Sun, Nov 18, 2018 09:36होमपेज › Satara › सायकलवरून प्रवास करत स्वच्छ भारत व पर्यावरण रक्षणाचा संदेश

दिव्यांग प्रदीपकुमारची भारत भ्रमणाची झेप

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 23 2017 10:48PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी 

रेल्वे अपघातात एक पाय निकामी झाला असताना इंदोर (मध्यप्रदेश) येथील प्रदीपकुमार मिरदवाल वय 30 वर्षे हा स्वच्छ भारत, पर्यावरण रक्षणाचा संदेश घेवून देशभर प्रवास करत आहे. विशेष म्हणजे  29 राज्ये आणि 15 हजार कि.मी. हा प्रवास तो चक्क सायकलवरून करत आहे. हे माझे जागतीक रेकॉर्ड असेल असा विश्‍वास त्याने व्यक्त केला. 

शुक्रवारी त्याचे कराडमध्ये आगमन झाले. नगरपरिषदेच्या वतीने आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी कोल्हापूर नाका येथे त्याचे स्वागत केले. यावेळी एन्व्हायरो नेचर क्‍लबचे प्रा.जालिंदर काशिद, चंदू जाधव, सुरेश पाटील, भानुदास वास्के, अशोक उमराणी आदी उपस्थित होते. 

14 नोव्हेंबर 2017 पासून इंदोरपासून प्रदीपकुमारचा सायकल प्रवास सुरू झाला आहे. देशभर  तो फिरणार आहे. आत्तापर्यंत 1 हजार 600 कि.मी.चा प्रवास त्याने पूर्ण केला आहे. 29 राज्यांत 15 हजार कि.मी.चा प्रवासाचा टप्पा तो पार करणार आहे. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरण जागृती दूत म्हणून त्याची निवड केली आहे. 

प्रदीपकुमार म्हणतो, मी दिव्यांग आहे मात्र मी स्वत:ला कधीच दिव्यांग मानत नाही. कारण दिव्यांग ही एक मानसिकता आहे. स्वच्छ भारत स्वस्थ भारत अभियानाला गती देण्याचे माझे प्रयत्न आहेत. देशात हे अभियान राबवले जात आहे. या अभियानास महाअभियान बनविण्याचे माझे स्वप्न आहे. यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. देशासमोर कचरा व पर्यावरणाची गंभीर समस्या आहे. वाहनांमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. ऑक्सिजन कमी होत आहे.

शहरांचा विकास होत आहे मात्र झाडा फुलांना श्‍वास घेण्यासही जागा आपण सोडत  नाही. रस्ता सुरक्षेचाही प्रश्‍न आहे. वाहन चालवताना हेल्मेट न वापरणे , सिग्‍नल तोडणे यामुळे अपघातात बळी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक वर्षापासून शासन हेल्मेटसक्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र नागरिक त्याची अंमलबजावणी करत नाहीत, अशी खंतही त्याने व्यक्त केली. 

तुटलेला पाय हातात घेऊन हॉस्पिटलला गेलो...

2013 मध्ये इंदोरमध्ये रेल्वेतून प्रवास करत असताना माझा अपघात झाला. यामध्ये डावा पाय तुटला. काय झाले मला कळले नाही पण रक्ताने माझे संपूर्ण शरीर भिजले होते. शरीर बधिर झाले होते. या परिस्थितीतही तुटलेला पाय हातात घेवून मी रूग्णालयात गेलो होतो,असे  प्रदीपकुमारने सांगितले.