Mon, Apr 22, 2019 15:42होमपेज › Satara › मटका किंग बरोबरच मटकाही तडीपार करणार का?

मटका किंग बरोबरच मटकाही तडीपार करणार का?

Published On: Jan 31 2018 2:02AM | Last Updated: Jan 30 2018 10:51PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा नव्या जोमाने पाटण शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर मटका व जुगार व्यवसाय सुरू झाला आहे. वर्दीतल्या दर्दींचा धंदे बंद असतानाही हप्त्यांचा फंडा अडचणीत आल्याने मग या उद्योगाला प्रशासकीय राजाश्रय देण्यात आला आहे. मध्यंतरी याच जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसार पाटण तालुक्यातील मटका घेणार्‍या काहींना तडीपार करण्यात आले. त्यामुळे आता एसपी साहेब मटका किंग बरोबरच तालुक्यातून मटका व जुगार तडीपार करणार का ? असे आव्हानच महिला व सामान्यातून दिले जात आहे. 

पाटणला मटका किंवा जुगार तसा नवा नाही. मात्र अलीकडच्या काळात या व्यवसायामुळे तरूणाईच देशोधडीला लागत आहे. ज्या वयात काहीतरी कमवायचे नेमक्या त्याच वयात अपेक्षित नोकर्‍या नाहीत.  मग वैफल्यग्रस्त पिढ्यांना अशा झटपट श्रीमंतीसाठी मटका व जुगार सोयीस्कर वाटू लागला आहे. तर याच धंदेवाल्यांकडून ग्राहक आकर्षित करण्यासाठी नानाविध फंडे राबविले जातात. 

मोबाईलवर  मिस कॉल देवून तात्काळ तुमच्या दारात मटका घेणारा एजंट येतो. त्यामुळे प्रतिष्ठीत, नोकरदार यांना मटका धंद्यावर किंवा चहा, पानटपरीवर जायची गरज लागत नाही. तर जुगार धंदा म्हणजे विंचवाच्या पाठीवरच्या बिर्‍हाडाप्रमाणे या ठिकाणावरून त्या ठिकाणावर असा अड्ड्यांचा बदलत्या भूकंपाच्या केंद्रबिंदूसारखा प्रवास सुरूच आहे. 

मध्यंतरी प्रामुख्याने प्रसिद्धी माध्यमातून याबाबत हल्लाबोल झाल्यावर स्थानिक यंत्रणांनी अशा धंदेवाल्यांना तात्पुरते काहीकाळ धंदे बंद ठेवण्याचे आवाहन केले. वरिष्ठांच्या करड्या नजरेतून वर्दीतल्या बदनामीचा डाग पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला आणि प्रशासकीय रेकॉर्डही शुध्द करून घेण्यात आले. एका बाजूला धंदे बंद पण हप्ता चालू त्यामुळे या मंडळींचा असंतोष व खदखद वाढत गेली.मग सर्व काही शांत आहे असे वाटल्याने पुन्हा या धंद्याना राजाश्रयात सुरूवात झाली. 

 त्यामुळे जिल्हा पोलिस प्रमुख  मटका किंग बरोबरच तालुक्यातून मटका व जुगार तडीपार करा हेच आव्हान महिला व सामान्यातून दिले जात आहे.