Fri, Apr 19, 2019 11:58होमपेज › Satara › एव्हरेस्टनंतर सातारकन्या प्रियांका ल्होत्से मोहिमेवर

एव्हरेस्टनंतर सातारकन्या प्रियांका ल्होत्से मोहिमेवर

Published On: Apr 14 2018 10:33AM | Last Updated: Apr 13 2018 9:01PMसातारा : दीपक देशमुख

गिर्यारोहण म्हणजे अत्यंत साहसी अन् तेवढाच कार्यक्षमतेची कसोटी  पाहणारा थरारक खेळच. त्यातही अस्मानाला धाक घालू पाहणारी हिमालयाची शिखरे सर करणे म्हणजे येर्‍या-गबाळ्याचे कामच नव्हे. एका छोट्याशा चुकीला येथे माफी नाही. परंतु, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर सातारची सुकन्या कु. प्रियांका मोहिते जगातील चौथ्या क्रमांकाचे उंच शिखर ल्होत्से (नेपाळ) सर करणार आहे. 

सर्वसामान्य कुटुंबातील मुलीच्या या साहसाला समाजातील दानशुरांचीही गरज आहे. गिर्यारोहण हा साहसी खेळ आता लोकप्रिय होऊ लागला आहे. तथापि, या खेळात गिर्यारोहकाच्या सामर्थ्याचा, चिकाटीचा, सहनशक्तीचा त्याचबरोबर निर्णयक्षमतेचाही कस लागतो. त्यातच गिर्यारोहण मोहीम हिमालयीन शिखरांवर असेल तर अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. अनेकदा निसर्गाचा रुद्रावतार, वेगाने वाहणारे  अतिथंड वारे, प्रत्येक क्षणी निसर्ग पुढे काय वाढून ठेवेल, याचा नेम नसतो. तथापि, पर्वतराजीच्या प्रेमात पडलेले अनेक साहसवीर शिखरांच्या दिशेने कुच करत असतात. मराठ्यांची राजधानी साताराची सुकन्या कु. प्रियांका मोहिते हिनेही असामान्य धैर्य दाखवत जगातील सर्वात उंच 8848 मिटर उंचीचे माउंट एव्हरेस्ट शिखर सर केले होते.

त्यानंतर आता प्रियांकाने जगातील चौथ्या क्रमांकाचे ल्होत्से शिखर (समुद्रसपाटीपासून उंची 8516मि.) सर करण्याचा निर्धार केला आहे. अत्यंत अवघड असलेल्या या शिखराची चढाई 85 अंशांत आहे. ही आव्हानात्मक मोहीम पार पाडल्यास ल्होत्से शिखर पादाक्रांत करणारी ती जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरेल. तथापि, सतत रंग बदलणार्‍या निसर्गाच्या आव्हानाबरोबरच अशा मोहिमेचा खर्चही अफाट, सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतो. यासाठी तिच्या धाडसाला गरज आहे ती समाजातील दानशूरांची.  मोहीम फत्ते करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळाल्यास तिचे मनोबल आणखी  उंचावून सातारच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. आर्थिक सहाय्यासाठी 8421120446 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रियांकाने केले आहे.