Tue, Mar 19, 2019 12:06होमपेज › Satara › वाढत्या गुन्हेगारीला पोलिसांचा चाप 

वाढत्या गुन्हेगारीला पोलिसांचा चाप 

Published On: Dec 26 2017 1:34AM | Last Updated: Dec 25 2017 7:54PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

कराड तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीला चाप लावण्याचे काम पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने केले आहे. गत सहा महिन्यात या शाखेने तब्बल साठ दारु अड्ड्यांवर छापे टाकले आहेत. त्यातून लाखोचा मुद्देमाल हस्तगत केला असून वीसजणांच्या हद्दपारीचे प्रस्तावही पाठविले आहेत.

कराड तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर चालत होते. मटका, दारू, जुगार यासह एकूण अवैध व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारांना आर्थिक पाठबळ मिळते. तसेच सार्वजनिक शांतता धोक्यात आणण्यास हेच धंदे कारणीभूत ठरतात. परंतु, तालुका पोलिस ठाण्याची जबाबदारी पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी घेतल्यानंतर डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अवैध धंदे व गुन्हेगारांवर वचक निर्माण केला आहे.

कोणाचाही मुलाहिजा न बाळगता कायद्याचा धाक निर्माण केला आहे. त्यामुळेच  अशोक क्षीरसागर यांच्या कामाचे कौतुक नुकतेच विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात केले होते. शांत, संयमी व काम करण्याच्या विशिष्ट पध्दतीमुळे त्यांनी तालुक्यातील अवैध धंदे व गुन्हेगारीला आळा घातला आहे.     

त्यांच पाठबळ असल्यानेच तालुका पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेने अवैध व्यवसायाभोवतीचा फास आवळण्यास सुरूवात केली आहे. गुन्हे शाखेतील कर्मचार्‍यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच आहे. परंतु, त्यांनी अवैध व्यवसायिकांच्या मुसक्या आवळण्याचे काम केले आहे. गत सहा महिन्याच्या कालावधीत या शाखेने दारूच्या अड्ड्यांवर छापे टाकले आहेत. त्यातून अडीच ते तीन लाखाचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. 

कराड तालुक्यातील ओंड, सुर्ली, कोपर्डे हवेली, शेणोली स्टेशन, टेंभू, काले, कोळे, वसंतगड, आटके, साकुर्डी, गोटेवाडी, टाळगाव, जुळेवाडी, धोंडेवाडी, कोरेगाव, घोगाव, साजुर, कालेटेक, दुशेरे, कार्वे, चचेगाव या गावातील दारू अड्ड्यांवर छापे टाकले असून आजही येथील अवैध व्यवसायांवर गुन्हे शाखेचे लक्ष आहे. छापा टाकण्याबरोबरच अशा व्यावसायिकांचे रेकॉर्ड अपडेट करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. छापा कारवाईत सापडलेल्या संशयितावर पहिल्या दोनवेळा फक्त कायदेशिर कारवाई होते. मात्र, तिसर्‍यांदा दारू विक्री करताना आढळून आल्यास त्याला हद्दपार करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येतो. सध्या तालुका पोलिसांनी वीस दारू विक्रेत्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव प्रांताधिकार्‍यांना पाठविले आहेत.

तडजोडीपेक्षा कायदेशीर कारवाईवर भर...

कराड तालुका मोठा असल्याने व अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागते. मात्र, एखादी घटना समजल्यानंतर स्वत: घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने ते पोलिसांना सुचना करत असतात. ठाण्यात दाखल होणार्‍या गुन्ह्यांचा विचार करता कोणत्याही तक्रारीवर तात्पुरती तडजोड होण्यापेक्षा कायदेशीर कारवाई करून भविष्यातील संभाव्य गुन्हे नियंत्रणात आणण्यावर पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांचा भर असतो.