Sat, May 25, 2019 22:34होमपेज › Satara › ‘तुम्ही तुमच्या जागेवर जा, आम्हाला आमची जागा द्या’

‘तुम्ही तुमच्या जागेवर जा, आम्हाला आमची जागा द्या’

Published On: May 16 2018 1:37AM | Last Updated: May 15 2018 8:33PMमाजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण आणि माजी सहकार मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मनोमिलनाच्या गप्पांचा आनंद जिल्हावासीय (विशेषत: कराडकर) लुटत आहेत. जे कधी होणारच नाही त्या मिलनाच्या, त्यानंतरच्या गळाभेटीच्या आणि मधुमिलनाच्या गप्पा पारावर सुरु आहेत. मात्र या दोन टोकाच्या नेत्यांमधील एकमेकांप्रती असलेला दु:श्‍वास,अहंकार तसेच माझी जागा मला द्या, तुम्ही तुमच्या जागेवर जा! ही उंडाळकर गटाची असलेली आग्रही मागणी या प्रमुख तीन कारणांमुळे काका-बाबा गटाच्या एकत्रिकरणावर प्रश्‍नचिन्ह आहे. 

सलग सात टर्म कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या विलासराव पाटील-उंडाळकर यांचे सातारा जिल्ह्यावर अनेक वर्षे प्रभुत्व होते. 2010 साली अनपेक्षितरित्या काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी दिल्लीहून निवड झाली. यानंतर उंडाळकर गटाला हळूहळू ग्रहण लागले. काँग्रेसचे आमदार असूनही 2010 ते 2014 या काळात पृथ्वीराज चव्हाण यांनी उंडाळकरांना फारसे जवळ केले नाही. 2014 विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री पदावरील पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचा निर्णय काँगे्रस पक्षाने घेतला. सक्षम असूनही उंडाळकर यांना डावलण्यात आले आणि पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने दक्षिणचे तिकिट दिले. उंडाळकरांनी कार्यकर्त्यांच्या रेट्याच्या जोरावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. भाजपचे अतुल भोसलेही रिंगणात होते. मुख्यमंत्री पदाचे वलय, मतदारसंघात दिलेला कोट्यवधी रुपयांचा निधी आणि सत्‍ता आली तर कराडला पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळेल, या आशेवर कराडकरांनी पृथ्वीराज चव्हाण यांना निवडून दिले. हा इतिहास ताजा आहे. 

2014 पासून गेल्या चार वर्षांत पृथ्वीराज चव्हाण आणि विलासराव उंडाळकर यांच्या गटात फारसे सख्य राहिले नाही. या कालावधीत झालेल्या सर्व निवडणुका उंडाळकर गटाने अपक्ष म्हणून लढवल्या आहेत. वास्तविक, 2014 च्या निवडणुकीत उंडाळकरांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ऑफर होती. काकांनी त्यावेळी राष्ट्रवादीचे तिकिट घेतले असते तर कदाचित निकालही वेगळा दिसला असता. भाजपानेही त्यांना तिकिटासाठी पायघड्या घातल्या होत्या. मात्र काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीत तयार झालेल्या काकांनी काँग्रेस सोडून कुठल्याही पक्षात जाण्यास नकार दिला आणि याच मुद्यावर गेल्या काही वर्षांत काकांचे काँग्रेस पातळीवर वजन व ‘इमेज’ आणखी वाढली आहे. राजकीय कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने डिसेंबर 2017 मध्ये काकांनी कराडात फार मोठे शक्‍तीप्रदर्शन केले.

