Fri, Jun 05, 2020 12:04होमपेज › Satara › पदोपदी शत्रू व मित्र बदलल्याने कार्यकर्त्यांची पंचाईत

कोणाला अडवायचे... कोणाची जिरवायची...

Published On: Sep 21 2019 12:45PM | Last Updated: Sep 20 2019 11:53PM
सातारा : जीवनधर चव्हाण

महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या राजकीय स्थित्यतरांमध्ये बरीच उलथापालथ सुरु आहे. नेतेमंडळींचे पक्षांतर हा तर बातमीचा विषयच राहिलेला नाही. बदलत्या राजकीय प्रवाहामध्ये सातारा जिल्हाही चर्चेत असून जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदार संघातील आयाराम-गयारामांमुळे सामान्यांची मात्र गोची झाली असून निष्ठा, सख्य, एकोपा, विरोध, दुश्मनी, लढाई कोणाची कोणाबरोबर आहे हेच कळेनासे झाले आहे. 

काही झाले तरी एकमेकांची जिरवायची हा ध्यास घेवूनच काहीजण राजकारण करत असल्याने कोणाला अडवायचे आणि कोणाची जिरवायची याविषयीसुद्धा कार्यकर्ते संभ्रावस्थेत वावरत आहेत. बदलत्या घडामोडींमुळे शत्रू कोण अन् मित्र कोण याचे ठोकताळे बांधताना कार्यकर्त्यांचे अंदाज चुकत असल्याने राजकीय वातावरण गोंधळाचेच आहे. 

राजकारणात कोणच कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो याची प्रचिती जनतेला आता पदोपदी येत आहे, पण या प्रचितीचा एवढा अतिरेक झालाय की कोण कोणासोबत आहे, कोण कोणाच्या विरोधात आहे हे ठामपणे सांगणे अवघड बनले आहे. सध्या सर्वच राजकीय नेतेमंडळी, पक्ष ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून राजकारण करत आहेत तेव्हापासून निष्ठेचा दाखला इतिहासात अनेकदा लोकांनी पाहिला आहे, वाचला आहे. मात्र आजची राजकीय परिस्थिती पाहता निष्ठा म्हणजे काय रे भाऊ असे म्हणायची वेळ आली आहे. रोज एक नवी घडामोड, रोज एकाची उडी सुरूच आहे.

याला अनुसरूनच सोशल मिडीयावर एक जोक फिरत आहे की, 2019 च्या  निवडणुकीची इतिहासात एक वेगळीच नोंद होईल ती म्हणजे ‘न भुतो’ असा महापूर येवूनही बेडकांनी जेवढ्या उड्या मारल्या नसतील तेवढ्या उड्या या राजकारण्यांनी मारल्या आहेत. त्यामुळेच नक्की समीकरणे काय, कोणाच्या हातात कोणत्या पक्षाचा झेंडा, कोण कोणाला अडवतोय, कोण कोणाला मदत करतोय हे लोकांना समजेनासे झाले आहे. या समीकरणामध्ये एकमेकांची जिरवायची, एकमेकांना मागे ओढायचे, आपल्यापेक्षा कोणी मोठा झाला नाही पाहिजे हा ध्यास घेवूनच काही जणांचे राजकारण सुरू आहे.

राष्ट्रवादीतून खासदार होवूनही उदयनराजे भोसले यांनी केवळ 3 महिन्यातच राष्ट्रवादीला रामराम करत भाजप प्रवेश केला आहे. आता ते पुन्हा खासदारकीची निवडणूक लढवणार आहेत, म्हणजे पुन्हा त्यांना खासदार व्हायचे आहे, मग आधी ते कोण होते? असा सवाल आपोआपच जनतेतून उपस्थित होणे साहजिक आहे. उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीस राष्ट्रवादीतील सर्वच आमदारांनी कडाडून विरोध केला होता, तरीही त्यांना उमेदवारी मिळाली, एवढेच नव्हे तर त्यांना निवडूनही आणले. उदयनराजेंना अडवण्याचा डाव ज्यांनी केला त्यांनीच त्यांना निवडून आणले आता त्यांच्याच विरोधात उदयनराजेंना डाव टाकावा लागणार आहे.  तीन महिन्यांपूर्वी भाजप पक्ष व नेत्यांवर टिकेची झोड उठवताना उदयनराजेंनी दिलेली ‘कमिटमेंट’ लोक कशी विसरणार? पुन्हा रिंगणात उतरल्यावर प्रचारात आता नव्याने काय कमिटमेंट करणार? याविषयी जनतेने काय निर्णय घ्यायचा हे संभ्रमाचे नाही का होणार? 

