Mon, Aug 19, 2019 07:09होमपेज › Satara › खा. उदयनराजेंची ना. रामराजेंना ‘खुन्‍नस’; साताऱ्यात भडका होता होता राहिला!

खा. उदयनराजेंची ना. रामराजेंना ‘खुन्‍नस’; साताऱ्यात भडका होता होता राहिला!

Published On: Jun 27 2018 1:22AM | Last Updated: Jun 27 2018 1:22AMसातारा : प्रतिनिधी

विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर व खा. श्री. छ. उदयनराजे भोसले या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही बलाढ्य नेत्यांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाचा भडका मंगळवारी होता होता राहिला. शासकीय विश्रामगृहावर ना. रामराजे कक्ष क्रमांक 1 मध्ये जिल्हा पोलिसप्रमुख संदीप पाटील यांच्याशी चर्चा करत असताना त्याचवेळी एन्ट्री मारत खा. उदयनराजे यांनी पोलिसांदेखत ‘कुठे आहेत,  माझ्याविरोधात बोलताहेत, मला त्यांना भेटायचेच आहे, हे कसले भगीरथ, त्यांनी तर जिल्ह्याचे वाटोळे केले’ असे म्हणत विश्रामगृहाबाहेरून आत असलेल्या रामराजेंना ‘खुन्‍नस’ दिली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली व काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. 

ना. रामराजे व खा. उदयनराजे भोसले यांच्यामध्ये गेली काही वर्षे शीतयुद्ध सुरू आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा एकमेकांवर टिकाटिपण्णी करण्याचे दोघांनीही सोडले नाही. काही दिवसांपूर्वी खा. उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेऊन रामराजे हे बांडगूळ असून त्यांच्यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटला असल्याचा आरोप केला होता. दोन दिवसांपूर्वीही खा. उदयनराजेंनी फलटणमध्ये जाऊन रामराजे हे जिल्ह्याला लागलेली किड असून त्यांच्यामुळे इतरांचे फावत आहे. कुठे मालोजीराजे आणि कुठे हे अशी टीका केली होती. यावर ना. रामराजेंनीही खा. उदयनराजेंचा समाचार घेत सकाळपासून रात्रीपर्यंत जे ‘लिटरवर’ असतात त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये. आम्ही सहन करतो म्हणजे आमचे कोणी हात पाय बांधलेत असे समजू नका. आमची श्रध्दा खा. शरद पवार यांच्यावर आहे. मात्र, तुमची श्रध्दा कोणावर हे सर्वांना माहित आहे. बांडगूळ म्हणजे काय असतो हे लवकरच दाखवून देईन असे प्रत्युत्तर दिले होते. तर रामराजेंचे पुतणे विश्‍वजीतराजे यांनीही उदयनराजेंच्या वक्‍तव्याचा समाचार घेतला होता. 

अशी सगळी तणावाची  पार्श्‍वभूमी असताना ना. रामराजे हे सोमवारी दुपारी रहिमतपूरात तर रात्री सातार्‍यात दाखल झाले. सोमवारी रात्री त्यांनी शासकीय विश्रामगृहावर मुक्‍कामही केला.  वाई-खंडाळा महाबळेश्‍वरच्या पदाधिकार्‍यांशी त्यांनी चर्चाही केली. या काळात उदयनराजेंचाही वावर विश्रामगृहात होता. मंगळवारी सकाळी रामराजेंनी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांशी  विश्रामगृहावर चर्चा केली. त्यानंतर ते 11.30 वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीला हजर राहिले. दुपारी 3 वाजेपर्यंत ते जिल्हा बँकेतच पदाधिकार्‍यांसोबत चर्चा करत होते. त्यानंतर ना. रामराजे पुन्हा  विश्रामगृहावर आले. अजिंक्यतारा कक्ष क्रमांक 1 मध्ये ते बसले होते.  जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील हे विश्रामगृहावर आले. ते थेट रामराजेंच्या दालनात गेले. रामराजे व दोघांमध्ये कमराबंद चर्चा सुरू होती. 

