Mon, May 20, 2019 11:23होमपेज › Satara › डॉ. पतंगराव कदमांनी साताऱ्याला भरभरून दिले 

डॉ. पतंगराव कदमांनी साताऱ्याला भरभरून दिले 

Published On: Mar 25 2018 4:54PM | Last Updated: Mar 25 2018 4:54PMसातारा: प्रतिनिधी

महाराष्ट्राचे माजी मंत्री व भारती विद्यापीठाचे संस्थापक आ. डॉ. पतंगराव कदम यांच्या अकाली निधनाने राज्यासह देशातील राजकारणात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने सहकार व शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. राजकारणातील नम्र व्यक्तिमत्व महाराष्ट्राने गमावले आहे. पतंगरावांच्या रूपाने राजकारणातील एका अजातशत्रू हरपला असल्याची भावना सर्वपक्षीय शोकसभेत मान्यवरांनी व्यक्त केली. 

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात डॉ. पतंगराव कदम यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सर्व पक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी डॉ. पतंगराव कदम यांच्या जीवनावर तयार केलेली चित्रफित सादर करण्यात आली. 

विधानपरिषद सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर

पतंगराव व माझ्या कुटूंबाचे राजकारणापेक्षा कौटूंबिक प्रेम व संबध जास्त होते. यशवंतराव मोहिते आमचे नातलग होते. मात्र, त्यावेळी पतंगराव कदम यांनी त्यांना ताकद दिली. त्यांच्यामध्ये असणारे गुण आजही मला भावतात. पतंगराव यांच्याशी मित्रत्वाचे संबध होते. त्यांना विद्यापीठ प्रतिनिधी होण्याची इच्छा होती. सिनेटच्या निवडणूकीला त्यांची उमेदवारी दाखल केली होती. त्यावेळी मी एल.एल.एम करत होते. पतंगराव निवडून येतील, अशी परिस्थिती नव्हती. मात्र, माझ्याकडे पहिल्या पसंतीची दोन मते होती. मी त्यांना दोन्ही मते दिल्याने ते शेवटी निवडून आले. निवडून आल्यानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्रात कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांनी शून्यातून भारती विद्यापीठाची निर्मिती केली. ते शेवटपर्यंत सर्वसामान्य माणसासोबत राहिले. श्रीराम साखर कारखाना अडचणीत असताना त्यांनी सहकार्य केले. 

प्रत्येकाला मदत करण्याची त्यांची भावना होती. पतंगराव खरा अजात शत्रू होता. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी एक अतुलनीय कार्य केले. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले. त्यामुळे त्यांच्या पालकांच्या मनात पतंगरावांची जागा अढळ आहे.  पतंगराव जरी सांगली जिल्ह्याचे असले तरी शेजारील जिल्हा व मंत्री असताना त्यांनी सातार्‍याला भरभरून दिले होते. त्यामुळे त्यांचे सातार्‍यावर प्रेम होते. रयतच्या मॅनैजिंग कौन्सिल सदस्य असल्याने त्यांनी ही संस्था पुढे नेण्यात मोठा वाटा उचलला. पतंगराव मनाने निर्मळ होते. राजकारणातही निर्मळ मनाचा मोठा माणूस म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या जाण्याने राज्याचे मोठे राजकीय नुकसान झाले. कोणत्या शब्दात भावना व्यक्त कराव्या हे सध्याच्या घडीला सुचत नाही. त्यांच्या सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. असा माणूस कधीही नकर्तुत्वाला कोणतीही तोड नव्हती. त्यांच्या जाण्यामुळे  येईल. त्यांच्या जाण्याने आता विश्वजीतवर मोठी जबाबदारी आली आहे. पतंगराव यांचे अपूर्ण राहिलेले काम विश्वजीत व कुटूंबियांनी पूर्णत्वास न्यावे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल. 

