होमपेज › Satara › इंटरनेटच्या जमान्यात टपाल सेवा दुर्मीळ 

इंटरनेटच्या जमान्यात टपाल सेवा दुर्मीळ 

Published On: Aug 02 2018 2:01AM | Last Updated: Aug 01 2018 9:03PMऔंध : वार्ताहर

सध्याच्या कुरिअर, मोबाईल, इंटरनेटच्या युगात टपाल  विभागाला फटका बसला आहे. पूर्वी पत्र हे संदेश पाठवण्याचे महत्त्वाचे साधन होते. मात्र, काळाच्या ओघात पत्रव्यवहार लुप्त होत असून त्याची जागा आता मोबाईलने घेतली आहे. विशेषतः इंटरनेटच्या या युगात जग इतके जवळ झाले आहे की त्यामुळे पत्र, पत्रपेट्या या सार्‍या गोष्टी इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत.

मोबाईलमुळे माणसे थेट एकमेकांशी बोलू लागली. कोसोदूर असलेल्या माणसाशीही एका क्षणात संपर्क होऊ लागला. हळूहळू इंटरनेटचा शोध लागला. त्यामुळे माणसे अधिकच जवळ आली. इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर कोठेही असलेल्या व्यक्तीशी संपर्क करणे सोपे झाले आहे. संदेशाची नवनवीन साधनेही आली. 

मात्र, आजही माणसांच्या मनात पत्राच्या आठवणी ताज्या असल्याने वास्तव मात्र, बदलले नाही. गावात पोस्टमन आला तरी नागरिकांची त्याच्याभोवती होणारी गर्दी ठरलेली असायची. आमचं काय आहे का? आमचं पत्र आलंय का? आमची मनीऑर्डर आलीय का? असे पोस्टमनला विचारले जात होते. त्यामुळे पोस्टमनलाही विशेष महत्व होते. मात्र, सध्याच्या काळात ग्रामीण भागात क्वचितच असे चित्र दिसून येते.

तरीही टपाल कार्यालयाचे महत्त्व वेगळेच..

आज स्पर्धेच्या युगामध्ये वेगाने प्रगती होत असून इंटरनेट, सोशलमिडीयाच्या व अन्य साधनांच्या वापरामुळे प्रत्येक जण एकमेकांच्या जवळ आला आहे परंतु पूर्वीच्या काळी टपाल व्यवस्थेचे वेगळे महत्त्व होते. आज कोणते पत्र येणार, नोकरीचा कॉल किंवा मनिऑर्डर येणार का?याची उत्सुकता पूर्वीच्या काळी  प्रत्येकास लागून  असायची. ती उत्सुकता आता दिसून येत नाही. त्यामुळे सोशलमिडीयाच्या जमान्यात टपालांची आवकजावक जरी कमी झाली असली तरी टपाल व्यवस्थेचे महत्त्व आजही काही गोष्टींमुळे टिकून आहे.