Wed, Apr 24, 2019 07:30होमपेज › Satara › सामाजिक शांतता की कागदी घोडे महत्त्वाचे?

सामाजिक शांतता की कागदी घोडे महत्त्वाचे?

Published On: Sep 08 2018 1:33AM | Last Updated: Sep 07 2018 10:12PMकराड ः प्रतिनिधी

गुन्हेगारांवर वचक ठेवून समाजात शांतता रहावी म्हणून नेहमी रस्त्यावर ड्यूटी बजावणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना संगणक हाताळण्याचा कोर्स करण्यासाठी वेळच मिळत नाही. त्यामुळे त्यांना संगणकाचे ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र मिळवता आले नाही. केवळ हे प्रमाणपत्र नसल्याने हक्काच्या वार्षिक वेतनवाढीवर पाणी सोडण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक शांतता महत्त्वाची की कागदी घोडे महत्त्वाचे याचा विचार करून प्रशासनाने पोलिसांवर प्रमाणपत्रासाठी सक्ती करावी, अशी चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.

पोलिसांना गत चार महिन्यात बहुतांशी वेळा आंदोलन, मोर्चा किंवा अन्य कारणांनी हक्काच्या सुट्टीही घेता आल्या नाहीत, अशा परिस्थितीत रजेचा प्रश्‍न लांबच राहतो. ड्युटी वरती किंवा बंदोबस्तावर असताना त्यांना संगणक ज्ञान मिळवण्यासाठी संगणक केंद्रांमध्ये जाणे शक्य नसते. मग ते संगणक ज्ञान घेणार कसे? हा खरा त्यांच्या पुढील प्रश्‍न आहे. असे असताना वरिष्ठांनी पोलीस कर्मचार्‍यांना संगणक ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र दिल्याशिवाय वेतन वाढ मिळणार नसल्याचे सांगितल्याने पोलिसांची अडचण निर्माण झाली आहे. काही पोलिस कर्मचार्‍यांनी त्यातूनही गडबड करून संगणक केंद्र चालकांकडे वशिला लावून प्रमाणपत्र मिळवले आहे. परंतु, प्रमाणपत्र जोडले असताना त्यांना संगणक हाताळता येईल याची खात्री देता येत नाही. परंतु शासनाची अट असल्याने व आपली वेतनवाढ थांबू नये म्हणून अनेक पोलिसांनी ही शक्कल लढवल्याची बाब समोर आली आहे.

वास्तविक पाहता पोलीस खात्यात भरती होताना अशा कोणत्याही स्वरूपाचे बंधन, निकष, नियम किंवा कायदा नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्यावेळी संगणक हाताळण्याचे ज्ञान घेऊन पोलीस खात्यात येण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. असे असताना आत्ताच पोलिसांना संगणकाचे ज्ञान द्यावे, अन्यथा वेतनवाढ दिली जाणार नाही, असा आग्रह धरणे कितपत योग्य आहे. पोलिस कर्मचार्‍यांची ड्युटी नेहमी रस्त्यावर व समाजात शांतता निर्माण करण्यासाठी असताना त्यांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यकच आहे का? त्यातूनही शासनाचा तसा आग्रह असेल तर पोलिस खात्यात ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना याबाबत आग्रह न धरता यापुढे नव्याने पोलिस खात्यात पोलीस म्हणून दाखल होणार्‍याबाबत तो निकष लावावा. जेणेकरून पोलीस म्हणून भरती होतानाच त्याला संगणक हाताळण्याचे ज्ञान असले पाहिजे. त्याशिवाय पोलीस म्हणून भरती करू नये. केवळ सध्याच्या ट्युटी बजावणार्‍या पोलिसांना संगणक ज्ञान मिळवण्यासाठी वेठीस न धरता संगणक ज्ञान आवश्यकच असेल तर संगणकाचा कोर्स करण्यासाठी वरिष्ठांनी पोलीस कर्मचार्‍यांना ड्यूटीमध्ये सवलत द्यावी, अशीही चर्चा पोलीस खात्यात सुरू झाली आहे. याचाही वरिष्ठांनी विचार करणे गरजेचे आहे.