कोणतीही सत्ता नसताना, आमदारकी नसताना काकांच्या या मेळाव्यास भर उन्हात हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्यासहित अनेक काँग्रेसचे दिग्गज, ज्येष्ठ पत्रकार यांच्यासमोर मार्गदर्शन करताना उंडाळकरांनी काँग्रेस माझ्या रक्‍तात आहे. काँग्रेसच देशाला तारू शकते, असा नारा दिला.  त्यानंतरच्या काळात माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या उपस्थितीत दक्षिणेत कार्यक्रम झाले. काही दिवसांपूर्वी विलासराव उंडाळकर यांनी एका कार्यक्रमात काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे रहा, असे पुन्हा आवाहन करताना राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारविरोधात हल्लाबोल केला होता. या पार्श्‍वभूमीवर विलासराव पाटील-उंडाळकर यांचा दिल्ली दरबारी संपर्क वाढला  आणि उंडाळकर यांना पुन्हा कराड दक्षिणचे तिकिट मिळण्यासाठी जोरदार लॉबिंग आतापासूनच सुरु आहे, अशा चर्चा होत्या. दरम्यान, कधी पुण्यातून, कधी कराडमधून तर कधी मुंबईहून सोशल मिडीयातून  पृथ्वीराज चव्हाण दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होणार, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. बाबा दिल्लीला जाणार आणि काकांना कराड दक्षिण मतदारसंघ दिला जाणार, उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण गट एकत्र येणार, अशा वावड्या उठल्या. दरम्यान, पोतले येथील एका कार्यक्रमात उंडाळकर काकांनी येणारी विधानसभा मी लढणार नाही अशी घोषणा केली. मात्र त्याच कार्यक्रमात त्यांनी भावी आमदार रयत संघटनेचाच असेल, असेही स्पष्ट केले. 

विधानसभा लढणार नाही या काकांच्या घोषणेमुळे अत्यानंद झालेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत बोलताना आमच्या दोघांच्यात काही वाद नव्हताच. उंडाळकरांचे तिकिट मी नव्हे तर पक्षाने कापले होते, असे वक्‍तव्य केल्यानंतर कार्यकर्त्यांनाही गुदगुल्या झाल्या आणि दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांना ऊत आला. दोन दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोमिलनाबाबत मला काहीच माहिती नाही, असे म्हणत विधान परिषदेवर उंडाळकर गेल्यास मला आनंदच होईल, अशी गुगली टाकली. पृथ्वीराज चव्हाण आणि विलासराव उंडाळकर यांची गेल्या काही वर्षांतील राजकारण करण्याची पद्धत आणि दोघांच्याही राजकारणाचा अभ्यास केला तर हे दोघेही कधीही एकत्र येणार नाहीत अशीच परिस्थिती आहे. याचे मुख्य कारण उंडाळकर गटाला पृथ्वीराज चव्हाण यांचे कराड दक्षिणमधील येणे कधीच पचलेले नाही. लादलेले मुख्यमंत्री, लादलेले उमेदवार, जनसंपर्क नसलेले नेते पृथ्वीराज चव्हाण आहेत. त्यांनी दक्षिणमध्ये न येता दिल्लीचे राजकारण पहावे आणि कराड दक्षिण मतदारसंघ उंडाळकरांना मोकळा करून द्यावा, अशी उंडाळकर गटाची मागणी आहे. ‘त्यांनी त्यांच्या जागेवर जावे, आम्हाला आमची जागा द्यावी’, असे उंडाळकर गटाचे कार्यकर्ते नेहमी बोलून दाखवतात. 2019 च्या निवडणुकीत मोदी सरकारचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सरकार आले तर पृथ्वीराज चव्हाण केंद्रात मंत्री म्हणून जातील आणि दक्षिणच्या जागेवर उंडाळकर यांचा पुन्हा दावा राहील.

उंडाळकरांनाच काँग्रेसचे तिकिट मिळेल आणि ते निवडूनही येतील, असा विश्‍वास आणि अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. अधून-मधून बाबा दिल्लीला जाणार, अशा पुड्या हेच कार्यकर्ते सोडत असतात. (विलासराव पाटील-उंडाळकर विधानपरिषदेवर जाणार आणि कराड दक्षिणमध्ये त्यांचा गट येणार्‍या निवडणुकीत बाबा गटाच्या पाठीशी राहणार, अशी पुडी पृथ्वीराज चव्हाण गटाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच सोडली आहे.)

2019 मध्ये काँग्रेसचे सरकार दिल्लीत येईल किंवा न येईल या जर-तरच्या गोष्टी आहेत. सद्यस्थितीचा विचार करता काँगेससाठी ‘दिल्ली अभी दूर है’ अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी अतिशय सावध भूमिका घेत गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणावरच लक्ष केंद्रित केले आहे. राज्यभर संपर्क ठेवत असताना आठवड्यातील दोन-तीन दिवस ते मतदारसंघात देतात. गत आठवड्यातच त्यांनी मी दक्षिणमध्येच राहणार, असे हवेलवाडी येथील एका कार्यक्रमात जाहीर केले होते.  विधानसभा निवडणूका वर्षानंतर आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे दक्षिणचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे तिकिट वाटपावेळी त्यांचा या जागेवर अग्रक्रमाने दावा असेल. काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही याचा विचार करणार आहेत. विलासराव उंडाळकर यांना या जागेसाठी तिकिट मिळावे म्हणून त्यांचे जुने मित्र सुशिलकुमार शिंदे, शिवराज पाटील यांच्यासहित ज्येष्ठ मंडळी अंतर्गत प्रयत्नही करतील. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांच्या तिकिटाला कोणीही थेट विरोध करणार नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसमध्ये राहून उंडाळकरांना तिकिटासाठी संघर्ष करावा लागेल. मात्र अखेरच्या क्षणी पृथ्वीराज चव्हाण गटच बाजी मारण्याची शक्यता आहे. त्यामुळे काकांना उमेदवारी मिळणार नाही. बाबा दिल्लीला जाणार नाहीत.

