Sun, Mar 24, 2019 16:44होमपेज › Satara › मलकापूर नगरपंचायतीकडून यावर्षी 1 हजार 600 वृक्ष लागवडीचा संकल्प

वनमंत्र्यांकडून मलकापूरचे कौतुक

Published On: May 21 2018 1:19AM | Last Updated: May 20 2018 8:12PMकराड : प्रतिनिधी  

राज्य शासनाकडून ठेवण्यात आलेल्या 13 कोटी वृक्ष लागवड नियोजन बैठकीत वृक्ष लागवडीसह संवर्धनासाठी मलकापूर नगरपंचायतीकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांची विशेष दखल घेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली. तसेच नगरपंचायतीच्या प्रयत्नांचे कौतुकही केले. पुणे येथील विधानभवन येथे वनमंत्री मुनगंटीवार, सातार्‍याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत गुरूवारी बैठक झाली. या बैठकीत सातारा जिल्ह्यातील तालुकानिहाय वृक्ष लागवडीबाबतची माहिती जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी दिली.

यावेळी मलकापूर नगरपंचायतीकडून करण्यात आलेल्या आंध्रप्रदेशातील राजमंड्री येथील 5 हजार वृक्षांच्या लागवडीबाबतची माहिती आ. आनंदराव पाटील यांच्यासह मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली. तीन ते पाच वर्ष वयोगटातील वृक्ष खरेदी करून मलकापूरमधील रिकाम्या जागा, रस्ते यांच्याकडेला वृक्ष लागवड करण्यात आली आहे. 

हिमोलिया पेंटस, आप्‍ता, सेट्रोपा, गल्फेनिया, पितोडिया, एक्झोरा, आरेकापाम, सिल्व्हर ओक, राधामनोहर, मिनी तुराई, जास्वंद, पापुलिनिया, टर्मोलिनिया, गुलमोहर, चाफा, फ ॉक्सलपाम, ऑलपायसेस, बांबू, सदाफुली, पेरू, सीताफळ, लिंबू या वृक्षांचा यात समावेश आहे. नगरपंचायतीने यासाठी स्वतंत्र कृषी विभागाची स्थापना केली असून सर्व झाडे जगवली असल्याचे सांगत मनोहर शिंदे यांनी छायाचित्रांचा संग्रह सादर केला. हा संग्रह पाहून वनमंत्री मुनगंटीवार यांनी मलकापूर नगरपंचायतीचे कौतुक केले. तसेच मलकापूरला यावर्षी 1 हजार 600 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असले तरी मलकापूर नगरपंचायत 3 हजार वृक्षांची लागवड करणार असल्याचे मनोहर शिंदे यांनी सांगितले.