Wed, Aug 21, 2019 14:47होमपेज › Satara › सातार्‍यातील प्‍लास्टिक बंदीचा फज्जा

सातार्‍यातील प्‍लास्टिक बंदीचा फज्जा

Published On: Dec 08 2017 1:43AM | Last Updated: Dec 07 2017 11:11PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातार्‍यात प्‍लास्टिक बंदीचा पुरता फज्जा उडाला आहे. सर्वसाधारण सभेचा ठराव बासनात असून नगरपालिकेने प्‍लास्टिक बंदीविरोधात उघडलेली मोहीम अवघ्या दोन वर्षांत गुंडाळण्यात आल्यामुळे पालिकेच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

राज्य सरकारने प्‍लास्टिक बंदीचा विचार सुरू केला असला, तरी सातारा नगरपालिकेने मात्र दोन वर्षांपूर्वीच शहरात प्‍लास्टिक बंदीचा ठराव केला होता. सातारा शहरातील दुकानदार तसेच किरकोळ विक्रेत्यांना बचतगटांच्या माध्यमातून कापडी, कागदी पिशव्या उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला होता. यादोगोपाळ पेठेपासून या मोहिमेचा दणक्यात प्रारंभ झाला होता. हा उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचावा यासाठी दारोदारी लावलेले स्टिकर आजही प्‍लास्टिकमुक्‍तीची वाट पाहात आहेत. या उपक्रमाचे व्यापारी पेठांमध्ये जाऊन प्रचाराचे जोरजोरात ढोल वाजवण्यास आले होते. सामाजिक संस्थांना सोबत घेऊन त्या वेळच्या पदाधिकार्‍यांनी प्‍लास्टिक बंदीचे आवाहन दुकानदार, विक्रेते, व्यापार्‍यांना केले होते. या उपक्रमाचे फोटोसेशन करून मोठा पब्लिसिटी ड्रामा करण्यात आला. शहरात प्‍लास्टिकच येणार नाही, यावर उपाययोजना करण्यासंदर्भात मोठमोठ्या वल्गना झाल्या होत्या. मात्र, या सार्‍या घटनांचा सवार्र्ंनाच विसर पडला आहे. 

राज्य शासनाने प्‍लास्टिक बंदी केल्यावर सातार्‍यातून किती टन प्‍लास्टिकचा कचरा निर्माण होतो, याचीच चर्चा सध्या सुरू आहे. मात्र, सातार्‍यातील प्‍लास्टिक बंदीनंतर दररोज 5 टन निर्माण होणार्‍या कचर्‍याला जबाबदार कोण? घनकचरा प्रकल्प चार वर्षांपासून का रखडला? सभेत प्‍लास्टिक बंदीचा ठराव घेऊन पदयात्रा काढून प्‍लास्टिक गोळा करण्यात आले होते. पण, घेतलेल्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी  झालीच नाही. त्यामुळे मोहिमेचा फज्जा उडाला आहे. प्‍लास्टिक वापरणार्‍यांवर कारवाई होत नसल्याने या हलगर्जीपणाचा जाब मुख्याधिकारी आणि पालिकेच्या आरोग्य यंत्रणेला कोण विचारणार, असा  सवाल केला जात आहे.

प्‍लास्टिकपेक्षा स्वच्छता ठेका महत्त्वाचा

शासनानेच  50 मायक्रॉनखालील प्‍लास्टिकला बंदी घातली आहे. मात्र, तरीही असे प्‍लास्टिक सातार्‍यात सहज सापडते. सर्रास कारवाई करण्यापेक्षा आरोग्य अधिकारी व भाग निरीक्षक किरकोळ फळविक्रेत्यांवर कारवाई करतात. पालिकेला  प्‍लास्टिकपेक्षा कोट्यवधींचा स्वच्छता ठेका कुणाच्या घशात घालायचा हे महत्त्वाचे वाटते, याचेच आश्‍चर्य सातारकरांतून व्यक्‍त होत आहे.