त्याचवेळी खा. उदयनराजे बाहेर आल्याचा निरोप घेऊन एक कॉन्स्टेबल धावत पळत आत आला. जिल्हा पोलिस प्रमुख लगबगीने विश्रामगृहाबाहेर आले.  जिल्हा पोलिस प्रमुख बाहेर जाताच पोलिसांनी विश्रामगृहाची आतील दारे सर्व बाजुंनी बंद केली. आतले आत व बाहेरचे बाहेर अशी परिस्थिती झाल्याने उपस्थितांमध्ये अस्वस्थता पसरली. पोलिसांची घालमेल बघून तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचे प्रत्यक्षदर्शींच्या लक्षात आले. दरम्यानच्या काळात ‘ते कुठे आहेत, मला त्यांना भेटायचे आहे, माझ्या विरोधात बोलत आहेत’ अशी गुरगुर खा. उदयनराजेंनी पोलिसांकडे बघत केली. जिल्हा पोलिस प्रमुख समोर येताच त्यांनी  उदयनराजेंंना कक्ष क्रमांक 2 कडे नेले व समजूत काढण्याचा प्रयत्न केला.  संदीप पाटील यांनी उदयनराजेंना  ‘ते विधान परिषदेचे सभापती आहेत’ असे सांगण्याचा प्रयत्न केला असता ‘हे कसले सभापती,  हे कसले भगीरथ यांनी तर जिल्ह्याचे वाटोेळे केले’, अशा शब्दात उदयनराजेंनी रामराजेंवर आगपाखड करायला सुरू केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

अखेर जिल्हा पोलिस प्रमुखांनी त्यांची समजूत काढली व त्यांना विश्रामगृहाबाहेर पाठवले. दरम्यानच्या काळात एक कार्यकर्ताही बाहेर खासदार आलेत आणि शिवीगाळ करत आहेत, आत यायचा प्रयत्न करत आहेत, असे रामराजेंना सांगत होता. उदयनराजे निघून गेल्यानंतर संदीप पाटील ना. रामराजे यांच्या दालनात गेले. या दोघांमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत कमराबंद चर्चा झाली. ही चर्चा झाल्यानंतर संदीप पाटील बाहेर आले. पत्रकारांनी त्यांना  ‘एवढा बंदोबस्त कशासाठी’ असे विचारले असता ‘व्हीआयपी असल्याने एवढा बंदोबस्त द्यावाच लागतो’ असे उत्तर त्यांनी दिले. ना. रामराजे यांची पत्रकारांनी भेट घेऊन त्यांना घडलेल्या प्रकाराबाबत विचारले असता त्यांनी ‘मला आता काही बोलायचे नाही, वेळ आल्यावर मी बोलायला घाबरणार नाही’ असे स्पष्ट करत वादावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. 

दरम्यान, अर्धा तास चाललेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे सातारा शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. ना. रामराजे व खा. उदयनराजे एकाच ठिकाणी आल्याने सर्वांची फोनाफोनी सुरू झाली. त्यामुळे बंदोबस्त वाढवण्यात आला. पोलिसांची व पत्रकारांची विश्रामगृहावर गर्दी झाल्याने रस्त्याने जाणार्‍या व येणार्‍या नागरिकांनी विश्रामगृह परिसरात गर्दी केली होती. त्यामुळे विश्रामगृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या सर्व प्रकारानंतर  ना. रामराजे हे कुसूर, ता. फलटण येथे रवाना झाले.

खा. उदयनराजे बँकेतही येऊन गेले

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे सर्व संचालकांना बैठकीसाठी बँक प्रशासनामार्फत निमंत्रित करण्यात आले होेते. या बैठकीसाठी खा. उदयनराजे जिल्हा बँकेत सकाळी आले. मात्र, त्यांनी बँकेच्या अधिकार्‍यांना खाली बोलवून सभेच्या कागदपत्रांवर सही करून ते निघून गेले. ना. रामराजे व खा. उदयनराजे यांच्या शीतयुद्धाच्या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा बँकेतही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.