Sat, Aug 24, 2019 23:16होमपेज › Satara › मलकापूरमध्ये राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी

मलकापूरमध्ये राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी

Published On: Apr 15 2018 1:27AM | Last Updated: Apr 14 2018 10:25PMकराड : प्रतिनिधी

मलकापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर भाजपा, काँग्रेससह राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे या पक्षांनीही तयारीला प्रारंभ केला आहे. भाजपा व सत्ताधारी काँग्रेसमध्ये मुख्य लढत होणार असली तरी माजी आ. विलासराव पाटील - उंडाळकर, शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार आहे. शिवसेना दहा जागांवर स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळेच उंडाळकर गटासह मनसे, राष्ट्रवादीची भूमिका काय असेल ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मलकापूर नगरपंचायतीवर सध्यस्थितीत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांचे वर्चस्व आहे. मात्र 2013 च्या निवडणुकीत भाजपाचे डॉ. अतुल भोसले, राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब पाटील यांचे समर्थक प्रमोद शिंदे यांनी मनोहर शिंदे यांना साथ दिली होती. त्यामुळे सत्ताधारी मनोहर शिंदे गटाला बहुमत मिळवणे सहजशक्य झाले होते. मात्र सध्यस्थितीत डॉ. भोसले हे भाजपाच्या पक्ष चिन्हांवर निवडणूूक लढवण्याची दाट शक्यता असून त्यांना माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव थोरात यांच्या गटाची साथ मिळेल, असे मागील काही दिवसांमधील घडामोडीवरून स्पष्टपणे दिसून येत आहे. तर राष्ट्रवादीचे प्रमोद शिंदे यांच्यासह त्यांचे साथीदार आ. बाळासाहेब पाटील, जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार पुढील वाटचाल करणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे राष्ट्रवादीची भूमिका काय असेल? हे येत्या एक ते दोन महिन्यात समोर येण्याची चिन्हे आहेत.

याशिवाय मागील निवडणुकीत आव्हान उभे करणार्‍या उंडाळकर गटासह मनसे, शिवसेना यांच्या भूमिकाही या निवडणुकीत महत्त्वाच्या ठरणार आहेत. मनसेचे नेते, माजी नगरसेवक दादा शिंगण यांनी आपल्या सहकार्‍यांसह चाचपणीही सुरू केली आहे. शिवसेना नितीन काशिद यांच्या नेतृत्वाखाली 10 जागा लढवणार आहे. यात नगराध्यक्ष पदाचाही समावेश आहे. त्यामुळेच उर्वरित 8 जागांसाठी शिवसेनेची भूमिका काय असणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

माजी आ. विलासराव पाटील - उंडाळकर गटाचे सुहास कदम यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिवसेना, मनसे, उंडाळकर गट स्वतंत्रपणे लढल्यास त्याचा सत्ताधारी काँग्रेसला फायदाच होणार आहे. याशिवाय उंडाळकर गट, मनसे व शिवसेना एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरे गेल्यास काँग्रेससह भाजपापुढे काही प्रभागात आव्हान निर्माण होऊन त्याचा निवडणूक निकालावरही परिणाम होईल, असा राजकीय तज्ञांचा अंदाज आहे. शिवसेनेची निवडणुकीबाबत रविवार, 15 एप्रिलला एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहेत. त्यामुळेच या बैठकीकडे लक्ष लागून राहिले आहे.

Tags : Satara, Political, parties, march, Malkapur