेच उपनगरांमध्येही लाईटचा लपाछपीचा खेळ सुरु होता. विसावानाका, बॉम्बे रेस्टॉरंट, सदरबझार परिसरात  लाईट अभावी नागरिकांची चांगलीच तडफड झाली. अगोदरच उकाड्याने हैराण झाले असताना लाईट नसल्यामुळे पंखा, एसी, कूलर बंद पडले. त्यामुळे नागरिकांची प्रचंड घालमेल झाली. लाईट  येऊन पंख्यांची पाती गरागरा फिरत्यात न फिरत्यात तोच लाईट पुन्हा जात होती. त्यामुळे गरमीने त्रस्त झालेले नागरिक वैतागून गेले. काहींनी घराबाहेरील मोकळ्या जागेत तर काहींनी गॅलरीत व टेरेसवरही आपला मुक्‍काम हलवला.

मीटर बसवण्याआधीच वीज बिल

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने  मीटर बसवण्याच्या अगोदरच ग्राहकांना वीज बिल देण्याचा  सपाटा लावल्याचा अजब प्रकार वारंवार समोर येत असल्याने वीज मंडळाचे तीन तेरा वाजत आहेत. त्यामुळे वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. येथील  ग्राहकाला वीज जोडणी दिली नसतानाही वीज बिल देण्याचा प्रकार महावितरण कंपनीने  सहा महिन्यांपूर्वी केला होता, असे अनेक किस्से वारंवार घडत आहेत. ग्राहकाला वीज जोडणी दिली नसतानाही वीज बिल देण्याचा प्रकार महावितरण कंपनीने नव्याने सुरू  केला आहे का? असा प्रश्‍न  उपस्थित झाला आहे.

जावलीत 19 तास वीज पुरवठा खंडित

जावलीत गुरुवारी वादळ वार्‍यासह झालेल्या पावसामुळे सोमर्डीसह एकूण 3 ठिकाणचे वीज खांब कोसळले. त्यामुळे तालुक्यातील करहर कुडाळ, पाचगणी पायथ्याच्या भागामध्ये सुमारे 19 तास वीज पुरवठा खंडित होऊन भर उन्हाळ्यात पाणी टंचाईसह तीव्र उकड्याला सामोरे जाण्याची वेळ आली.

जावलीतील वीज मंडळाच्या बट्ट्याबोळाने गुरुवारी कहर केला. वादळ वार्‍याचे  निमित्त नक्‍कीच आहे. मात्र, वीज वितरण विभागाच्या वेळकाढूपणामुळे जावलीला रात्रभर व शुक्रवारी दिवसभर लाईट शोधण्याची वेळ आली. शेतकर्‍याच्या शेती पंपांसह बाजारपेठेचे त्याचबरोबर लघु उद्योगाचेही मोठ्या प्रमाणात विजेअभावी नुकसान झाले. 

थंड पेय, आईस्क्रिमचे मोठे नुकसान

कुडाळ करहर, सायगाव भागातील अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे थंड पेय, आईस्क्रिम यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर अनेक ठिकाणी वीज मंडळाच्या नियुक्‍त केलेल्या ठेकेदारांनी विजेच्या जोडलेल्या  निकृष्ट दर्जाचे खांब पडले. अनेक ठिकाणचे वाकले आहेत. अनेक वीज जोड यंत्रणा, डीपी उघड्यावर धोकादायक अवस्थेत आहेत. 

फलटणमध्ये नागरिकांचा महावितरणवर भरवसा न्हाय ना...

‘महावितरणचा कारभार आणि भ्रष्टाचाराने भरला दरबार, ठेकेदार चालवतात कारभार अन् जनतेच्या डोक्यावर नुसताच बिलांचा भार’, अशी अवस्था असल्याने नागरिकांचा ‘महावितरणवर भरवसा न्हाय ना’, असे चित्र पहायला मिळत आहे. अवकाळीच्या पहिल्याच वादळात महावितरणचा निकृष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. गुरूवारी सायंकाळी आलेल्या जोरदार वार्‍यांनी विजेचा खेळखंडोबा  झाला होता. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील वीज गायब झाली होती. यामुळे नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागला. 

फलटण शहर व ग्रामीण भागात सर्वच ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाची कामे झाली असल्याने कुठे खांब वाकले तर कुठे मोडून पडले. अनेक ठिकाणी तारा तुटल्याने तासन् तास वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे महावितरणच्या कामाला नागरिक अक्षरश: वैतागले आहे. तालुक्यात पाणी आहे पण वीज नाही आणि वीज नसल्याने पिक येत नाही, अशी परिस्थिती झाली आहे. 

तालुक्यात 58 ठिकाणी अजून जळलेले ट्रान्स्फॉर्मर बसवले नाहीत. तर 2500 हून अधिक ठिकाणी अजून शेतकर्‍यांना वीज जोडून मिळाली नाही. निंबळक (वाजेगाव) येथे शेतातून जाणारी लाईन बदलण्यासाठी अनेक तक्रारी केल्यानंतरही ही लाईन बदलली नाही. याच लाईनचा शॉक लागून दाम्पत्याला आपला जीव गमवावा लागला होता. राजाळे येथेही शॉक लागल्याने एक शेतकरी ठार झाला होता. 
दोन वर्षांपूर्वी 30 हेक्टरवरील पिके शॉटसकिर्र्टमुळे जळाली. यामध्ये शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अद्यापही या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. तर गेल्यावर्षी 55 हेक्टरवरील पीक शॉटसर्किटमुळे आगीत खाक झाले आहे.

मात्र, गेंड्याची कातडी पांघरलेल्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना शेतकरी मेला काय आणि जगला काय त्यांना फक्‍त थेट ठेकेदार जगवायचे पडले आहे. त्यामुळे महावितरणचा कारभार सुधारण्यासाठी प्रथम ठेकेदारांची चौकशी करून ते कोणत्या अधिकार्‍यांची हातमिळवणी करून निकृष्ट दर्जाची कामे करतात हे पाहणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.