Sat, Jul 20, 2019 09:01होमपेज › Satara › ‘महावितरण’ने घेतला पोलिसाचा बळी 

‘महावितरण’ने घेतला पोलिसाचा बळी 

Published On: May 24 2018 1:33AM | Last Updated: May 23 2018 11:23PMवाई : प्रतिनिधी

वाई येथील शांतीनगर परिसरात उसाला पाणी देत असताना वीज तारेचा स्पर्श झाल्याने अजित ऊर्फ अंकुश अरविंद जमदाडे (वय 27)  जागीच ठार झाला. घटनेनंतर त्या ठिकाणी गेलेली त्यांची पत्नीही शॉक बसून जखमी झाली. दरम्यान, ‘महावितरण’च्या गलथान कारभाराचा बळी ठरलेला हा युवक मुंबई पोलिस स्पेशल फोर्समध्ये कार्यरत आहे.

याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी (दि.22) सायंकाळी  7  वाजता अजित जमदाडे हे शांतीनगर येथील त्यांच्या उसाच्या शेतास पाणी देण्यासाठी गेले होते. मोटर सुरू करून शेतात पाणी कुठपर्यंत पोहोचले हे पाहत असताना विजेच्या मुख्य खांबावरील तार तुटून उसावर पडली होती. या तारेचा धक्‍का त्यांना बसताच ते जागीच कोसळले. अंधार पडल्यानंतर त्यांची पत्नी व वडील अरविंद जमदाडे हे त्यांना शोधण्यासाठी शेतात आले असता अजित वायरसह उसाच्या शेतात पडलेला दिसला. 

पत्नीने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही जोरदार शॉक बसून जखमी झाल्या. वडिलांनी प्रसंगावधान राखून लाकडाच्या साहाय्याने दोघांना वायरपासून वेगळे केले. आरडाओरडा करून ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी अजित जमदाडे मृत झाल्याचे सांगितले. अजित जमदाडे यांच्या पत्नीवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. 

दरम्यान, ‘महावितरण’च्या गलथान कारभाराचा अजित बळी ठरल्याचा आरोप करत संबंधित अधिकार्‍यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली तसेच गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

यासंदर्भात ‘महावितरण’च्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता नुकत्याच झालेल्या वादळी वार्‍यामुळे वायर तुटून खाली आली होती, असे  त्यांनी सांगितले. त्यांनी भरपाई देण्याचे मान्य केले आहे. याबाबतची फिर्याद किशोर जमदाडे यांनी वाई पोलिस ठाण्यात दिली असून अधिक तपास उपनिरीक्षक पी. एस. कदम करीत आहेत. दरम्यान, अजित जमदाडे यांच्या अपघाती मृत्यूने फुलेनगर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई, वडील, विवाहित, भाऊ, बहीण असा परिवार आहे.