Wed, Jul 17, 2019 10:27होमपेज › Satara › बचत गटांना शून्य टक्क्याने कर्ज

बचत गटांना शून्य टक्क्याने कर्ज

Published On: Jan 23 2018 1:11AM | Last Updated: Jan 22 2018 10:20PMखंडाळा : वार्ताहर

मुलगा वंशाला दिवा पाहिजे, या पेक्षा मुलगीच आपला वारसा समजून तिला वाढवा तरच ती कर्तृत्ववान स्त्री बनून केवळ कुटुंबाचा नाही तर समाजाचा, देशाचा आधार बनेल, असे प्रतिपादन महिला व बालविकास, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांनी केले.दरम्यान, माझ्या माय-माऊलींच्या बचत गटांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी जाहीर केले.

नायगाव,  ता. खंडाळा येथे सातारा जिल्हा परिषद, महिला व बालविकास विभागाच्या वतीने रथयात्रा समारोप आणि भाग्यश्री मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. प्रारंभी ना. पंकजा मुंडे, राज्यमंत्री विद्या ठाकूर व मान्यवरांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्मारकाची पाहणी केली. त्यानंतर सभास्थळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. 

यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, ना. महादेव जानकर, राज्यमंत्री विद्या ठाकूर, आ. मकरंद पाटील, आ. संगिता ठोंबरे, जि. प. अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण सभापती शिवाजीराव सर्वगोड, माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, सभापती मकरंद मोटे, उपसभापती वंदना धायगुडे, अश्‍विनी पवार, चंद्रकांत यादव, शिवसेनेच्या शारदा जाधव, आदेश जमदाडे, सरपंच निखिल झगडे, आयुक्‍त लहुराज माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, तहसीलदार विवेक जाधव, गटविकास अधिकारी दिपा बापट उपस्थित होते.

यावेळी ना. पंकजाताई मुंढे म्हणाल्या, मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी भाग्यश्री योजना आणली. त्यामुळे लोकांच्यात बदल झाला आहे. समाजात बदल करायचा तर घाबरून चालणार नाही. आईला वाटते आपली मुलगी शिकावी, मोठी व्हावी, त्यासाठी ताकद दिली पाहिजे. 

पालकमंत्री ना. शिवतारे म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात मुली चांगली यशशिखरे गाठत आहेत. मात्र, पहिल्या मुलीचे स्वागत केले तर हे अभियान यश मिळवेल. ना. ठाकूर यांनी मनोगत व्यक्‍त केले. निखिल झगडे यांनी प्रास्ताविक केले. मानकुमरे यांनी आभार मानले.

अंगणवाडीताईंना मानधन वाढ देणार 

महिला शिकली तर स्वतःच्या पायावर उभी राहते. याकरिता कुटुंबाला आर्थिक आधार बचत गटातून मिळेल. स्वाभिमानी महिलांना शक्‍ती देण्याकरिता शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा केला जाईल, त्यासाठी अधिकाधिक बचत गटांची निर्मिती करा, असे आवाहन करून आ. पंकजा मुंडे यांनी अंगणवाडीताईंना मानधन वाढ दिली जाणार असल्याचे जाहीर केले.  आगामी काळात कुपोषणमुक्‍त महाराष्ट्र घडवण्यासाठी योगदान द्या, असेही त्या म्हणाल्या.