Wed, Nov 14, 2018 14:19



होमपेज › Satara › पोलिसांवरील हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक; प्रतापसिंहनगरात कारवाई

पोलिसांवरील हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक; प्रतापसिंहनगरात कारवाई

Published On: May 04 2018 1:49AM | Last Updated: May 03 2018 11:19PM



सातारा : प्रतिनिधी

मोक्‍का गुन्ह्यात हव्या असलेल्या दत्ता जाधव याला पकडण्यासाठी प्रतापपूर (ता. जत, जि. सांगली) येथे गेलेल्या सातारा व सांगली पोलिसांच्या पथकावर तुफान दगडफेक करून जीवे मारण्याचा गुन्हा दाखल असलेल्या दोघांना गुरुवारी सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेने प्रतापसिंहनगरमधून अटक केली आहे.दीपक अण्णा लोंढे व धनराज ऊर्फ धनू ज्ञानदेव बडेकर, अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सातारा येथील नामचीन गुन्हेगार दत्तात्रय रामचंद्र जाधव ऊर्फ दत्ता याच्यावर सातारा शहर तसेच शाहूपुरी पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अवैध सावकारी प्रकरणात दत्ता जाधवचे नाव आल्यानंतर त्याच्यावर जिल्हा पोलिसप्रमुख संदीप पाटील यांनी 

मोक्‍का कायद्यान्वये कारवाई केली होती. तेव्हापासून दत्ता जाधव हा सातार्‍यातून फरार होता. त्याच्या तपासासाठी पोलीस पथके महाराष्ट्रभरात शोध घेत होती. असे असताना दि. 25 एप्रिल रोजी दत्ता जाधव हा आपल्या सहकार्‍यांसमवेत प्रतापपूर (ता. जत, जि. सांगली) येथे असल्याची खात्रीशीर माहिती खबर्‍यांमार्फत सातारा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सातारा पोलिसांनी परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचार्‍यांचे पोलीस पथक तयार केले होते.

25 एप्रिल रोजी या पथकाने सांगली पोलिसांच्या मदतीने प्रतापपूर येथे छापा मारला. त्यावेळी दत्ता जाधव व त्याच्या सोबत असलेल्या शेकडो स्त्री व पुरुषांनी पोलीस पथकावर तुफान दगडफेक करुन पोलिसांना जखमी केले होते. त्या रात्री प्रतापपूर येथे गावची यात्रा होती, तसेच तमाशाचा कार्यक्रमही सुरु होता. याचा फायदा घेवून दत्ता जाधवने त्या ठिकाणावरुन पोबारा केला होता. दत्ता जाधवचा लहान भाऊ युवराज जाधव व त्याच्या सहकार्‍यांनी दत्ता जाधव याला पळून जाण्यास मदत करण्यासाठी अटक करण्यास गेलेल्या पोलीस पार्टीवरच दगड, मिरची पावडर, घातक शस्त्रांनी हल्ला चढवला. यात अनेक महिला व पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. शेवटी पोलीस दलाने बळाचा वापर करीत युवराज जाधव व त्याच्या सहकार्‍यांच्या मुसक्या आवळल्या होत्या.

या प्रकरणातील दत्ता जाधवसह अनेक गुन्हेगार अद्यापपर्यंत फरार आहेत. यातील दोन आरोपी प्रतापसिंह नगर येथे आल्याची पक्की खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली होती. त्यानुसार आज पोलिसांनी प्रतापसिंह नगर येथे सापळा रचून दीपक अण्णा लोंढे व धनराज उर्फ धनू ज्ञानदेव बडेकर यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर जत पोलिस ठाण्यामध्ये मारामारी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांना जत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता जाधव अजून फरार आहे. तो प्रतापसिंहनगरातच असल्याची अटकळ पोलिसांनी बांधली आहे. मात्र, दत्ता जाधव एवढे दिवस पोलिसांना मिळून येत नसल्यामुळे सातारा पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. 

Tags : Satara, Police, arrested, both,  accused