Thu, Apr 25, 2019 13:24होमपेज › Satara › तरुण आमदारांचा आघाडीसाठी दबाव

तरुण आमदारांचा आघाडीसाठी दबाव

Published On: Dec 21 2017 1:51AM | Last Updated: Dec 21 2017 12:11AM

बुकमार्क करा

नागपुर : विशेष प्रतिनिधी

विधानसभेच्या 2019 मध्ये होणार्‍या निवडणुकीत आघाडी करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तरुण आमदारांनी आपापल्या नेत्यांवर आतापासूनच दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. अन्यथा पुन्हा विरोधात बसायला लागेल, असा इशाराही त्यांनी नेत्यांना दिला आहे.

राज्यातील भाजप सरकारने जनतेला दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत. नापिकी, अवेळी पावसाने पिकांना बसणारा फटका व कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरून शेतकर्‍यांच्या मनात असंतोष खदखदत आहे. सध्या ग्रामीण भागात भाजप सरकारविरोधात नाराजी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला याचा राजकीय लाभ उचलता येईल, असा विश्‍वास काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तरुण आमदारांना वाटत आहे.

मागील निवडणुकीपेक्षा गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढली असून आमदारांचा आकडा 80 झाला आहे. तेथील पाटीदार, मुस्लिम आणि दलित मतदार काँग्रेसकडे वळला असल्याने महाराष्ट्रातही हे चित्र उभे राहू शकते; पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ आमदारांनी मुस्लिम, दलित या परंपरागत मतदारांचा विश्‍वासघात केला आहे. सध्या हे दोन्ही घटक भाजपकडे वळले आहेत. त्यांना पुन्हा काँग्रेस आघाडीकडे आम्ही वळवू शकतो, असा दावा या तरुण आमदारांनी केला आहे.

पंधरा वर्षे एकत्र सत्तेत असतानाही 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बोटावर मोजण्याइतक्या जागांवरून आघाडीमधील दोन्ही पक्षांनी काडीमोड घेतली होती. त्यामुळे भाजपला अपेक्षेपेक्षा जादा जागा मिळाल्याने या पक्षाने शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन केले आहे. याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उभारलेल्या सहकारी संस्थांना बसत आहे. नवीन कायदे करून या संस्था ताब्यात घेण्याचे प्रयत्न सत्ताधार्‍यांकडून केले जात असल्याचे तरुण आमदारांचे म्हणणे आहे.आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका भाजप स्वबळावर लढणार आहे. या पक्षाच्या महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे यापुढे आता शिवसेनेसोबत युती होणार नाही. त्यामुळे या संधीचा फायदा घेण्यासाठी आघाडी करा, असा दबाव तरुण   आमदारांनी टाकण्यास सुरुवात केली आहे.