Mon, Jun 17, 2019 02:12होमपेज › Satara › व्यसनमुक्‍त मंडळांना पोलिसांकडून बक्षीस

व्यसनमुक्‍त मंडळांना पोलिसांकडून बक्षीस

Published On: Apr 11 2018 5:29PM | Last Updated: Apr 11 2018 8:07PMकराड : प्रतिनिधी

कराड तालुक्यासह शहरातील ज्या मंडळातील सर्व सदस्य व्यसनमुक्त होतील, त्या मंडळाला प्रशासनाकडून पाच हजार एक रूपयांचे बक्षीस सातार्‍याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी जाहीर केले आहे. तसेच एखादा कार्यकर्ता सदस्य होत असताना त्याच्याकडून तो सर्व प्रकारच्या व्यसनांपासून लांब राहिल, कोणतेही व्यसन करणार नसल्याचे शपथपत्र राजकीय पक्ष, संघटनांसह मंडळांनी घेण्याचे आवाहनही संदीप पाटील यांनी केले आहे.

कराडच्या शासकीय विश्रामगृहात शांतता कमिटीची बैठक झाली. या बैठकीस प्रांताधिकारी हिम्मत खराडे, पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, तहसीलदर राजेंद्र शेळके, पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्यासह लोकशाही आघाडीचे अध्यक्ष नगरसेवक सौरभ पाटील, विनायक पावसकर, बांधकाम सभापती हणमंत पवार, फारूख पटवेकर, अल्ताफ शिकलगार यांच्यासह विविध संघटना, पक्षाचे पदाधिकारी तसेच शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. 

संदीप पाटील म्हणाले, महापुरूषांची जयंती तसेच पुण्यतिथी साजरी करताना त्यांच्या विचारांना साजेसे वर्तन मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी करणे आवश्यक आहे. व्यसन विशेषत: दारू पिऊन कार्यकर्ते एखादे कृत्य करतात आणि त्यामुळेच अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व्यसनांपासून लांब राहिले पाहिजे, असे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे. 

येथील प्रीतीसंगम बाग परिसरात पोलिस चौकीची मागणी करण्यात आली आहे. ती मागणी मान्य करत याठिकाणी बंदोबस्तासाठी दोन पोलिस कर्मचार्‍यांची नियुक्ती केली जाईल, असेही संदीप पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच उत्सव साजरा करण्याबाबत काही अन्य सूचनाही यावेळी त्यांनी केल्या. यावेळी प्रांताधिकारी हिम्मत खराडे, पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी कार्यकर्त्यांसह पदाधिकार्‍यांना प्रशासनाला सहकार्याच आवाहन केले. तर नगरसेवक सौरभ पाटील, आप्पा गायकवाड, अल्ताफ शिकलगार, विनायक पावसकर यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी आपआपली मते मांडली. पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी आभार मानले.

फ्लेक्स लावा पण कार्यकर्ताही नियुक्त करा ...

परवानगी घेऊन फ्लेक्स लावा, पण ज्या ठिकाणी फ्लेक्स असेल त्याठिकाणी मंडळांनी एक कार्यकर्ता नेमावा. पोलिसांची संख्या कमी असून बंदोबस्तासह कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांची ताकद खर्च होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी फ्लेक्सवर लक्ष ठेवण्यासाठी तो लावणार्‍यांनी एका कार्यकर्त्यांची नियुक्ती करावी, अशी सूचनाही संदीप पाटील यांनी केली आहे.

 

Tags :  satara, police superintendents, Addiction free circle