Mon, Jun 24, 2019 16:38होमपेज › Satara › गोंधळेकरच्या घरावर पोलिसांचा ‘वॉच’

गोंधळेकरच्या घरावर पोलिसांचा ‘वॉच’

Published On: Aug 12 2018 1:03AM | Last Updated: Aug 11 2018 10:48PMसातारा : प्रतिनिधी

मुंबईतील नालासोपारा येथे एटीएसने कारवाई करून 20 जिवंत बॉम्ब व बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्‍त केल्या प्रकरणात सातार्‍यातील सुधन्वा गोंधळेकर याला अटक करण्यात आल्याने शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गोंधळेकर याचे करंजे येथील झेंडा चौकात घर असून, स्थानिक पोलिसांचा त्यावर ‘वॉच’ आहे. 

दरम्यान, या प्रकरणातील संशयितांचा सातार्‍यातही घातपात करण्याचा कट असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत असून, त्याद‍ृष्टीने एटीएसच्या पथकाकडूनही सातार्‍यात येऊन चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

नालासोपारा येथे सनातन संस्थेचा साधक वैभव राऊत याच्या घरावर एटीएसच्या पथकाने छापा टाकून जिवंत बॉम्ब आणि बॉम्बचे साहित्य जप्‍त केले होते. याप्रकरणी सुमारे 12 जणांना अटक करण्यात आली आहे. या कटामध्ये हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते असल्याचे एटीएसकडून सांगण्यात येत आहे. संशयितांचा सातार्‍यासह पुणे, सोलापूर व नालासोपारा येथे घातपात करण्याचा कट होता, अशी माहितीही पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. या गंभीर प्रकरणात सातार्‍याचे कनेक्शन असल्याने एटीएसच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागून राहिले आहे. करंजे पेठेतील सुधन्वा याच्या घरावर स्थानिक पोलिसांचा वॉच असून  एटीएसचे पथक सातार्‍यात येवून चौकशी करणार का? याबाबतही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

एटीएसने एखादी कारवाई केल्यास त्यामध्ये स्थानिक पोलिस हस्तक्षेप करत नाहीत. त्यामुळे या कारवाईत सुधन्वाला अटक केली असली तरी त्याच्या घराची झडती घेण्याचा अधिकार स्थानिक पोलिसांना नाही. परंतु, ही घटना गंभीर असल्याने स्थानिक पोलिसांकडून सुधन्वाच्या घरावर वॉच ठेवण्यात येत आहे. अटक केलेल्या संशयितांची चौकशी सुरू आहे. त्यामध्ये सातारा कनेक्शन कोणते वळण घेणार याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.