होमपेज › Satara › ‘कोयना’च्या पाण्यावर वीजनिर्मिती शक्य 

‘कोयना’च्या पाण्यावर वीजनिर्मिती शक्य 

Published On: Apr 12 2018 1:18AM | Last Updated: Apr 11 2018 11:29PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

राज्यात कोळशाच्या तुटवड्यामुळे ऐन उन्हाळ्यात वीजटंचाईचा सामना करावा लागणार आहे. याचा जनसामान्यांसह शेती व उद्योगालाही फटका बसणार आहे. वीजनिर्मितीत महत्त्वपूर्ण ठरणार्‍या कोयना धरणात अजूनही मुबलक पाणीसाठा शिल्लक असल्याने या पाण्यावर वीजनिर्मिती करणे शक्य आहे. चालूवर्षी पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीसाठीचा आरक्षित पाणीकोठा व सिंचनाची गरज भागवून वीसहून अधिक टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहणार आहे.

मुळातच गतवर्षीपेक्षा यावर्षी आतापर्यंत वीजनिर्मिती व सिंचनासाठी कमी पाणीवापर झाला. 629 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी झाल्याने अब्जावधींचा महसूल पाण्यात गेला आहे. त्यामुळे या उर्वरित पाण्याचा नियोजनबद्ध वापर झाला, तर कोळशाअभावीचा वीज तुटवडा भरून काढण्यात यश मिळेल. शिवाय, महसूलही मिळेल. 

ऐन उन्हाळ्यात सर्वाधिक विजेची मागणी होत असते. राज्याचा विचार करता मार्च महिन्यापर्यंत 19 हजार मेगावॅट युनिट विजेची मागणी असते. उन्हाळ्यात ही मागणी वाढत जाऊन ती चोवीस हजार मेगावॅट युनिटपर्यंत पोहोचते. नेमक्या याच काळात प्रामुख्याने जलविद्युत प्रकल्प असणार्‍या धरणांना विजेपेक्षा पिण्याचे व शेतीसाठीच्या पाण्याला प्राधान्य द्यावे लागते. 

चालूवर्षी कोयना धरणाचे नेमके उलटे चित्र आहे. अगदी एप्रिलचा दुसरा सप्‍ताह सुरू झाला असतानाही धरणात तब्बल 60.94 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. एक जूनपासून आतापर्यंत येथे पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीसाठी 67.50 टीएमसी आरक्षित कोठ्यापैकी 46.54 टीएमसी पाणीवापर झाला आहे. उर्वरित 20.96 टीएमसी  कोठा शिल्लक असल्याने आरक्षित कोठ्यावर सरासरीपेक्षाही दुप्पटीने वीजनिर्मिती करता येणे शक्य आहे. याशिवाय सिंचनाची अलीकडच्या काळातील 35 टीएमसीची गरज पाहता आजवर यासाठी 20.90 टीएमसी   पाणीवापर झाला आहे. त्यामुळे मे महिना अखेर तांत्रिक वर्षपुर्तीला लागणारा पश्‍चिमेकडील आरक्षित 20.96,  सिंचनासाठी 15 तर मृतसाठा 5 अशा एकूण 40. 96 टीएमसी  पाणीवापर भलेही झाला तरीही तब्बल वीसहून अधिक टीएमसी  पाणीसाठा शिल्लक आहे. 

सध्या राज्यातील बारा औष्णीक वीजनिर्मिती प्रकल्पांपैकी तीन प्रकल्पात कोळश्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. उर्वरित प्रकल्पातही काही दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. त्यामुळे येथील वीज निर्मिती प्रकल्पही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या परिस्थितीत जर कोयना धरणातील शिल्लक पाण्याचा नियोजनबद्ध  वापर झाला तर वीज टंचाईवर मात करता येणे शक्य आहे. 

 

Tags : Koyna water, Power Generation, satara,