कराड दक्षिण मतदारसंघ काकांसाठी खाली होणार नाही आणि ‘तुम्ही तुमच्या जागेवर जा, आम्हाला आमची जागा द्या’ ही उंडाळकर गटाची मागणी कदापिही पूर्ण होणार नाही आणि त्यामुळेच या दोन्ही गटाचे मनोमिलन सुद्धा होणार नाही. ‘येणारी निवडणूक मी लढणार नाही, मात्र आमदार रयत संघटनेचा असेल’, ही काकांची घोषणा आणि मी कराड दक्षिणमध्येच राहणार ही पृथ्वीराज चव्हाण यांची घोषणा हेच अधोरेखित करतात. मात्र दुसरीकडे काका येणारी निवडणूक लढवणार नाहीत, हे कदापिही पटणारे नाही. काकांचे वय झाले असले तरीही त्यांचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे कराड दक्षिणमधील संपर्क दौरे, गावागावांतील कार्यकर्त्यांमध्ये असणारे नेटवर्क आणि राज्यभरातील दिग्गज नेत्यांचा संपर्क वाढतच चालला आहे.

उदयसिंह पाटील आमदार व्हावेत, अशी काकांसहीत त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांची खूप इच्छा आहे, स्वप्न आहे. उदयसिंह पाटील यांना योग्य वेळी विधानसभेवर पाठवण्यात काका कमी पडले आहेत. ही एक बाजू असली तरी उदयसिंह पाटील यांच्यावर मधल्या काळात दाखल झालेला गुन्हा आणि याच काळात बॅकफूटवर गेलेला त्यांचा गट आणि याचा विचार करता काकांनी एकतर्फी लढविलेली खिंड वाखाणण्यासारखी आहे. कराड दक्षिणेत आजही काकांची ताकद दखलनीय आहे. उदयसिंह पाटील यांच्यासाठी, कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर आणि वयोमानाचा विचार करता उंडाळकरांनी मी लढणार नाही, असे सांगितले आहे.

पृथ्वीराज चव्हाण दिल्लीला गेले तर दक्षिणचे तिकिट उदयसिंह पाटील यांना मिळेल. काका त्यासाठी प्रयत्न करतील, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे. मात्र पृथ्वीराज चव्हाण दिल्लीला जाणार नाहीत. दक्षिणमध्येच राहतील, या दृढ शक्यतेचा विचार केला तर येणार्‍या निवडणुकीत विलासराव पाटील-उंडाळकर हेच त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा उभे राहण्याची अधिक शक्यता आहे. कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर, जनतेच्या रेट्यामुळे, कराड दक्षिणमधील वाड्या-वस्त्यांवरील लोकांच्या आग्रहास्तव  ही कारणे पुढे करून उंडाळकर काका हेच पुन्हा निवडणुकीत उतरतील, अशीच जास्त शक्यता आहे. त्यामुळे बाबा-काका काँग्रेस मनोमिलन खूप दूर वाटतेय. शेवटची एक शक्यता आहे ती म्हणजे सध्या राज्यात काँग्रेसला नेतृत्व नाही. मुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर करून पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्वाखाली विधानसभा लढविण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला तर चव्हाण यांना राज्यभर स्टार प्रचारक म्हणून फिरावे लागेल. अशा परिस्थितीत पक्ष त्यांना दक्षिणेत अडकून ठेवणार नाही, ही शक्यताही नाकारात येत नाही. उंडाळकरांना उमेदवारी  मिळण्याची शक्यता आहे. तसे झाले तरच हा प्रश्‍न मिटू शकतो. अन्यथा दोन टोके असलेल्या काका-बाबा यांना एकत्र करणे अशक्यप्राय आहे.

सतीश माेरे