आ. शिवेंद्रराजे भोसले 

डॉ. पतंगराव कदम यांचा राजकारणात अजातशत्रू म्हणून नावलौकीक होता. सर्व पक्षांमध्ये साहेबांबद्दल प्रेम व आदराची भावना बघितली आहे. कुणीही त्यांचा शब्द खाली पडू दिला नाही. भाऊसाहेब महाराजांसोबत त्यांनी मंत्री म्हणून काम केले. माझ्यावर वडीलधारी माया ठेवण्याचे काम केल्याने भाऊसाहेब महाराजांचे निधन झाल्यानंतर तीन ते चार वेळा घरी येऊन राजकीय सल्ला देण्याचे काम त्यांनी केले. आ. शशिकांत शिंदे म्हणाले, महाराष्ट्र थोर पुरूषाला मुकला आहे. ज्येष्ठत्वाचा मान ठेवून मार्गदर्शन करणारे असे हे नेतृत्व होते. अधिवेशन कालावधीत बोलक व्यक्तिमत्व 3 महिन्यात सर्वांमधून निघून जाईल, असे वाटले नव्हते. त्यांची हळहळ सभागृहापासून राज्याच्या कानकोपर्‍यात पोहचली आहे. त्यांनी विद्यापीठाची स्थापना करून इतिहास घडवला. वनमंत्री असताना सातार्‍याचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल, त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यांचे सातार्‍याशी एक वेगळ्या प्रकारचे नाते होते. 

आ. बाळासाहेब पाटील 

दुष्काळी तालुक्यात साखर कारखान्याची उभारणी करून त्यांनी शेतकर्‍यांना आर्थिक स्वावलंबी केले. त्यांनी ताकारी, टेंभू व म्हैसाळ हे प्रकल्प मार्गी लागल्याने शेतकर्‍यांची हरित क्रांती झाली आहे. यामध्ये पतंगरावाचा वाटा मोलाचा होता. त्यांचे जाणे सहकार व शिक्षण क्षेत्राला चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने सर्व संस्थांमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. 

आ. आनंदराव पाटील 

महाराष्ट्रातील गोरगरिब जनतेचा पोशिंदा म्हणून डॉ. पतंगराव कदम यांची आठवण होती. महाराष्ट्रातील तरूणांवर पुत्रप्रेम करणारे डॉ. कदम अचानक निघून गेले. सातारा जिल्ह्याच्या कॉंग्रेस उभारणीत त्यांचा महत्वपूर्ण वाटा होता. कोट्यवधी गोरगरिब विद्यार्थ्यांना भारती विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाची संधी निर्माण केली. महाराष्ट्र व देशाच्या राजकारणामध्ये त्यांचा दबदबा होता. कुटूंबातील एक व्यक्ति गेल्याची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून गेली आहे. 

शिवसेनेचे नरेंद्र पाटील 

स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांचे विचार पुढे नेण्याचे काम डॉ. पतंगराव कदम यांनी केले. समाजातील उपेक्षित वर्गाविषयी त्यांना कळवळा होता.  त्यांनी शिक्षणाची पायवाट तयार करून त्याचा महामार्ग केला. महाराष्ट्र शासनाने पतंगराव कदम यांच्या नावाने पुरस्कार सुरू करावा. भाजपचे अनिल देसाई म्हणाले, डॉ. पतंगराव कदम हे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे सोनहिरा होते. जाणता राजा अचानक निघून गेल्याने सर्व जण पोरके झाले आहेत. 

हरिष पाटणे 

महाराष्ट्राच्या राजकारण व समाजकारणात मोठ्या नेतृत्वापैकी डॉ. पतंगराव कदम यांचे नेतृत्व होते. साहेब ज्या वेळी सातारा दौर्‍यावर येत होते त्यावेळी वेगवेगळी बातमी देऊन जात होते. त्यामुळे अत्यंत सलगीने बोलणारे कदमसाहेब पहायला मिळाले. मनाचा मोठेपणा त्यांनी कायम दाखवला. राज्याच्या राजकारणात पतंगराव कदम यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या आठवणी या जिल्ह्यात एक दीपस्तंभ म्हणून राहतील.

यावेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे, जि.प. उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, अॅड. बाळासाहेब बागवान, काका पाटील, सुरेखा पाटील, एम. के. भोसले, साहेबराव जाधव, सुभाषराव शिंदे, रणजिंतसिंह निंबाळकर, प्रल्हाद चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.