Tue, Jul 16, 2019 09:49होमपेज › Satara › उपेक्षित समाजाची नगरसेवकांकडून उपेक्षाच 

उपेक्षित समाजाची नगरसेवकांकडून उपेक्षाच 

Published On: Dec 14 2017 1:47AM | Last Updated: Dec 13 2017 10:55PM

बुकमार्क करा

कराड: अशोक मोहने 

पहाटे चार वाजता कडाक्याची थंडी असो की मुसळधार पाऊस असो, अंधारात हातात झाडू घेऊन शहराचे रस्ते साफ करणारे कर्मचारी आणि वर्षानुवर्षे शहराची घाण काढणारा मेहतर समाज प्रामुख्याने वास्तव्यास आहे तो म्हणजे प्रभाग क्रमांक आठ. उपेक्षित समाजाच्या उन्नतीसाठी शासन ढिगभर योजना राबवत असली तरी या योजना अद्याप येथे पोहचल्याच नाहीत, हे वास्तव या प्रभागाचे आहे. 

प्रभाग 8 मध्ये बुधवार पेठ, म.फुले नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, रविवार पेठ, कुंभार गल्ली, बुरूड गल्ली आदी भागाचा समावेश होतो. सध्या या प्रभागाचे नेतृत्व उपनगराध्यक्ष जयवंत पाटील व माया भोसले करत आहेत. पालिकेत बहुमत असताना आणि बर्‍यापैकी अधिकार असताना जयवंत पाटील यांनी प्रामुख्याने या बकाल वस्त्या आणि कर्मचार्‍यांच्या उन्नतीसाठी लक्ष घालावे अशी तेथील जनतेची अपेक्षा आहे. पण अपेक्षा भंगाचे दु:खच त्यांच्या वाट्याला आले आहे. 

मेहतर समाज वर्षानुवर्षे ज्या चाळीत रहात आहे ती चाळ धोकायदायक स्थितीत आहे. त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन होणे गरजेचे आहे. तो समाजही पुनवर्र्सनाच्या प्रतीक्षेत आहे. अपवाद वगळता शिक्षणाचा अभाव या समाजात आहे. मुलांच्या शिक्षणाबरोबर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे असताना हा समाज उपेक्षित जीवन जगत आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाल्मिकी समाज योजनेअंतर्गत घरकुल योजना, नवबौध्दांसाठी घरकुल योजना, बार्टीचे उपक्रम, शासनामार्फत पालिका कार्यक्षेत्रात राबविले जातात, मात्र या योजनांची प्रभावी अंमलबजावणी येथे होताना दिसत नाही. बकाल वस्त्या हे तेथील आजचे वास्तव. पालिका प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अनेक लाभार्थ्यांचे प्रस्ताव पालिका दफ्तरी धूळ खात पडून आहेत.

रोजगार निर्मिती करणे, सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देणे, मागासवर्गीय समाजातील महिला बचत गटांना रोजगार निर्मिती करणे, असे अनेक कार्यक्रम शासन राबवत आहे पण ते कराड पालिकेच्या कार्यक्षेत्रात किती प्रभावीपणे राबविले जातात हा प्रश्‍नच आहे. निवडणूक काळात ज्या आस्थेने उपेक्षित समाजाची विचारपूस होताना दिसले, निवडणुकीनंतर मात्र या उलट स्थिती तेथील नागरिकांना अनुभवास येत आहे.