Tue, Apr 23, 2019 01:50होमपेज › Satara › लव्ह जिहाद निषेध रॅलीची परवानगी पोलिसांनी नाकारली

लव्ह जिहाद निषेध रॅलीची परवानगी पोलिसांनी नाकारली

Published On: Jan 19 2018 1:58AM | Last Updated: Jan 18 2018 10:36PMकराड : प्रतिनिधी

हिंदू एकता आंदोलन आयोजित लव्ह जिहाद निषेध जनजागृती पदयात्रेस  सातार्‍याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी परवानगी नाकारली आहे.  शनिवारी (दि. 20) सकाळी या पदयात्रेस कराडमधून प्रारंभ होणार होता. भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार्‍या या पदयात्रेस परवानगी नाकारण्यात आल्याने आता पावसकर यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली हिंदू एकता आंदोलन समितीकडून लव्ह जिहाद निषेध पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू युवतींमध्ये जागृती करण्यासाठी व सर्व हिंदूंना एकत्र आणण्याच्या उद्देशाने आयोजित या रॅलीचा समारोप रविवार, 21 जानेवारी रोजी सातारा येथे होणार होता. सातार्‍यात शहर प्रदक्षिणा व जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिल्यानंतर रविवारी सायंकाळी आचार्य जितेंद्रजी महाराज यांचे सातार्‍यातील पोवई नाका येथे व्याख्यानही आयोजित करण्यात आले आहे.

दरम्यान, या पदयात्रेस एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ शिकलगार यांच्यासह काही संघटनांनी  विरोध करत पोलिस अधीक्षकांना या पदयात्रेला परवानगी नाकारण्याबाबत निवेदन दिले होते. काही दिवसांपूर्वी भिमा-कोरेगाव येथील घटनेमुळे सामाजिक तेढ निर्माण झाले होते. या पार्श्‍वभूमीवर पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून लव्ह जिहाद निषेध पदयात्रेस परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पोलिस अधीक्षकांनी आदेशात म्हटले आहे.