Tue, Mar 19, 2019 03:13होमपेज › Satara › लाचखोरीमुळे खाकी बदनाम होतेय 

लाचखोरीमुळे खाकी बदनाम होतेय 

Published On: May 22 2018 1:29AM | Last Updated: May 21 2018 9:57PMमारुल हवेली : धनंजय जगताप

पाटणमध्ये दोन पोलिस कर्मचार्‍यांना लाच घेतल्याप्रकरणी रंगेहाथ  पकडण्यात आले. ‘सद् रक्षणाय खल निग्रहणाय’ असे ब्रीदवाक्य घेऊन वावरणार्‍या पोलिसांच्या वर्दीवर यामुळे लाचखोरीचा डाग लागला आहे. पैसा आणि गर्वाचे ग्रहण लागलेल्या काही पोलिसांच्या वर्तणुकीने संपूर्ण खाकीलाच शरमेने मान खाली घालावी लागत आहे.

पाटण पोलिसांच्या कारभाराबाबत अनेकवेळा ऊलट सुलट चर्चा सुरू असतात. कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत राहणारे पाटण पोलिस लाच लुचपत विभागाच्या कारवाईने पुन्हा चर्चेत आले आहे. गुन्ह्यात मदत करण्यासह चाप्टर केस दाखल न करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेणार्‍या पाटण पोलिस ठाण्याच्या दोन पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. 

या कारवाईने पोलिसांनी वर्दीच्या आडून लपविलेला खरा चेहरा समोर आला आहे. यापूर्वीही पाटण पोलिसांच्या अंतर्गत असणार्‍या मल्हारपेठ औटपोस्ट मधील एका फौजदाराला लाच घेतल्याप्रकरणी रंगेहाथ पकडले होते. त्यावेळी फौजदारावर झालेल्या कारवाईने स्थानिकांनी आनंद व्यक्त करून पोलिस स्थानकाच्या समोरच फटाके वाजवून जल्लोष साजरा केला होता. त्यामुळे अशा घटनांनी पोलिसांची जनसामान्यांमधील प्रतिमा मलीन होत असून कायद्याचे रक्षण करणार्‍यांकडे संशयीत नजरेने पाहिले जाऊ लागले आहे.

तालुक्यात उभारलेला पवनचक्की प्रकल्प व इतर प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना तसेच इतर अनेक घटनामध्ये पाटण पोलिसांचा वाईट अनुभव आल्याचे बोलले जाते. तर तालुक्यात सुरू असणारे मटक्याचे अड्डे, अवैध दारू विक्री, बंदी असतानाही कराड पाटण राज्यमार्गावर ठिकठिकाणी सुरू असणारी चोरटी दारू विक्री, तालुक्यातील बाजारपेठांमध्ये होणार्‍या दागिणे, माबाईलच्या चोर्‍या व पाकीट मारी, राज्यमार्गावर झालेल्या चोर्‍यांचा रेंगाळलेला तपास, सुसाट धावणारी अवैध प्रवासी वाहतूक, राज्य मार्गासह मोठ्या गावामधील पार्किंग व्यवस्थेचा झालेला बट्याबोळ यासह इतर अनेक गुन्ह्यांचा अडकलेला तपास या बाबींकडे पाटण पोलिसांचे दुर्लक्ष आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक सलोखा राखण्याची जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागते. मात्र यात पाटण पोलिस किती योगदान देतात हा संशोधनाचा विषय आहे.

एकिकडे ‘पोलिस मित्र’ ही संकल्पना राबविली जात असताना दुसरीकडे पोलिसांशी मैत्रीही नको आणि दुश्मनीही नको अशी जनभावना बनत आहे. तर आपली तक्रार घेऊन गेलेल्या तक्रारदाराला पोलिस चौकीत सुरक्षित वाटत नाही. आपल्याला येथे न्याय मिळेल अशी हमी बाळगता येत नाही.