Thu, Sep 20, 2018 04:39



होमपेज › Satara › पाण्याचे श्रेय लाटायला डोमकावळे टपून

पाण्याचे श्रेय लाटायला डोमकावळे टपून

Published On: Feb 11 2018 12:57AM | Last Updated: Feb 10 2018 11:01PM



फलटण प्रतिनिधी

फलटण तालुक्यात आलेल्या पाण्याचा चांगला उपयोग करून तरुणांनी चांगली व प्रयोगशील शेती करून आपल्या भागाचा विकास करावा, असे आवाहन ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. दरम्यान, पाणी आल्यानंतर आता बरेच डोमकावळे येऊन श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतील. तथापि, आपण 25 वर्षे पाण्यासाठी खर्ची घालून तालुक्यात पाणी आणले आहे. अन्यथा, हे पाणी आंध्र आणि  कर्नाटकला गेले असते, असेही ना. रामराजे म्हणाले.

मिरढे, ता. फलटण येथील धोम बलकवडीत कृष्णेच्या पाण्याचे पूजन ना. रामराजे नाईक-निंबाळकर  यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. जि. प. सदस्य मंगेश धुमाळ,  माणिकराव सोनवलकर, दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार, विनायक पाटील, मिलिंद नेवसे, पं. स. सदस्य नानासाहेब लंगूटे आदी मान्यवर उपस्थित होते. ना. रामराजे म्हणाले, 1999 ते 2014 मंत्रीपदे खा. शरद पवार यांच्यामुळे मिळाली. 1995-99 काळात अपक्ष आमदार असताना 20 ते 22 आमदारांना एकत्र करून कर्जरोखे उभारून कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करण्यास भाग पाडले.

मी नसतो तर हे पाणी आंध्र व कर्नाटकात गेले असते. ते पाणी अडवले, सर्व परवानग्या आणल्या. राज्यमंत्री असताना गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशच्या तत्कालिन मुख्यमंत्री उमा भारती व आंध्रचे चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून हे पाणी तालुक्याचेच नव्हे तर महाराष्ट्रच्या वाट्याचे अडवले आहे. आता तालुक्यात पाणी आल्यानंतर बरेच डोमकावळे येतील व म्हणतील आम्ही पाणी आणले, आता पृथ्वीराज चव्हाण यांनाही कोण आणेल. परंतु, पाणी प्रश्‍न हा राजकारणापलिकडचा आहे. त्यामुळे पाणी कोणी आणले आहे, हे त्रिवार सत्य आहे.

केंद्रात पाणी लवाद झाला होता. यावेळी कृष्णा नदीवरील पाण्यावर हक्क सांगितला होता. मात्र ते सर्वांना पटवून देत पाणी कसे सांगितले आणले ते सर्वांना दाखवून दिल्याचे ना. रामराजे म्हणाले. खंडाळा, लोणंद, फलटणला एमआयडीसी केली. खंडाळ्याच्या जमिनीचा दर वाढला. शेतकरी व त्यांच्या मुलांनी जमिनी विकून चैन केली आणि पाणी आल्यावर काय केले? तरुण मुलांनी शेती पिकवून आई-वडिलांचे पांग फेडावे, यात मला सर्वात जास्त आनंद होईल. पाणी आणून फक्त ऊस लागतो. गिरवीत सध्या हजार-दोन हजार एकर ऊस उभा आहे. उसामुळे आळस येतो.

त्यामुळे इतर आयडिया वापरून चांगली व प्रयोगशील शेती करा. तरुणांनो, एकत्र या, मात्र जमिनी विकू  नका. उच्च शिक्षण घ्या, परदेशात रोजगार शोधा, असे आवाहन ना. रामराजे यांनी केले. मिरढेच्या सरपंच सौ. संगीता लोंढे, भोजराज ना.निंबाळकर, नामदेव काळे, सहदेव काळे, संभाजी गावडे, रमेश लोंढे उपस्थित होते. प्रास्तविक भागवत काशीद यांनी केले. आभार चांगदेव पोकळे यांनी मानले.