Wed, Apr 24, 2019 07:31होमपेज › Satara › थर्टीफर्स्टसाठी पोलिस दल अलर्ट

थर्टीफर्स्टसाठी पोलिस दल अलर्ट

Published On: Dec 31 2017 1:28AM | Last Updated: Dec 30 2017 10:36PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

थर्टी फर्स्टचा जल्लोष व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज असली तरी कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सातारा जिल्हा पोलिस दल अलर्ट झाले आहे. तब्बल 550 पोलिसांचा दोन दिवस खडा पहारा राहणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात 50 ठिकाणी नाकाबंदी पॉईंट राहणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.

दि. 31 डिसेंबर व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईमध्ये कमालीचा उत्साह असतो. जल्लोष साजरा करत असताना अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये म्हणून जिल्हा पोलीस दलाच्यावतीने यंदा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तामध्ये 50 पोलिस अधिकारी व 500 पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत. सातारा शहरासह जिल्ह्यात 50 ठिकाणी नाकाबंदी पॉईंट लावण्यात येणार आहे.

दरम्यान, दारु पिवून वाहन चालवणार्‍या वाहन चालकांची ब्रेथ अनायलायझर मशिनच्या सहाय्याने तपासणी केली जाणार आहे. ही मोहीम राबवताना मद्यप्राशन केलेल्या चालकांवर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई केली जाणार आहे. महामार्गावर पोलिसांचा जागता पहारा राहणार असून 65 पोलीस वाहने सतत  गस्तीसाठी राहणार आहेत.

सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत, असा दुहेरी उत्सवाचा आनंद करताना नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी, गोंधळ, गोंगाट व सार्वजनिक शांततेचा भंग करु नये, दारु पिवून वाहन चालवू नये. नागरिकांनी पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.