सातारा विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांचा पूर्ण गट भाजपवासी झाला, आता शिवेेंद्रराजे समर्थक जे कालपर्यंत  भाजपला विरोध करणारे आज अचानक गुणगान गाऊ लागलेत, तर त्यांचे विरोधक दीपक पवार यांनी कमळ फुलवता फुलवता अचानक राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधण्याचा निर्णय घेतला, म्हणजे त्यांच्याही कार्यकत्यार्ंना लगेचच राष्ट्रवादीधार्जिणे धोरण अंगीकारावे लागणार आहे.  शिवेंद्रराजे व दीपक पवार यांच्यातील राजकीय वैर टोकाचे असून शिवेंद्रराजे हटाव यासाठीच दीपक पवार यांनी राजकीय दिशा बदलली आहे. याच मतदार संघातील अमित कदम, सदाशिव सपकाळ, वसंतराव मानकुमरे यांनाही या बदलामुळे जनतेसमोर भूमिका मांडताना अवघड जाणार आहे.

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांबरोबरच नव्याने दंड थोपटलेले महेश शिंदे भाजपमधून तयारीत आहेत, अनेक जणांनी मुळ पक्ष सोडून भाजपला आपलेसे केले आहे, त्याचवेळी किशोर बाचल यांनी  शिवसेनेत बस्तान बसवण्याचा प्रयत्न चालवला आहे, अ‍ॅड.  विजयराव कणसे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची साथ सोडत सवता सुभा मांडायला सुरूवात केली आहे. त्यामुळे या नेतेमंडळीसोबत पक्षपातळीवर कार्यरत असणार्‍या कार्यकर्त्यांनी गावपातळीवर कोणती भूमिका घ्यायची? शशिकांत शिंदे यांना अडवण्यासाठी विरोधी नेत्यांनी सर्व पातळ्यावर प्रयत्न चालवले आहेत. हे करताना कधीकाळी एकमेकांच्या विरोधात असलेले आता एकमेकांना सोबत करताना दिसले तर नवल वाटणार नाही.

वाई - खंडाळा - महाबळेश्वर मतदार संघात मकरंद पाटील यांना शह देण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. त्यामुळेच तेथेही रोज एक घडामोड घडताना पहायला मिळत आहे. विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या पुरूषोत्तम जाधव यांना तर सातत्याने भूमिका बदलायची वेळ आली आहे. एका पक्षात स्थिरस्थावर  झाल्यानंतर कार्यकर्ते मानसिकता बदलेपर्यंत पुन्हा नव्याने पक्षांतर होत आहे. संपूर्ण दोन पिढ्यांची हयात काँग्रेसमध्ये गेलेल्या मदन भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेकांना ते रुचणारे नव्हते, रुचलेही नव्हते. त्यांच्या कार्यकर्त्यांचा पिंड काँग्रेसी असल्याने केवळ मदनदादा म्हणून या काँग्रेसी लोकांना भाजपसोबत  रहावे लागत आहे. खंडाळा तालुक्यातील मातब्बरांनी भाजपमध्ये दाखल होवून धक्क्यावर धक्के दिले आहेत. विद्यमान आमदारांची जिरवायची याच हेतूने काही जण इकडे तिकडे पळताना दिसत आहेत. सद्यस्थितीत तेथे कोण कोणाची सोबत करतेय हे खुद्द स्वत:ही कोणी ठामपणे सांगू शकत नाही, असे उपहासाने म्हटले जात आहे एवढी तेथील राजकीय परिस्थिती गोंधळाची बनली आहे.

फलटण हा विधानसभा मतदारसंघ राखीव असल्याने उमेदवारीबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. या मतदारसंघात खुनसी राजकारण होत असून एकमेकांना राजकारणात दाबून ठेवायचे एवढेच येथे सातत्याने होत आहे. ना. रामराजे नाईक निंबाळकर व त्यांचे विरोधक रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या राजकीय भुमिकांबाबत सभ्रमाचे वातावरण आहे. रामराजे यांची राजकीय भूमिका गूलदस्त्यात असल्याने व रणजितसिंह यांची भूमिका जयकुमार गोरेधार्जिणी असल्याने कार्यकत्यार्ंना ठामपणे पक्षीय पातळीवर व्यक्त व्हायला मर्यादा पडत आहेत.

