Tue, Jul 23, 2019 07:11होमपेज › Satara › गरोदर मातांना मातृवंदना योजनेचा बोनस

गरोदर मातांना मातृवंदना योजनेचा बोनस

Published On: Dec 10 2017 1:22AM | Last Updated: Dec 09 2017 10:47PM

बुकमार्क करा

सातारा : मीना शिंदे

जिल्ह्यातील गरोदर मातांना नव वर्षात आता मातृवंदना योजनेचा लाभ मिळणार असून त्याअंतर्गत प्रसुतीपर्यंत पाच हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. केंद्र शासनातर्फे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येत्या जानेवारीपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत  गरोदरपण ते बाळाच्या जन्मापर्यंतच्या कालावधीत तीन टप्प्यांमध्ये पाच हजार रुपयांचा लाभ संबंधित महिलेला दिला जाणार आहे.  मात्र यासाठी गरोदर महिलेने शासकीय रुग्णालयामध्ये  गरोदरपणाची नोंद करणे आवश्यक आहे.  

केंद्र शासनाच्यावतीने गेल्यावर्षी  मातृवंदना योजना सुरु करण्यात आली होती. सातारा जिल्ह्यात या  योजनेची अंमलबजावणी  येत्या जानेवारीपासून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत  करण्यात येणार आहे. गावागावातील  आशा कर्मचार्‍यांवर याची सर्वाधिक जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यांना याचा मोबदलाही वाढवून देण्याचे शासनाचे धोरण आहे.

मातृवंदना योजनेचा उद्देश संस्थात्तक प्रसुती वाढवण्याचा आहे.जिल्ह्यात वर्षभरातील सर्व प्रसुती या खासगी अथवा शासकीय रुग्णालयात  होत आहेत.  या योजनेतून प्रसुतीला आर्थिक मदतीचे कवच दिले जाणार आहे. यासाठी मदतीचे तीन टप्पे आहेत. त्यानुसार  महिलेच्या गरोदरपणातील पहिल्या तीन महिन्यात सरकारी दवाखान्यात नोंदणी केल्यास 1 हजार  रुपये, 9 व्या महिन्यापर्यंत 2 हजार रुपये आणि प्रसुतीनंतर  जन्मलेल्या बाळाला तीन महिन्यांत  संपूर्ण डोस दिले असतील तर उर्वरीत रक्कम म्हणजेच 2 हजार रुपये दिले जाणार आहेत.

तसेच  मागास प्रवर्गातील महिलांना  ग्रामीण भागामध्ये 700  व शहरी भागात 600रुपये अतिरिक्त भत्ता दिला जाणार आहे. संबंधित मातेचे आधार कार्ड, बँक पासबुकची नोंद जवळच्या उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयामध्ये नोंद करणे आवश्यक आहे. गरोदरपणातील पहिल्या तीन महिन्यात शासकीय रुग्णालयामध्ये नोदणी केल्यानंतर प्रसुती खासगी रुग्णालयात झाली तरी देखील त्या महिलेस या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र फक्त खासगी रुग्णालयातच गरोदरपणातील नाव नोंदणी  केलेल्या महिला या योजनेपासून वंचित राहणार आहेत.