Tue, Apr 23, 2019 19:38होमपेज › Satara › पालकमंत्री म्हणे, बैलाचे शिवाळ बदलावे लागेल!

पालकमंत्री म्हणे, बैलाचे शिवाळ बदलावे लागेल!

Published On: Apr 14 2018 1:29AM | Last Updated: Apr 13 2018 10:44PMसातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यात कृषी विभागाच्या दिरंगाईमुळे कोट्यवधींचा निधी सरेंडर झाला. या विभागाबद्दल आमदारांच्या पूर्वीपासूनच खूप तक्रारी आहेत.  मागील  कृषी अधीक्षकांनी चुकीची कामे केल्याने त्यांना निलंबित करण्याचा निर्णय विधानसभा अधिवेशनात घ्यावा लागला. त्यांच्यासारखे कामकाज अजिबात खपवून घेतले जाणार नाही.  बैलाची शिवाळही बदलावी लागते. कुठल्याही कृषी अधिकार्‍यांची तक्रार आल्यास उचलबांगडी करून त्याची बदली केली जाईल, असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री ना. विजय शिवतारे यांनी बैठकीत दिला. कृषी विभागाने  समन्वय साधून काम करावे, असा सल्‍लाही त्यांनी दिला.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या छ. शिवाजी सभागृहात खरीप हंगामाची पूर्वतयारी बैठक पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, विभागीय कृषी सहसंचालक महावीर जंगटे, जि. प. कृषी सभापती मनोज पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील पवार तसेच सातारा, कोरेगाव, कराड, वाईचे सभापती उपस्थित होते. 

महाबिज विश्‍वासार्हता असलेले  बियाणे पण त्याची उत्पादकता कमी का? याचा विचार केला पाहिजे. खंडाळा तसेच फलटण तालुक्याचा खरीप हंगामात समावेश केला जाईल. कृषी विभागाने शेतकर्‍यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. पण कृषी विभागात काहीजण निर्ढावलेले होते. अशा अधिकार्‍यांच्या चुकीच्या कामांमुळे आमदार बैठकांमध्ये तक्रारी करायचे. चुकीच्या सवयी लागलेल्या अधिकार्‍यांनी मनात संवेदना ठेवून काम केले पाहिजे. कुणी अधिकारी ऐकत नसेल तर सांगा त्याच्यावर कारवाई केली जाईल. काहीजण 5-5, 10-10 वर्षे एकाच तालुक्यात काम करत आहेत. तक्रार आल्यास संबंधित अधिकार्‍याची जिल्ह्याबाहेर बदली करु. बैलाचे शिवाळ जसे बदलावे लागते तसे निर्णय कृषी विभागाबाबत घ्यावे लागतील. चांगले काम करणार्‍यांना प्रोत्साहन दिले जाईल. पण कामाचे रिझल्ट येत नसतील तर अशा अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही शिवतारे यांनी दिला.  

जलयुक्‍त शिवार योजनेतून झालेल्या ज्या कामांबद्दल तक्रारी आल्या त्यामध्ये तथ्य आहे. अशा निकृष्ट कामांचा आढावा घ्यावा. दोन वर्षानंतरही कामे का रखडली? झालेल्या कामांमुळे संबंधित गावांमध्ये काय बदल झाले, याचा अहवाल तयार  करुन पंधरा दिवसांनी घेतलेल्या  बैठकीत मांडा. रासायनिक खते, औषधांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये त्याबाबत जागरूकता निर्माण केली पाहिजे. मागील वर्षी कोणत्या पिकाचे किती उत्पादन झाले? यावर्षी उत्पादनात वाढ झाली की घट झाली? याची माहितीही कृषी विभागाने ठेवली पाहिजे. तरच पुढील    हंगामाचे नियोजन चांगल्या प्रकारे करता येईल, असेही ना. शिवतारे म्हणाले.

जिल्हा कृषी अधीक्षकांनी सर्व तालुका कृषी अधिकार्‍यांना बरोबर घेवून काम करावे. सर्वांशी समन्वय राखा. बैठकीत उखाळ्यापाकाळ्या निघत असल्या तरी लोकांचे प्रश्‍न सोडवून चांगले काम करा, अशी सूचनाही ना. शिवतारे यांनी केली. 

आ. शशिकांत शिंदे म्हणाले, जलयुक्‍त शिवार योजनेत मागील दोन वर्षापूर्वी झालेल्या कामांची माहिती दिली जात नाही. 2016-2017  मधील कामे का रखडली? त्यासाठी निधी आहे की नाही? याचा अहवाल द्यावा.  कृषी विभागाकडून योजना आखल्या जातात मात्र, त्यांची अंमलबजावणी केली जात नाही. शेती उत्पादन व हमीभाव यांची सांगड घालावी. कोरेगावात घेवडा तर लोणंदमध्ये कांदा  अशा बाजारपेठा निर्माण कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. 

ठिबक अनुदान शेतकर्‍यांना मिळाले नसून उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्यावर  विकत घेण्याची व्यवस्था शासनाने करावी, अशी मागणी कोरेगाव पं. स. सभापती राजाभाऊ जगदाळे यांनी केली. आ. बाळासाहेब पाटील यांनीही मनोगत व्यक्‍त केले. ‘आत्मा’चे  प्रकल्प संचालक राऊत यांनी आभार मानले. सुनील  बोरकर यांनी खते, बियाणांची उपलब्धता तसेच शेतकरी योजनांचा आढावा घेतला.

 

Tags : satara, satara news, Kharif season, meeting, Vijay Shivtare