Fri, Jul 19, 2019 13:27होमपेज › Satara › पोलिस भरतीचे आमिष दाखवून अडीच लाखांची फसवणूक

पोलिस भरतीचे आमिष दाखवून अडीच लाखांची फसवणूक

Published On: Jun 30 2018 1:20AM | Last Updated: Jun 29 2018 11:01PMसातारा : प्रतिनिधी 

शिराळा तालुक्यातील जितेंद्र सर्जेराव पाटील (वय 25, रा. नाटोली, ता. शिराळा, जि. सांगली) याची पोलिस दलात भरती करण्याचे आमिष दाखवून तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संदीप सोपान गायकवाड (रा. करंजे पेठ) याच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे.

याबाबत दाखल झालेल्या फिर्यादीनुसार मिळालेली माहिती अशी, जितेंद्र पाटील याला पोलिस दलात भरती होण्याची इच्छा होती. याची माहिती त्याचे दाजी गोरख यादव यांना असल्याने त्यांनी त्यांच्या ओळखीचे बाळासाहेब रेडेकर यांना याबाबत सांगितले. त्यांनी संदीप गायकवाड (रा. करंजे पेठ, सातारा) हा पैसे घेऊन पोलिस दलात भरती करण्याचे काम करत असल्याचे सांगितले. ही माहिती मिळाल्यानंतर जितेंद्र याने संदीप गायकवाड याच्याशी संपर्क साधून सातार्‍यातील एका हॉटेलमध्ये भेट घेतली. यावेळी गायकवाड याने भरती करण्यासाठी तीन लाख रुपये लागतील, असे सांगितले. 

त्यानुसार जितेंद्र याने त्याच्या दाजीच्या खात्यावरून वेळावेळी गायकवाड याच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले. अनेक दिवसानंतरही भरतीचे काम झाले नसल्याने जितेंद्रने संदीपला याबाबत विचारणा केली. यावर संदीपने तुझे काम रेल्वेत करायचे असल्याने उशीर होत असल्याची बतावणी केली. रेल्वे भरतीची तारीख निघून गेल्यानंतर संदीपने उडवा उडवीची उत्तरे दिल्यानंतर जितेंद्रने मला भरती व्हायचे नसून दिलेले अडीच लाख रूपये मागितले. त्यानंतर संदीप याने टाळाटाळ केल्याने जितेंद्र पाटील याने संदीप गायकवाड याच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.