Mon, Apr 22, 2019 11:55होमपेज › Satara › आम्ही काय पाकिस्तानात राहतो का?

आम्ही काय पाकिस्तानात राहतो का?

Published On: Apr 28 2018 1:46AM | Last Updated: Apr 27 2018 8:50PMकराड : प्रतिनिधी 

गेल्या दोन महिन्यांपासून वाकुर्डे योजनेवरून राजकारण सुरू आहे. वाकुर्डे योजनेसह उंडाळे प्रादेशिक योजना थकीत वीज बिलापोटी बंद आहेत. जर शासन म्हैसाळ योजनेचे थकीत तीस कोटी भरत असेल, तर वाकुर्डेसह उंडाळे योजनेस वेगळा न्याय का? आम्ही पाकिस्तानात राहतो का? असे संतप्‍त प्रश्‍न उपस्थित करत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या 15 दिवसांमध्ये वाकुर्डेसह उंडाळे प्रादेशिक योजनेचे पाणी न मिळाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, असा सज्जड इशारा शिवसेनेने दिला आहे.

कराड दक्षिणच्या डोंगरी भागाला वरदायी ठरलेली वाकुर्डे उपसा सिंचन योजना व उंडाळे प्रादेशिक या योजना नाममात्र थकीत विजबिला पोटी बंद आहेत. जर शासन भाजपा खासदारांनी राजीनाम्याची भीती दाखवल्यानंतर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे 30 कोटी थकीत बिल भरत असेल, 16 कोटी रुपये त्वरित पाटबंधारे विभागाला वर्ग करत असेल, तर मग आम्हाला वेगळा न्याय का? आम्ही पाकिस्तानमध्ये राहतो की अतिरेकी आहोत ? असा प्रश्‍न शिवसेनेचे विश्‍वजित पाटील उंडाळकर यांनी उपस्थित केला आहे.

वाकुर्डे योजनेचे 45 लाख रुपये वीज बील थकीत असल्याने कराड दक्षिणमधील डोंगरी भागातील लोकांना या योजनांचे मिळत नाही. एक तर दुष्काळाची परिस्थिती असताना सलग दोन वर्ष झाले, शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे उसासह अन्य पिके पूर्णपणे वाळली आहेत. त्यात गेल्यावर्षी काही लोकांनी वीज बील भरतो, असे म्हणून आपल्या वैयक्तिक स्वार्थापायी लोकांचे हाल केले. पाणी तर मिळालेच नाही. उलट येणार्‍या ऊस बिलातून लोकांचे पैसे कट केले. शासनाने टंचाई सदृश्य परिस्थिती होती, म्हणून पाणी सोडले गेले. काही लोक राजकारण म्हणून वीज बील शासनाकडून माफ करू, अशी वल्गना करुन गेले, पण प्रत्यक्षात काहीच नाही झाले.

तशीच काही परिस्थिती उंडाळे प्रादेशिक योजनेची आहे. निव्वळ 35 लाख रुपये विज बील थकले आहे. अजूनही लोकांकडून पाणीपट्टी आकारली जाते. एकीकडे सांगलीतील मिरजवरुन लातुराला पाणी नेण्यासाठी एकवेळ 2 कोटी खर्च केले जातात. मग कराड दक्षिणच्या जनतेला वेगळा न्याय का ? जर म्हैसाळ योजनेत एक न्याय तर आम्हाला वेगळा न्याय का ? भाजपाचा आमदार किंवा खासदार नाही म्हणून का ? असा मुद्दाही निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला आहे.