Sat, Jun 06, 2020 05:58होमपेज › Satara › माऊलींच्या सोहळ्याची फलटणकरांना आतुरता

माऊलींच्या सोहळ्याची फलटणकरांना आतुरता

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 14 2018 10:18PMफलटण : प्रतिनिधी

संत श्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली पालखी सोहळा रविवारी सायंकाळी फलटण येथील विमानतळावरील पालखी तळावर एक दिवसाच्या मुक्कामासाठी विसावणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर माऊलींच्या स्वागताची जय्यत तयारी पूर्ण झाली असून भाविक माऊलींच्या दर्शनासाठी वाटेकडे डोळे लावून बसले आहेत.

सोहळ्याच्या वाटचालीत चांदोबाचा लिंब येथील पहिले उभे रिंगण आटोपून सोहळा तरडगाव येथील पालखी तळावर विसावला.  रविवारी सकाळी चोपदारांनी सूचना केल्याप्रमाणे सोहळा फलटणकडे मार्गस्थ होणार आहे. तरडगाव ते फलटण या वाटचालीत काळज येथील दत्त मंदिरात विसाव्यासाठी थांबणार आहे. यावेळी परंपरागत पद्धतीने रथातून माऊलींच्या पादुका श्री दत्त मंदिरात नेऊन तेथे माऊलींच्या पादुकांना दुग्ध अभिषेक झाल्यावर सुरवडी येथे दर्शनासाठी थांबवणार आहे. यावेळी साखरवाडी, नांदल आणि सुरवडी येथील ग्रामस्थ दर्शन घेतात.

त्यानंतर सोहळा दुपारी निंभोरे तर सायंकाळी वडजल येथे विसावा घेईल.  याचबरोबर तांबमाळ येथे तालुका दूध संघाचे अधिकारी व कर्मचारी दर्शन घेईल. सोहळ्याचे प्रस्थान फलटण शहराकडे होईल. शहराच्या वेशीवर नगराध्यक्षा, नगरसेवक, पालिकेचे अधिकारी व नागरिक सोहळ्याचे स्वागत करतील.

 स्वागत झाल्यानंतर सोहळा सदगुरू हरिबुवा महाराज मंदिर,पाच बत्ती चौक या मार्गाने प्रभू श्रीराम मंदिरासमोर पोहोचेल. तेथे नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सोहळ्याचे स्वागत झाल्यानंतर गजानन चौक- महात्मा फुले चौक- सफाई कॉलनी- गिरवी नाका या मार्गाने सोहळा विमानतळ येथे पोहचेल. यावेळी समाजआरती व मानकर्‍यांचे सत्कार झाल्यानंतर भाविक सोहळ्याचे दर्शन घेतील.

पालखी सोहळ्याचा आगमनानिमित्त पालिकेच्या वतीने पालखी तळासह संपूर्ण शहराची स्वच्छता केली आहे.  पालखी तळावर पुरेशी प्रकाश व्यवस्था, आरोग्य व पिण्याच्या पाण्याचा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. स्त्री व पुरुषांसाठी सुमारे 600 तात्पुरती शौचालये उभारली आहेत. सूचना व तक्रार निवारण कक्षाची उभारणी, दर्शन बारीसाठी बॅरिकेट लावून सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्य शासन व जिल्हा परिषद सातारा आरोग्य विभागाच्या माध्यमातून पालखी तळावर तात्पुरती शौचालय, वैद्यकीय सेवेसाठी खास पथक, स्वयंपाक गॅस व रॉकेल वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लायन्स क्लब, जैन सोशल ग्रुप, फलटण सिटी यांच्या वतीने मोफत औषध उपचाराची सुविधा पालखी तळावर डॉ.बिपीन शहा व सहकार्‍यांच्या वतीने उपलब्ध होणार आहे. जिल्हा पोलिस दलाच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी तळ आणि संपूर्ण शहरात सुरक्षिततेसाठी पोलिस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दल तैनात करण्यात आले आहे.

शहरात मोठ्या संख्येने दाखल होणार्‍या भाविक वारकर्‍यांना अन्नदान करण्यासाठी शहरातील गणेशोत्सव मंडळे, तरुण मंडळे, स्वयंसेवी व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात पुढाकार असतो. ही मंडळी मिष्टान्नासह, भाजी भाकरी, शिरा, भात यांचे जेवण तर काही ठिकाणी चहा, नाष्टा देतात. शहराजवळून वाहत असलेल्या नीरा उजवा कालव्यात भाविकांना मुबलक पाणी उपलब्ध असल्याने चांगली सोय झाली आहे. फलटणमध्ये मुक्काम असल्याने वारकरी श्रीराम मंदिरात दर्शन करून काही मंडळी शिखर शिंगणापूर येथे महादेवाच्या दर्शनासाठी सुद्धा जातात.