Wed, Feb 26, 2020 21:06होमपेज › Satara › ‘रावण गँग’ पोलिसांच्या ‘रडार’वर

‘रावण गँग’ पोलिसांच्या ‘रडार’वर

Published On: Apr 13 2019 1:51AM | Last Updated: Apr 12 2019 11:28PM
सातारा : विठ्ठल हेंद्रे

‘रावण गँग’चा सदस्य धीरज शेळके (वय 25, रा. जकातवाडी, ता. सातारा) याच्या सातारा तालुका पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर या गँगमधील अनेक जण पोलिसांच्या ‘रडार’वर आले आहेत. ‘रावण’, ‘साम्राज्य’ व ‘टायगर’ या गँगची टोळी राज्यात ठिकठिकाणी सक्रिय असून व्हॉट्सअ‍ॅपवरील या ग्रुपमध्ये बहुतांश नामचीन गुंड असल्याची माहितीही समोर येत आहे. दरम्यान, संशयित आरोपी हा मोबाईल वापरण्यात ‘माहीर’ असल्याचे धागेदोरे समोर येत आहेत.

सातार्‍यात गेल्या चार महिन्यांपूर्वी दोन गंभीर घटना घडल्या आहेत. यामध्ये जकातवाडी येथे क्षुल्‍लक कारणावरून थेट कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने हल्‍ला चढवून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने जखमी या हल्ल्यात बचावला आहे. घटनेनंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र, तपासामध्ये धीरज शेळके वगळता सर्वांवर कारवाई झाली. ‘पोलिसांच्या तपासाची मोडस’ ओळखून असल्याने धीरज शेळके हा सापडत नव्हता. जकातवाडी येथील तक्रारदार हे वारंवार तालुका, उपविभागीय कार्यालयात जाऊन संशयित आरोपींना अटक करण्याची मागणी करत होते.

जकातवाडी येथील घटना घडल्यानंतर अवघ्या सव्वा महिन्याने सम्राट चौकात सम्राट निकम या युवकाचा निर्घृण खून झाला. यामध्ये तक्रारदारांनी धीरज शेळके याच्या नावाचाही तक्रारीत उल्‍लेख केला आहे. सव्वा महिन्यांपूर्वी हाफमर्डर व त्यानंतर थेट मर्डरमध्ये या संशयिताचे नाव समोर आल्यानंतर पोलिसही हडबडून गेले होते. दोन्ही प्रकरणांत इतर संशयित पकडले गेले; मात्र धीरज शेळके हा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्यामुळे पोलिस संशयिताला अटक कधी करणार, असा सवाल उपस्थित झाला होता. तो मोबाईल वापरत असल्याचा आरोप होत होता; मात्र तरीही पोलिसांना सापडत नसल्याने त्याबाबत संशयाचेही वातावरण निर्माण झाले होते.

गुरुवारी संशयित शेळके याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून अनेक थक्‍क करणारी माहिती समोर येत आहे. मुळातच धीरजपर्यंत पोलिस पोहोचल्याचाही मोठा रंजक आणि थरारक प्रवास आहेे. धीरज शेळके याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून प्राथमिक माहिती घेतली. मोबाईलप्रकरणी पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर पोलिसही थक्‍क झाले. धीरजचा मोबाईल क्रमांकाने रजिस्टर आहे, तो सध्या बंद आहे; मात्र व्हॉट्सअ‍ॅपवर पाहिल्यानंतर तो ‘ऑनलाईन’ असल्याचे दिसायचे. वास्तविक, सिम कार्ड काढल्यानंतरही संबंधिताचा मोबाईल सुरू राहिल्यास तो ‘ऑनलाईन’ असल्याचे दिसते. यामुळे तो ऑनलाईन असल्याचे अनेकदा दिसल्याने त्याचा फोन सुरू असल्याचे वाटत होते.

मोबाईलच्या माध्यमातून धीरज शेळके हा रावण गँगचा सक्रिय सदस्य असल्याचे अधोरेखित झाले आहे. त्याच्या हातावर रावण असे लिहिलेला मोठा टॅटू आहे. रावण गँग नावाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये सातारा जिल्ह्यासह राज्यातील अनेक जणांचा ग्रुप मेंबर म्हणून समावेश आहेे. यातील बहुतांशी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. या ग्रुपवर कोणी काही केले की, त्याचा इतिवृत्तांत अभिमानाने टाकला जात होता. त्यावर अनेक चर्चाही घडत होती. कोणी ‘राडा’ केला, कोणती टोळी कोणाला ‘नडली’, ‘फोडाफोडी’ कशी झाली, असे अनेक चर्चा झडायच्या. रावण गँगशी साधर्म्य असलेल्या साम्राज्य व टायगर या दोन टोळ्यात सर्वाधिक ग्रुप मेंबर एकत्र असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी व्हॉट्सअप ग्रुपची ‘दशा’ पाहिल्यानंतर तेही हादरुन गेले आहेत. पोलिस या घटनेचा सखोल तपास करत असून व्हॉट्सअपवरील या गँगचे सदस्य पोलिसांच्या रडारवर आले आहेत.