Wed, Mar 27, 2019 02:14होमपेज › Satara › जिल्ह्यात तीन आरोग्य केंद्रांचे खासगीकरण

जिल्ह्यात तीन आरोग्य केंद्रांचे खासगीकरण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

ग्रामीण रुग्णालय व आरोग्य केंद्रांच्या खासगीकरणालाही आता प्रारंभ झाला असून, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर येथील ग्रामीण रुग्णालय व तळदेव, तापोळा प्राथमिक आरोग्य केंद्र एक वर्षाकरिता प्रायोगिक तत्त्वावर पाचगणी येथील बेल एअर हॉस्पिटलला चालवण्यास देण्यात आले आहेत. वैद्यकीय क्षेत्राचे हे खासगीकरण नागरिकांच्या कितपत पचनी पडतेय, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

महाबळेश्‍वर येथील ग्रामीण रुग्णालय व तळदेव, तापोळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची रिक्‍त पदे राहत असल्याने, तेथील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा व सुविधा मिळत नव्हत्या. तळदेव व तापोळा आरोग्य केंद्रामार्फत दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यात येत होत्या. मात्र, या आरोग्य केंद्रात काम करणे म्हणजे अधिकारी व कर्मचार्‍यांना शिक्षा असल्यासारखेच वाटत होते. त्यामुळे अनेक कर्मचारी बदली होऊनही संबंधित ठिकाणी हजर राहत नव्हते. त्यामुळे या भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यास अडचणी येत होत्या. तसेच आरोग्य विभागाच्या या ढिसाळ कारभारामुळे येथील स्थानिक नागरिकांनी आरोग्य केंद्राला टाळे ठोकले होते. यावेळी जि.प. पदाधिकारी व अधिकार्‍यांनी भेटी देवून  वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांची वारंवार कानउघडणी केली होती. तरीही संबंधित कर्मचार्‍यांवर काहीही फरक पडत नव्हता.

आरोग्य सेवा संचालकांनी सादर केलेला प्रस्ताव विचारात घेवून महाबळेश्‍वर येथील ग्रामीण रूग्णालय व तळदेव, तापोळा प्राथमिक आरोग्य केंद्र स्वयंसेवी संस्थेस प्रायोगिक तत्वावर चालवण्यास देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शासनाने इंडियन रेड क्रॉस सोसायटी, पाचगणी (महाबळेश्‍वर) संचलित बेल एअर हॉस्पिटल या संस्थेस 1 वर्षाच्या  कालावधीसाठी प्रायोगिक तत्वावर चालवण्यास देण्यात आले आहे.

रूग्णालयात केवळ वैद्यकीय सेवा व राज्य शासन पुरस्कृत आरोग्य विषयक कार्यक्रमांची अंमलबजावणी  करणे या संस्थेवर बंधनकारक केले आहे. केंद्र व राज्य शासनाने विविध स्तरावर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम यशस्वी करण्याच्या दृष्टीने काही वार्षिक उद्दीष्टेही दिली आहेत. ती उद्दिष्टे पूर्ण करणे बंधनकारक आहे.आरोग्य कार्यक्रमाचा नियमीत आढावा घेण्यासाठी बैठकांना हजर राहणे बंधनकारक आहे. या 3 रूग्णालयांवर  औषधे, उपकरणे, यंत्रसामुग्री, वेतन आदी बाबीवरील खर्च किंवा संस्थेने केलेला खर्च यापैकी जी रक्कम कमी असेल त्या प्रमाणात अनुदान देण्यात येणार आहे. शासनामार्फत ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सेवा देण्यात येतात. त्यावरील आंतररुग्ण व बाह्यरुग्ण सेवेसाठी रुग्णपत्रिका घेताना प्रत्येक रुग्णपत्रिकेमागे शासकीय दराप्रमाणे पैसे घेवून सेवा देणे बंधनकारक आहे, असेही आरोग्य विभागाच्या अवर सचिव प्रदीप बलकवडे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

Tags : Privateization, three health, centers, satara district, satara news


  •