होमपेज › Satara › प्रभाकर देशमुखांना सर्वांनी साथ द्यावी

प्रभाकर देशमुखांना सर्वांनी साथ द्यावी

Published On: Apr 23 2018 1:18AM | Last Updated: Apr 22 2018 10:38PMदहिवडी : प्रतिनिधी

प्रभाकर देशमुख यांनी शासकीय सेवेत असताना जलसंधारणाच्या क्षेत्रात महाराष्ट्र व देशाला दिशादर्शक असे काम केले आहे. आपण जिथे जन्मलो, वाढलो त्या माण खटावसाठी त्यांनी पुन्हा जलसंधारणाचे काम हाती घेतले आहे. तुम्ही सर्वांनी त्यांना साथ द्यावी, असे आवाहन खा. शरद पवार यांनी केले. 

वॉटर कप स्पर्धेअंतर्गत नरवणे येथे सुरू असलेल्या जलसंधारण कामाच्या भेटीसाठी खा. शरद पवार माणमध्ये आले होते. श्रमदान कार्यक्रमानंतर प्रभाकर देशमुख यांच्या लोधवडे येथे घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा करून पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन आ. शिवेंद्रराजे भोसले,  जि.प. अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी जि.प अध्यक्ष सुभाष नरळे, वाघोजीराव पोळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जि.प सदस्य भारती पोळ, सोनाली पोळ, पंचायत समिती सदस्य विजयकुमार मगर, तानाजी कट्टे, अशोक माने, संदीप पोळ, मनोज पोळ तसेच माणदेश आणि पाणी फाऊंडेशनचे सदस्य, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

खा. पवार यांनी  जलसंधारणाची चळवळ पुर्वीपासून चालवत असलेल्या प्रभाकर देशमुख यांना माण खटावच्या जनतेने साथ द्यावी, असे सूचक विधान करत माण खटावच्या राजकारणाची नवी दिशा स्पष्ट केली. त्याचबरोबर चांगल्या माणसाच्या पाठीशी खंभीरपणे उभे रहा, असे आवाहनही पवार यांनी केले. दुष्काळाचा सामना करण्यासाठीच्या तुमच्या प्रयत्नांना मी पैशांची कमतरता भासू देणार नाही. माण खटाव तालुक्यातील वॉटर कप स्पर्धेतील जलसंधारणाच्या  कामांसाठी साडे सहा कोटी रूपयांचा निधी येत्या काळात उपलब्ध करून दिला जाईल. 

यामध्ये जिल्हा बँकेकडून 1 कोटी, जिल्हा परिषदेकडून दीड कोटी, डीपीडीसी व विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून 3 कोटी, माझ्या खासदार फंडातून 50 लाख व खा. वंदना चव्हाण यांच्या खासदार निधीतून 50 लाख रूपयांची मदत केली जाणार असल्याचे शरद पवारांनी सांगितलेे.सूत्रसंचलन सरपंच अमोल काटकर यांनी केले. आभार प्रभाकर घार्गे यांनी मानले. 

 

Tags : satara, satara news, Prabhakar Deshmukh, Sharad Pawar,