Wed, Jul 15, 2020 18:23होमपेज › Satara › पृथ्वीराज चव्हाण हे अभ्यासू, लोकप्रिय मुख्यमंत्री 

पृथ्वीराज चव्हाण हे अभ्यासू, लोकप्रिय मुख्यमंत्री 

Published On: Dec 11 2017 1:35AM | Last Updated: Dec 10 2017 10:52PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकारणात संक्रमण परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयामध्ये मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काम करत असणारे पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोपविली. त्यांनी अभ्यासू वृत्तीने व प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवामुळे महाराष्ट्रामध्ये लोकहिताचे चांगले निर्णय घेतले आणि सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीने हातळून दाखविले.त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या निर्णय क्षमतेवर होणार्‍या टीकेमध्ये तत्य नाही, असे उद‍्गार सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. आनंदराव पाटील यांनी काढले. 

महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासामध्ये अनेक लोकप्रिय नेत्याचे योगदान आहे. महाराष्ट्राची पायाभरणी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या हातून घडली. त्यानंतर राज्याचे नेतृत्व करण्याची संधी पृथ्वीराज चव्हाण यांच्या रुपाने पुन्हा कराडला मिळाली असल्याचे सांगत आ. पाटील म्हणाले, महाराष्ट्रात प्रशासकीय निर्णय असोत किंवा शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय असोत, बाबांनी योग्य वेळी योग्य निर्णय अभ्यासपूर्वक घेवून सामान्य जनतेला दिलासा दिला.

त्यांच्या काही निर्णयामध्ये राजीव गांधी जीवनदायी योजना असो, खंडकरी शेतकर्‍यांना जमीन परत मिळण्याचा निर्णय असो, दुष्काळी भागात साखळी बंधार्‍यांचे निर्णय, रूग्णांकरिता 108 अ‍ॅम्ब्युलन्सची सेवा असो, असे अनेक निर्णय पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात मार्गी लागले आहेत. व्यक्‍तीशः निर्णय न घेता सामान्य जनता केंद्रबिंदू मानून त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले.

सातारा जिल्ह्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी रस्ते चौपदरीकरण, आंतरराष्ट्रीय भूकंप संशोधन केंद्र, विद्यार्थ्यांकरिता कृषि महाविद्यालय, आरटीओ ऑफीसची स्थापना, साखळी सिमेंट बंधारे ज्यांची अंमलबजावणी झाली आहे.  पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेल्या निर्णयांचा सामान्य जनतेला लाभ होत आहे. अशा व्यक्‍तीबद्दल नारायण राणे यांनी काय बोलावे हे सांगण्याचा माझा संबंध नाही. तरी त्यांनी यापूर्वीही काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्यांवर टीका केली आहे.

कालच्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांच्या निर्णय क्षमतेवर टीका केली त्याबद्दल जिल्ह्यातील काँग्रेसजन खेद व्यक्‍त करत आहेत, असेही आ. पाटील यांनी सांगितले. यावेळी राजेंद्र चव्हाण, अविनाश नलवडे, प्रदीप जाधव, मनोहर शिंदे, जयवंत उर्फ बंडा नाना जगताप, स्मिता हुलवान, अर्चना पाटील यांनीही बाबांवरील टीकेबद्दल खेद व्यक्‍त केला.