Thu, Apr 25, 2019 03:55होमपेज › Satara › विकासात नाही, पण वाळूत अभद्र युती 

विकासात नाही, पण वाळूत अभद्र युती 

Published On: Mar 11 2018 11:59PM | Last Updated: Mar 11 2018 10:20PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

पाटण म्हटले की आठवते ती राजकीय गटबाजी... आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अन् विकासकामांवरून होणारे तीव्र मतभेद, दावे - प्रतिदावे. एकीकडे असे चित्र असतानाच विकासकामांत कधीच दोन राजकीय गटाचे कार्यकर्ते एकत्र येत नाहीत, असाच आजवरचा इथला अनुभव. मात्र, असे असले तरी उरूल परिसरात दोन राजकीय गटाचे कार्यकर्ते एकत्र आल्याची किमया घडली आहे. हे कार्यकर्ते विकासकामांसाठी आलेत असे आपणास वाटेल, पण ते सर्वजण चक्क बेकायदेशीर वाळू उपसा करण्यासाठी एकत्र आले आहेत, अशी जोरदार चर्चा पाटण तालुक्यात सुरू आहे.

पाटणमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, मनसे तसेच अन्य पक्षांचे गट आहेत. राजकीय द‍ृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणार्‍या या तालुक्यात राजकीय गटांमधील मतभेद, आरोप - प्रत्यारोप आणि विकासकामांवरून होणारे दावे - प्रतिदावे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. त्यामुळेच दोन राजकीय विरोधी गटाचे कार्यकर्ते एकत्र येऊ शकतात, यावर कोणीच विश्‍वास ठेवणार नाही.

मात्र, असे असले तरी दोन राजकीय द‍ृष्ट्या विरोधी गटाचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत, हे ऐकून लोकांना आश्‍चर्य वाटेल. पण असे घडले आहे उरूल परिसरात. राजकारणात कधी काहीही होऊ शकते, असे नेहमीच बोलले जाते. मात्र, व्यवसाय तोही बेकायदेशीरपणे करण्यास विरोधी गटाचे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावत असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांमध्येही तर्कविर्तक सुरू झाले आहेत.

निवडणुकीपुरते राजकारण आणि नंतर विकासकामांसाठी अशी युती झाली तर तालुक्याचा विकास अधिक गतीने होण्यास मदतच होणार आहे. मात्र, विकासकामांवरून दावे - प्रतिदावे आणि आरोप - प्रत्यारोप करणारे कार्यकर्ते आपआपले खिसे भरत महसूल विभागाला पर्यायाने ‘शासनाला चुना’ लावण्यासाठी एकत्र आल्याचे ऐकून क्षणभर कोणाचाही विश्‍वास बसणार नाही. मात्र, तसे घडले आहे. लाखो रूपयांची वाळू कोणताही दंड अथवा रॉयल्टी न भरता काढल्याची चर्चा आहे. वैयक्‍तिक स्वार्थासाठी एकत्र येणारे विकासासाठी एकत्र येत नाहीत, हीच खरी खंत असून प्रशासनाने याप्रकरणी सखोल तपास करून दोषींवर कारवाईची गरज आहे.

म्हणूनच लोकांना वाटते आश्‍चर्य...

राजकारणावरून घराघरात मतभेद होतात. भावकी - भावकीत वाद होऊन गावच्या विकासाला द‍ृष्ट लागते. एकमेकांच्या सुख - दु:खातही अनेकजण सहभागी होत नाहीत, असे चित्र एकीकडे असताना राजकीय मतभेद बाजूला ठेवत उरूल परिसरात राजकीय द‍ृष्ट्या विरोधी गट एकत्र आले, तेही बेकायदेशीर गोष्टीसाठी याचेच लोकांना आश्‍चर्य वाटत आहे.