Wed, Mar 27, 2019 06:00होमपेज › Satara › कुमुदिनी तलावातून फरांडा वनस्पती हद्दपार

कुमुदिनी तलावातून फरांडा वनस्पती हद्दपार

Published On: May 09 2018 1:51AM | Last Updated: May 08 2018 10:27PMपरळी : सोमनाथ राऊत

सातारा शहराच्या पश्‍चिमेस आंतरराष्ट्रीय जैवविविधा असलेल्या कास पठारावरील कुमुदिनी तळ्याची स्वच्छता करण्याचे काम वनविभाग व कार्यकारिणी समितीच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. तलावातील कमळांना बाधक असणारी फरांडा वनस्पती काढण्यात आल्याने पांढर्‍या शुभ्र कमळांची पर्वणी फुलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे पर्यटकांना आकर्षक रंगसंगती पहायला मिळणार आहे. सध्या कुमुदिनी तलावात घाण, कचरा तसेच फरांडा नावाची विषारी व तण (विंडस) काही प्रमाणात वाढली असून ती काढून तलाव स्वच्छ करण्याचे काम चालू आहे. (विंडस) फरांडा ही वनस्पती कशी काढावी? याबाबत वनस्पतीतज्ञ श्रीरंग शिंदे (वनपाल बामणोली) यांनी सचिन डोंबाळे (वनक्षेत्रपाल मेढा) यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता करण्याचे काम चालू आहे. 

यापूर्वी 2015 मध्ये तलावातील कमळांना बाधक असणारी फरांडा ही विषारी वनस्पती काढण्यात आली होती. त्यावेळी पंधरा दिवस ही वनस्पती काढण्याचे काम सुरु होते. तद्नंतर जशी वाढेल तशी ती काढली जात असून सध्या तिचे काढण्याचे काम चार-पाच दिवसांवर आले आहे. यामुळे फरांडा ही वनस्पती कमी-कमी होण्याच्या मार्गावर असून, कुमुदिनी कमळाच्या कंद वाढीस तसेच गाई, म्हैशी, जनावरांचे शेण, मलमूत्र वाहून तलावात येत असल्याने तलावातील कमळांच्या वाढीस खत मिळते. यामुळे कंद वाढण्यास ताकद मिळून फ्लॉवरिंग मोठ्या प्रमाणावर होणार आहे. फरांडा ही विंडस जातीची वनस्पती विषारी असून ती कुमुदिनी तलावातील कमळांच्या वाढीसाठी फार घातक आहे.

याच्याप्रमाणे जमिनीत तिची मुळे मोठ्या प्रमाणावर पसरलेली असतात. उन्हाळ्यात पाणी आटल्यानंतर कुमुदिनी कमळाच्या मुळ्या व कंद जमिनीत सुकून जातात. पुन्हा पावसाळा आल्यावर जिवंत होतात यामुळे फरांडा वनस्पती काढण्याचे काम वेगाने सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून हे काम सुरू करण्यात आल्याने बराच परिसर स्वच्छ झाला आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटक गर्दी करतील, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे. या कामामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्‍त केले जात आहे.