Wed, Jul 17, 2019 09:59होमपेज › Satara › पोलिस पाटील भरतीवर तक्रारी : गुणवत्ता यादी जाहीर करण्याची मागणी

मेरिट डावलून उमेदवारांच्या मुलाखती

Published On: Dec 22 2017 1:29AM | Last Updated: Dec 21 2017 11:28PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यात सुरु असलेल्या पोलिस पाटील भरती प्रक्रियेत काही तालुक्यांनी  नुकत्याच लेखी परीक्षा घेतल्या. मात्र, या परीक्षेनंतर गुणवत्‍ता यादी जाहीर न करताच पास झालेल्या सरसकट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे. लेखी परीक्षेतील गुणवत्‍ता डावलून मुलाखती घेतल्या जाणार असल्याने पोलिस पाटील भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रक्रियेची चौकशी करावी, अशी मागणी संबंधित उमेदवारांनी केली आहे.

जिल्ह्यात रिक्‍त असलेल्या शेकडो पोलिस पाटील पदांच्या भरतीची प्रक्रिया  राबवण्यात आली आहे. जिल्ह्यातील सातारा-जावली, कराड, पाटण, फलटण, माण-खटाव, वाई-खंडाळा-महाबळेश्‍वर, कोरेगाव अशा सर्व प्रांताधिकार्‍यांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जात आहे.  प्रत्येक प्रांताधिकार्‍यांनी या पदासाठी लेखी परीक्षा कार्यालयीन कामकाजाची वेळ सांभाळून सोयीनुसार घेतली. ज्या दिवशी ही परीक्षा घेण्यात आली त्याच दिवशी या लेखी परीक्षेचा निकाल तयार करुन तो प्रांताधिकार्‍यांच्या कस्टडीत ठेवण्यात येत आहे. लेखी परीक्षेसाठी 80 पैकी 36 गुण मिळणे अपेक्षित होते. 36 आणि त्यापेक्षा जादा गुण मिळालेल्या  सर्व उमेदवारांना मुलाखतीला बोलावण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून  गुणवत्‍ताधारक उमेदवारांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. 

लेखी परीक्षेवर आधारित गुणवत्‍ता यादी जाहीर केली असती तर साहजिकच जादा गुण मिळालेले उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले असते. मात्र, तसे न केल्याने  उमेदवारांमधून तक्रारींचा सूर निघू लागला आहे. मुलाखतीसाठी 20 गुण देण्यात येणार असून ही मुलाखत त्रिसदस्यीय समिती घेणार आहे.     संबंधित पदासाठी कार्यक्षम उमेदवार निवडला जावा अशीच अपेक्षा या भरती प्रक्रियेनिमित्‍ताने व्यक्‍त केली जात असली तरी ही प्रक्रिया सुसूत्रबध्दपध्दतीने पार पडावी, अशी मागणी होत आहे.  

मुलाखतीनंतर मेरिट यादी होणार जाहीर : अविनाश शिंदे

लेखी परीक्षेनंतर संबंधित प्रांताधिकार्‍यांनी पात्र व अपात्र उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार संबंधितांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे. या भरतीमध्ये मुलाखतीची प्रक्रिया पार पडल्यानंतर लेखी परीक्षा व मुलाखतीमध्ये मिळालेल्या गुणांची मेरीट लिस्ट उमेदवार निहाय जाहीर केली जाणार आहे. त्यातून उमेदवारांची निवड होणार असून ही प्रक्रिया एमपीएससीइतकीच पारदर्शक ठेवण्यात आली असल्याचे  प्र. निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश शिंदे यांनी सांगितले.