Tue, Apr 23, 2019 01:39होमपेज › Satara › राष्ट्रीय किसान मोर्चाच्या शेतकरी संपाची तयारी 

राष्ट्रीय किसान मोर्चाच्या शेतकरी संपाची तयारी 

Published On: May 05 2018 12:52AM | Last Updated: May 04 2018 10:54PMकराडः प्रतिनिधी 

राष्ट्रीय किसान महासंघाच्या माध्यमातून एक ते 10 जून दरम्यान देशव्यापी शेतकरी संपाची घोषणा करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात गाववार नियोजन बैठका सुरू आहेत. राष्ट्रीय किसान महासंघातील बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात शेतकरी संपाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती शेतकरी नेते लक्ष्मण वंगे, राष्ट्रीय समन्वयक संदीप गिड्डे व बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला यांनी दिली. 

संपाच्या अनुषंगाने 22 राज्यात बैठका व तयारी सुरू आहे. राज्यात देखील या संपाच्या नियोजन बैठकांना शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात शेतकरी प्रश्‍नांचे अभ्यासक डॉ. बुधाजीराव मुळीक हे आंदोलनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून काम पहात आहेत. सध्यस्थितीत देशातील शेतकर्‍यांसमोर कर्जबाजारीपणा बरोबरच शेतमालाचे पडलेले भाव हे प्रश्‍न गंभीर आहेत. सरकारच्या शेती व शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. देशभरातील 110 शेतकरी संघटना एकत्र येऊन राष्ट्रीय किसान महासंघाची स्थापना करण्यात आली आहे.  या माध्यमातून एक ते 10 जून दरम्यान देशव्यापी शेतकरी संप पुकारण्यात आला असून या संपादरम्यान शेतकर्‍यांनी आपला शेतमाल, दूध व भाजीपाला शहरामध्ये विक्रीस पाठवू नये तसेच शहरातील कोणतीही नवीन वस्तू खरेदी करू नये, असे आवाहन लक्ष्मण वंगे व संदीप गिड्डे यांनी केले आहे. 

देशातील एकूण 128 शहरे निवडली असून महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक व नागपूर या शहरांचा समावेश आहे. या आंदोलनास सामान्य शेतकर्‍यांचा प्रथमच जम्मू-काश्मिर पासून केरळ पर्यंत वाढता प्रतिसाद मिळत आहे. या आंदोलना दरम्यान कोणत्याही शेतमालाचे नुकसान होणार नाही, याची पूर्ण खबरदारी राष्ट्रीय किसान महासंघ घेत असून केवळ ठरलेली शहरे वगळून इतर शहरे व गावामध्ये शेतमाल विक्री करता येणार असल्याचे वंगे यांनी सांगितले. 

शेतकरी संपातील प्रमुख मागण्या

शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी, बैलगाडा शर्यतींना कायदेशीर मान्यता, अल्पभूधारक शेतकर्‍यांना उत्पन्नाची हमी व शेतकर्‍यांंना पेन्शन, शेती पंपासाठी मोफत वीज, दुधाला कमीत कमी पन्नास रूपये प्रतिलिटर भाव, शेतमाल प्रक्रीया उद्योगामध्ये इथेनॉलसाठी प्राधान्य  आदी प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संपावर जात आहेत. 

Tags : Satara, Preparations, National, Farmers, Movement