Thu, Apr 25, 2019 23:44होमपेज › Satara › मुंबईतील अग्निकांडात २०० जणांचे वाचवले प्राण

सातारकर महेश साबळे ठरला देवदूत

Published On: Dec 31 2017 1:28AM | Last Updated: Dec 30 2017 10:40PM

बुकमार्क करा
सातारा: प्रतिनिधी

मुंबईतील लोअर परेल भागातील कमला मिल परिसरातील वन अबव्ह व मोजो बिस्ट्रो या पब्सला भीषण आग लागली होती. या अग्नितांडवात तब्बल 15 जण दगावले तर अनेक जण जखमी झाले. दुर्घटनेच्यावेळी महेश साबळे हा सुरक्षा रक्षक त्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर होता. आग लागल्यानंतर महेशने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, तिथे असलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलवले. सातारच्या या युवकाचे शौर्य जिल्हावासीयांसाठी अभिमानास्पद ठरले. शनिवारी सोशल मिडीयावर महेशच्या या धाडसाचे नेटकर्‍यांनी कौतुक केले.

लोअर परेल भागातल्या कमला मिल कंपाऊंडमधल्या हॉटेल मोजोला शुक्रवारी भीषण आग लागली आणि पाहता पाहता ही आग वार्‍यासारखी पसरली. आतापर्यंत आगीत 15 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मात्र, ज्यावेळी आग लागली त्यावेळी घटनास्थळी सातारा तालुक्यातील खालची पिलाणी येथील महेश साबळे व त्याचा मित्र सुरज गिरी उपस्थित होते. हे दोघे कमला मिल्स कंपाऊंडमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर महेशने त्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर महेश हा पबमधील लोकांना वाचवण्यासाठी इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर गेला होता. 

काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले होते. तरीही महेश न डगमगता नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी जीवाची बाजी लावत होता. अनेक नागरिकांना त्याने इमारतीच्या मजल्यावरून खाली पाठवत दुर्घटनेपासून त्यांचा बचाव केला. तब्बल दोन तास तो इमारतीच्या वरच्या मजल्यावर नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी धडपडत होता. या कालावधीत त्याने सुमारे 200 जणांना आगीच्या तोंडातून बाहेर काढले.

त्याच्या या कार्यामुळेच पब व हॉटेलमध्ये असणार्‍या नागरिकांचे जीव वाचले. एखाद्या देवदूतासारखा महेश नागरिकांच्या मदतीला धावून आल्याने नागरिकांनी त्याचे आभार मानले. महेश हा खालची पिलाणी, ता. सातारा येथील असून त्याच्या या धाडसाचे सातार्‍यातही कौतुक केले जात आहे. शनिवारी तर सोशल मिडीयावर सातारच्या या सुपुत्राने केलेल्या कामगिरीचा नेटकर्‍यांनी गौरव केला. सातारकर महेश साबळे तुमच्या शौर्याला सलाम असे मॅसेज  व्हॉटस अप व फेसबुकवरून फिरत होते.