माण विधानसभा मतदारसंघातील जनता यावेळी सर्वाधिक गोंधळलेल्या अवस्थेत आहे. लोकसभेला काँग्रेसमध्ये जयकुमार गोरे यांनी भाजप उमेदवारास मदत केली. ते  भाजपमध्ये जावू शकतात ही शक्यता असतानाच त्यांचे विरोधक शेखर गोरे यांनी सेनेत प्रवेश करुन जयकुमार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.परंतु  जयकुमार यांनीही  भाजपमध्ये जावून उमेदवारीची दावेदारी भक्कम केली आहे. गोरे म्हणायचे माझ्या डीएनएमध्ये काँग्रेस आहे त्याचवेळी काँग्रेसच्या संघर्ष यात्रेत राज्यभर त्यांनी भाजपविरोधी रान पेटवले होते. ते आता भाजपचा प्रचार करा म्हणायला लावतील तेव्हा जनता काय निर्णय घेणार? युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने शेखर गोरे यांनीही सेनेतून दंड थोपटले आहेत. येथील भाऊबंदकी टोकाला गेली आहे, त्यामुळे शह काटशहाचे राजकारण येथे हमखास पहायला मिळतेच. त्याचवेळी जयकुमार गोरे यांच्या भाजप प्रवेशाने कोंडीत सापडलेले अनिल देसाई, दिलीप येळगावकर, रणजित देशमुख यांनी इतर पक्षातील  गोरे विरोधकांना एकत्र करत आमचं ठरलंय चा गजर केला.  यांचा गजर खरोखर  गजर होणार का? याचेही कुतुहल आहेच. ठरलंय ग्रुपमध्येही प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख व सर्वपक्षिय नेते असल्याने त्यांच्या समर्थकांचाही आता वांदा झाला आहे.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातही जिरवाजिरवी सुरू आहे, अजून उमेदवारीचा पत्ता नााही तोपर्यंतच काहीजण कामाला लागले आहेत. बाळासाहेब पाटील यांना केवळ आपणच अडवू शकतो या भ्रमात प्रत्येक जण असल्याने  ज्यांच्या जीवावर अडवण्याची मोहीम फत्ते होणार आहे, अशांना खिजगणतीतही न धरण्याच्या भूमिकेने काहींचे पाय खोलात जावू लागले आहेत. गतनिवडणुकीनंतर भाजपमध्ये गेलेल्या मनोज घोरपडे यांनी उमेदवारी गृहीत धरून तयारी केली, पक्षीय नेतृत्वानेही घोरपडेंना त्या दिशेने वाटचाल सुरु ठेवायला सांगितले आहे. ऐनवेळी धैर्यशील कदम यांची पावलेही भाजपच्या दारापर्यंत आल्याने येथील त्यांचे कार्यकर्तेही कोणता झेंडा घेवू हाती या मनस्थितीत आहेत. भिमराव पाटील, चित्रलेखा माने कदम यांच्या राजकीय भूमिकाही बदलल्याने तेथेही कोणासोबत पंगत करायची हे समजून येत नाही.

कराड दक्षिणमधे पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात अतुल भोसले अशी लढत अपेक्षित असतानाच उदयसिंह पाटील यांच्या उमेदवारीने व सेना प्रवेशाच्या चर्चेंने रंगत वाढू लागली. पृथ्वीराज चव्हाण यांना यावेळी पराभूत करायचेच यासाठी कट्टर विरोधक असलेलेही गळ्यात गळा घालू लागले आहेत, पक्षीय पातळीवरूनही अशा खेळ्यांना बळ दिले जात आहे. जयकुमार गोरेंप्रमाणे  आनंदराव पाटील यांची भाजपशी जवळीक पृथ्वीराजांसाठी व एकूणच काँग्रेससाठी धक्का देणारी घडामोड ठरली, राजेेंद्रसिंह यादव  व समर्थकांनी ऐनवेळी गृहीत न धरण्याचा दिलेला इशाराही खळबळ माजवणारा ठरला.
पाटण मतदार संघ मात्र इतर मतदारसंघाच्या तुलनेत उड्यांच्या बाबतीत थोडा कमी चर्चेत राहिला असला तरी गावपातळीवरील नेते मंडळींचे आओ जाओ सुरूच आहे. येथेही शह काटशहाची एकही संधी शंभूराज देसाई अथवा सत्यजितसिंह पाटणकर सोडत नाहीत.

एकूणच राजकीय गुंतागुंत व मतदारसंघनिहाय नेत्यांची वेगवेगळी भूमिका यामुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमावस्थेत आहेत. याची जिरवायची त्याची जिरवायची, याला मागे खेचायचे त्याला मागे खेचायचे, आम्हाला हाच पाहिजे, तो नकोच या खेळात कोणाची कोणाला सोबत, कोणाचा कोणाला हात, कोण कोणाची पाय ओढतोय याविषयी पारावरच्या चर्चा मात्र चांगल्याच रंगत आहेत. रोज एक नवे समीकरण उदयाला येत असून कोणी कोणाची कशी जिरवली याचीच सध्या चर्चा आहे.