Fri, Aug 23, 2019 21:07होमपेज › Satara › प्लास्टिक पत्रावळ्यांचा वापर जेवणासाठी घातक

प्लास्टिक पत्रावळ्यांचा वापर जेवणासाठी घातक

Published On: Mar 16 2018 1:21AM | Last Updated: Mar 15 2018 8:17PMऔंध : वार्ताहर

लग्नसमारंभ तसेच अन्य कार्यक्रमात प्लास्टिक पत्रावळींचा वापर प्रचंड प्रमाणावर वाढला असून तो पर्यावरणासाठी घातक  ठरत असून पळस किंवा अन्य पर्यायांचा यासाठी विचार करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले  जात आहे.

शासनाने एकीकडे पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक मुक्तीचा नारा दिला असतानाच दुसरीकडे विविध सणसमारंभ, लग्न कार्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक द्रोण पत्रावळयांचा वापर सुरू आहे.  पण शरीरासाठी घातक ठरणार्‍या या प्लास्टिक पत्रावळ्यांचा वापर केव्हा थांबणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या ग्रामीण भागात प्लास्टिक पत्रावळया कार्यक्रमानंतर उघडयावर फेकून देण्याचे प्रमाण वाढल्याने अनेक ठिकाणी प्रदूषण होऊ लागले आहे.

सणसमारंभ म्हणजे डामडौल, बडेजावपणा, जेवणावळी हे सर्व प्राधान्याने आलेच. मागील काही वर्षांमध्ये ग्रामीण भागातही कार्यालयांमध्ये लग्नसमारंभ, वाढदिवस व अन्य घरगुती सामाजिक कार्यक्रम साजरे करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पूर्वीच्या काळी कोणताही सणसमारंभ गावात असला की पळसाच्या किंवा वडाच्या व अन्य झाडांंच्या पानाच्या पत्रावळया तयार करून त्यावर जेवण वाढले जायचे. त्यामुळे अशा पत्रावळ्यांपासून कोणत्याही प्रकारचा त्रास व पर्यावरणाची हानी होत नसल्याने या पत्रावळया वापरल्या जात होत्या.

पण, काळानुरूप बदल होत गेल्याने पुढे स्टीलची ताटे वाट्या वापरल्या जाऊ लागल्या. समारंभ आयोजकांना त्याचे भाडे, ती भांडी धुण्यासाठी होणारा त्रास, पाण्याचा होणारा अपव्यय हे परवडत नसल्याने त्यांची जागा मागील काही वर्षात युज अ‍ॅन्ड थ्रो प्लास्टिक पत्रावळयांनी घेतल्याने अलीकडे सर्वत्र सर्रास या पत्रावळ्यांचा वापर होऊ लागला आहे. हजारोंनी खराब होणार्‍या पत्रावळया कशा नष्ट करावयाच्या? हा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्यातच उघडयावर फेकून दिलेल्या पत्रावळया प्रदूषणास निमंत्रण देऊ लागल्या आहेत. 

सध्या लग्नसराई सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात या पत्रावळया बाजारात विक्रीसाठी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे एकीकडे प्लास्टिक पिशव्या बंदीचे धोरण राबविण्यात येत असताना पर्यावरण हानी रोखण्यासाठी प्लास्टिक पत्रावळी बंदी करणे गरजेचे बनले आहे. या पत्रावळया उघडयावर पडल्याने गाय, म्हैस, कुत्रा व अन्य प्राणी त्यावरील खरकटे अन्न खाण्याच्या नादात पत्रावळी चाटून पुसून खात असल्याने पत्रावळीचा अंश पोटात जाऊन अशी जनावरे मृत्यू मुखी पडण्याचे प्रकारही वाढत आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालच्या धर्तीवर केळी किंवा कर्दळीच्या पानावर किंवा पळसाच्या पत्रावळीवर अन्न ग्रहण करणे शास्त्रीयदृष्ट्या आरोग्यदायी आहे.